नमस्कार,

उन्हाळी अंकात घोषित केलेल्या लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर करत आहोत. पण तत्पूर्वी एकूणच निकालापर्यंत पोचायच्या प्रक्रियेबद्दल लिहिणं अगत्याचं आहे.

यंदाही लेखन करण्यासाठी प्रत्येक लेखनप्रकारांतर्गत काही विषय दिले होते. मात्र यावेळचे विषय देण्याची पद्धत मुलांना शाळेत विषय मिळातात त्यापेक्षा वेगळ्या प्रकाराची होती. अर्थातच, मुलांनी उत्स्फूर्तपणे त्यांच्या आवडीच्या विषयावर केलेलं लेखन पाठवायला वाव नव्हता. त्यामुळे कदाचित कमी प्रतिसाद येईल की काय अशी भीती होती. पण प्रत्यक्ष प्रतिसाद उत्साह वाढवणारा होता. यावेळी एकूण १८२ मुलांनी आपलं लेखन पाठवलं, एकूण ३२ एक वेगवेगळ्या जिल्ह्यातून, ८२ शाळांतून लेखन आमच्यापर्यंत पोचलं. दिलेल्या विषयावर इतक्या मुलांनी या निमित्ताने विचार केला, त्याबद्दल इतक्या शाळांत/घरांत बोलणं झालं आणि प्रत्यक्षात ते लेखन झालं याचं समाधान मोठं आहे. 

कित्येक शिक्षकांनी, सामाजिक संस्थांनी मुलांना लिहायला उद्युक्त केलं. आलेल्या प्रतिसादात मुंबई, पुणे, नाशिक या त्रिकोणाच्या बाहेरूनही खूप मुलांनी (जवळजवळ ५०%) लेखन पाठवलं. शहरी मोठ्या कॉर्पोरेट शाळा, प्रयोगशील शाळा, समांतर शिक्षण देणाऱ्या संस्था, शाळेनंतर वस्त्यांवर वर्ग घेणाऱ्या संस्था, जिल्हा परिषद शाळा, खाजगी अनुदानित ग्रामीण शाळा, आदिवासी भागात काम करणाऱ्या संस्था अश्या वेळवेगळ्या ठिकाणाहून लेखन आलं ही आनंदाची गोष्ट. याचं प्रतिबिंब यावेळच्या निकालातही आपोआप दिसून येतं आहे.

आता लेखनाच्या दर्जाबद्दल सांगायचं, तर वेगळ्या प्रकारे दिलेले विषय समजून घेऊन लिहिताना घेतलेले कष्ट दिसून येत होते. एकूण लेखनापैकी ६५ जणांनी म्हणजे ५०%पेक्षा अधिक जणांनी विहीरीची गोष्ट लिहिली आहे. अशा प्रकारे गोष्ट लिहिताना नेहमीच्या पठडीबाहेर जाण्याचाही प्रयत्न अनेक मुलांनी केला आहे. यंदा 'निबंध' लिहिन्यांचे प्रमाण तुलनेने कमी होते, उलट स्वत:च्या कल्पना, विचार मांडण्याकडे अधिक ओढा होता यांचे समाधान वाटले. मात्र बहुतेकांचे संवाद लेखन, पत्र लेखन अजूनही चौकटीत अडकलेले वाटले. परीक्षकांना काय वाचायला आवडेल असा विचार करून "आदर्श" संवाद अनेकांनी लिहिले आहेत, मात्र सर्जनशील लेखनात आदर्श उत्तरांपेक्षा तुमचे विचार, तुमच्या कल्पना, तुमचा परिसर लेखनात उतरणं अधिक आवश्यक आहे हे मुलांपर्यंत पोचवायला आणखी काम करावे लागणार आहे. अनुभव लेखनात आलेला 'अनुभव' ही सर्वात महत्त्वाची गोष्ट अनेकांच्या लेखनात नव्हती. केवळ काय घटना घडली यांची नोंद (लॉगिंग) आणि अनुभव पोचवणे याच्या फरकावरही काम आवश्यक वाटले. 

गेल्या वर्षी म्हणालो तेच यंदाही - कमी प्रमाणात पण निश्चितपणे - लागू आहे  की लेखनातल्या त्रुटींचा दोष एकट्या मुलांचा नाही. त्यांना सातत्याने वेगवेगळे विषय देऊन त्यावर निबंध लिहिण्याचे साचे (टेंप्लेट) उपलब्ध करून देणारे काही शिक्षक, काही गाईडस आणि पालक यांचाही यात मोठा वाटा आहे. मुळातच आपल्या अनुभवांना मांडणं, एखाद्या कथेची कल्पना करणं, कथेचा घाट कसा आहे, त्यात पात्रं कोणती आहेत् वगैरे चर्चा वर्गात होणं हे क्रमिक शिक्षण, प्रश्नोत्तरं आणि धडे शिकवण्याइतकंच महत्त्वाचं आहे. 

अर्थात चित्र पूर्णत: नकारात्मक नाही. याही वेळी कित्येकांनी खूप छान लेखन केलं. इथे दिसणाऱ्या या नावांव्यतिरिक्त, आणखी सत्तर एक मुलांचं लेखन सर्वसाधारण लेखनापेक्षा चांगलं (अबव्ह अॅवरेज) होतं. पण त्यातही लेखन शैली, भाषा, वाक्यरचना, सहजता आणि कल्पकता या गोष्टींचा एकत्रित विचार करून हे विजेते काढले आहेत. सकस, सुरस लेखनात गेल्या दोन्ही वर्षांच्या तुलनेत वाढ आहे, आणि त्यांचे प्रतिबिंब निकालात दिसतेच आहे. यंदा नेहमीपेक्षा जास्त विजेते निवडले गेले आहेत.

सगळ्या विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!

येत्या शैक्षणिक वर्षात या विजेत्यांची एक अनुभवशाळा पुण्यात संपन्न होईल. त्यात या चांगलं लेखन करणाऱ्या मुलांना जगभरातल्या बालसाहित्याचा, चित्रांचा, इतर काही कलाकृतींचा अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न असेल, शिवाय माधुरी पुरंदरे आणि वसीम मणेर या मुलांना मार्गदर्शन करतील जेणेकरून त्यांना आणखी चांगलं लेखन करायला सुयोग्य दिशा मिळू शकेल.

ज्यांची नावं या यादीत नाही, त्यांनी हुरूप न सोडता पुढल्या वर्षी पुन्हा प्रयत्न करू या.

1000492093.png
1000492099.png
1000492096.png
1000492102.png