मुलांच्या सर्जनशीलतेला एक व्यासपीठ मिळावं या उद्देशाने 'कुल्फी'तर्फे गेली दोन वर्षं मुलांसाठी लेखन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे यंदाही ही स्पर्धा घेत आहोत. ही स्पर्धा इयत्ता चौथी ते दहावीच्या वर्गातल्या सर्व मुलामुलींसाठी खुली आहे. या उपक्रमात उल्लेखनीय लेखन करणाऱ्या निवडक मुलांसाठी येत्या शैक्षणिक वर्षात एका शनिवारी किंवा रविवारी विशेष कार्यशाळा पुण्यात आयोजित करण्यात येईल.
प्रसिद्ध बालसाहित्यिक माधुरी पुरंदरे आणि वसीम मणेर मुलांना लेखनप्रक्रियेच्या विविध बाबींवर या कार्यशाळेत निवडक मुलांसोबत काम करतील. या कार्यशाळेत मुलांना जगभरातल्या उत्तमोत्तम बालसाहित्य वाचायला मिळेल आणि सोबत इतरही रंजक उपक्रमामध्ये सहभाग घेता येईल.
याचे तपशील पुढीलप्रमाणे
वयोगट - चौथी ते दहावी इयत्तेमधील विद्यार्थी
लेखन विषय -
(पुढील विषयांपैकी कोणत्याही एका लेखनप्रकारात लेखन करून पाठवायचे
१. कथालेखन (शब्दमर्यादा ७०० शब्द)
पुढे कथेत येणाऱ्या ओळी दिल्या आहेत. त्या ओळी, गोष्टीच्या त्या त्या भागात येतील अशी गोष्ट लिहायची आहे. गोष्टीला सुयोग्य शीर्षकही द्यायचं आहे.
गोष्टीच्या सुरुवातीला : गावातल्या जुन्या विहिरीबद्दल सगळ्यांकडे वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
गोष्टीच्या मध्यात : त्या संध्याकाळी मला एक विचित्र गोष्ट दिसली.
गोष्टीच्या शेवटी : पोलिसांना जे दिसलं तेच जग खरं मानतं. पण काय घडलं ते मला माहीत आहे आणि आता तुम्हांलाही!
२. पत्रलेखन (शब्दमर्यादा ५०० शब्द)
तुमचा एक मित्र/मैत्रीण तुमच्यावर रुसला/रुसली आहे. त्याची/तिची मनधरणी करणारं पत्र लिहा.
३. संवादलेखन (शब्दमर्यादा ५०० शब्द)
पात्र १ : सत्तरीच्या एक आजी. जीन्स आणि कुर्ता घालायला आवडणाऱ्या. बॉबकट असलेल्या. मेकअप आवडणाऱ्या. खायला मात्र मिसळ, तांबडा रस्सा असे झणझणीत पदार्थ आवडणाऱ्या. रील्स बघायची प्रचंड आवड. पूर्वी भौतिक शास्त्रज्ञ म्हणून काम करायच्या.
पात्र २ : एका गावात राहणारा, आठवीत शिकणारा मुलगा. घरची परिस्थिती बेताची. शाळा घरापासून बरीच दूर. एसटीने येतो जातो. घरी आजोबा वारकरी. धार्मिक वातावरण. याला गोड खायला आवडतं. पुस्तकं वाचायची प्रचंड आवड. त्याला मोठं होऊन कीर्तनकार बनायचं आहे शिवाय ग्रह-तारे आणि रात्रीचं आकाश बघायचं वेड आहे.
एकदा एका बसमधून पात्र २ चाललं असताना, एका स्टॉपवर पात्र १ चढतं आणि पात्र २च्या शेजारी बसतं. दोघेही बोलके, त्यामुळे लगेच बोलणं सुरू होतं त्या दोघांमध्ये काय संवाद होत असेल तो लिहायचा आहे.
4. कल्पनाविस्तार (शब्दमर्यादा ५०० शब्द)
एकदा एका सकाळी - पालक मुलांचं सगळं काही ऐकताहेत, मुलांना सगळे नियम ठरवायचे अधिकार आहेत आणि मोठ्यांची काळजी घेण्याची जबाबदारी मुलांवर आहे - असं होऊ लागलं. त्या दिवशी काय घडलं असेल?
५. अनुभवलेखन (शब्दमर्यादा ५०० शब्द)
तुमचा स्वतःचा कोणताही मजेदार अनुभव लिहा.
६. चित्रावरून लेखन (शब्दमर्यादा ५०० शब्द)
खालील चित्र बघून स्फुरलेलं कोणत्याही प्रकारचं (गद्य किंवा पद्य) लेखन कर

महत्त्वाच्या सूचना :
१. मुलांनी केलेलं लेखन ही त्यांची स्वतःची रचना हवी. लेखन पूर्वप्रकाशित किंवा अनुवादित नसावं.
२. लेखन मराठीत असावं. मात्र ते प्रमाण मराठीतच असावं असं बंधन नाही.
३. लेखन कागदावर लिहिलेलं असल्यास सुवाच्य असावं. सर्व पानांचे फोटो एकत्र करून एकच एकत्रित पीडीएफ फाइल पाठवावी. लेखन टाइप केलं असल्यास ते युनिकोडमध्ये असावं.
४. काही शारीरीक कारणांमुळे लिहिणं किंवा टाइप करणं शक्य नसेल तर गोष्ट रेकॉर्ड करून ऑडिओ फाइल पाठवता येईल.
लेखन पाठवण्याची अंतिम तारीख : ३० जून २०२६ १५ जुलै २०२६
अंतिम निवडीची घोषणा - ऑक्टोबर २०२६
लेखन कुठे पाठवाल : [email protected]
लेखन पीडीएफ फाइलमध्ये किंवा यूनिकोडमध्ये टाइप केलेलं असावं.
लेखनासोबत पाठवायची अनिवार्य माहिती
अ) लेखक विद्यार्थी/विद्यार्थिनी नाव
ब) शाळेचं नाव, इयत्ता/तुकडी
क) शहर/गावाचं नाव
ड) घरचा पत्ता
इ) पालकांचा मोबाइल नंबर (शक्यतो whatsapp)



