तृतीय क्रमांक (विभागून) विजेती एकांकीका: एका झाडाची गोष्ट

एका झाडाची गोष्ट

लेखन: उदय गोडबोले 

  प्रवेश पहिला

(रंगमंचावर मध्यभागी एक मोठं झाड.स्टेजवर,एक मुलगी पारावर बसली आहे,तीची मेैत्रिण येते काहीवेळाने आणि दोघी येतात सार्‍या शाळेत जातात. आता एक फुलपाखरू प्रवेश करतं थोडं झाडा भोवती भिरभिरतं)

फुलपाखरू -येऊ का रे बाबा ? येऊ का मी ? खूप दमलोय फिरून, थोडं बसू का मी?

झाड - ये रे बाळा ये, मी नको म्हणत नाही. माझ्यासारख्या झाडाचा तो  स्वभावच नाही.

फुलपाखरू -(बसते) कित्ती छान सावली तुझी, जणू विसाव्याचा झरा, थकलो जरी कितीही तरी शीण जाईल सारा...

झाड - इवल्या तुझ्या पंखांवरती नक्षी दिसते खुलून,कधीही पाहिलं तुला  तरी, कुणीही चटकन् जाईल हरवून...

मधमाशी -बरंय बुवा तुमचं...छाऽन गप्पा मारत बसलाय, मधासाठी आमचा मात्र, थकवणारा प्रवास चाललाय.

झाड -तूही थोडी  बस ग बाई, सारखी  काय ग करतेस  घाई?छान मोकळं बोलल्याशिवायथकवा तुझा जाणार नाही.

मधमाशी -नको रे बाबाऽ नको, राणीमाशीनं देऊन ठेवलंय टारगेट, मध तेवढा गोळा नाही केलास तर ती दाखवेल थेट बाहेरंच गेट.

चिऊ -चिव चिव चिव चिव, छाऽन बसलायत की निवांत, माझी पिल्लं मला कुठंमिळू देतायत उसंत ?

झाड -उबदार घरट्यात पिल्लं तुझी, झोपलीत ना शांत ? कामं आहेतच नेहमीची, तू ही बस जरा निवांत...

चिऊ -झाडभाऊ तुमचे आम्ही कसे मानू आभार, सदान्कदा आमच्या घरटयांचा तुमच्याच फांद्यांवर भार !

मधमाशी -काय हो चिऊताई... बरं आहे ना छोट्याला ? कालपासून त्याला म्हणे खूप खोकला होता झाला?

चिऊ -खरंच त्या खोकल्याचं काय करू कळत नाही ... जाता जाता दोन थेंब मध देऊन जा बाई.

काऊ   -काव  काव काव  काव बरे आहात  ना सारे ?  एकदम  सगळेच जमलात म्हणून सहज म्हंटले विचारावे!

फुल -होऽ... आम्ही मस्त मजेत मारतो आहोत गप्पा, काय आणलीयेत खबरबात ते आधी सांगा.

काऊ -जीणं आपलं अगदी नको करून टाकलंय माणसानं, घेऊन घेऊन आणखी किती घ्यायचं आपण दमानं?

मधमाशी -कणाकणानं मध गोळा करायचा आम्ही,एक दिवस शिडी लावून काढून घ्यायचा त्यांनी!

झाड -कुणी काही नेलं, मागितलं तर द्यायचा स्वभाव आपला, हा माणसांनी मात्र त्याचाच  असा, नेमका फायदा उठवला.

काऊ -खरंय तुमचं पण भाऊ, हा स्वभाव ज्याचा त्याचा, कुणी कसंही वागूदे, पण आपण तो नाही सोडायचा.

फुलपाखरू -चला आता बास झाल्या त्याच त्या गप्पा, पुरे झाली विश्रांती जाऊ आपापल्या कामाला.

काऊ -थांबा थांबा, एक गोष्ट सांगायचीच राहिली. येता येता माझी बुवा, फजितीच झाली.

सगळे -सांग रे बाबा, सांग लवकर, फजिती कसली झाली ?

काऊ -आजूबाजूची वाटेवरची, झाडंच नव्हती दिसली, उडता उडता रस्ताच चुकून, वाट वाटली हरवली.

चिऊ -झाडं कुठून दिसतील तुला. ती तर त्यांनीच तोडली असतील झाडांवरची घरटी सारी  मोडून उघड्यावर पडली असतील. आपलं हेही झाड त्यांनी असंच तोडलं तर?

मधमाशी - काळजी  नका करू कुणी,  पोळं  माझं पाहिलयंत  ना?  तोडायला  कुणी आलंच तर चावून चावून पळवून लावीन त्यांना...

काऊ - वाटतं  तेवढं सोप  नाही गं बाई,  जाळून  टाकतील पोळं  तुझं,  ही  माणसं राक्षसापेक्षा कमी नाहीत.

फुलपाखरू -अरे बापरे ! कुणीतरी इकडंच येतंय...

चिऊ - अरे  घाबरता  काय?नेहमीप्रमाणे  येत आहेत दोन  मुंग्या...गुलूगुलू बोलत मारतायत टिंग्या...

फुलपाखरू -जरा शांत बसा...कान देऊन ऐका...दोघीत एवढी गहन काय चाललीये चर्चा...

 

मुंगी 1 -चल गं झपझप...साखर गोळा करू पटपट, पाऊस सुरु व्हायच्या आत साठा करू झटपट.

मुंगी 2 -तशी झालीय वारूळात वर्षाची बेगमी  त्यामुळे जरा झोप काढू रात्र आजची

मुंगी 1 -आज मंडळी गप्पा टप्पा करत बसली, जणू काही पक्ष्यांची शाळाच भरली.

मुंगी 2 -नुसते पक्षीच नाहीत, किटकभाऊ सुध्दा आहेत, कसली तरी गहन चर्चा करत आहेत.

मुंगी 1 -आता इथे लवकरच मोठा रस्ता होणार.त्याच बातमीवर चर्चा सुरु असणार

मुंगी 2 -आपण  साठवतोय  राबून राबून  घबाड,  पण  मला तरी  दिसतंय भविष्य उजाड.

मुंगी 1 -भविष्याचा  विचार करायला  आपण माणसं आहोत  का? काम करीत राहणं, वर्तमानात जगणं सोडून दिलंस का ?

झाड -आता मात्र सगळे शांत बसा... खरंच कुणीतरी येतंय ! नक्कीच कायतरी मोठं संकट दिसतंय.

(माणसं येताना दसताच सगळे झाडामागे लपून बसतात)

 

मुकादम -हे  बघा,  मागच्या  रस्त्यावरची  झाडं जरा बारीक-सारीक  होती त्यामुळं कायबी प्रॉब्लेम झाला नाय. पन हे झाड तोडताना चटशीर आवराया पायजे. सायबांचा आदेश हाय, ह्यो रस्ता लवकरात लवकर रुंद व्हायला पायजे.

मजूर 1 -आऽगागागा ! केवढं मोठं झाड हे ... लई वर्षं जुनं आसल. लाकूडबी लई निघनार हाय...

मुकादम -अरं म्हनून तर हे झाड म्हंजी, सोन्याची खान हाय!

मजूर 2 -साहेब, बारीक बारीक फांद्या पहिला तोडतो. दोन चार मोहाची पोळी पन दिसत्यात, ती जाळतो आन् मग कामाला सुरुवात करतो.

मजूर 1 -कामाला कवा सुरुवात करायची ते तर सांगा.

मुकादम -आपल्या  हातात आर्डर  हाय. कुनीतर खो  घालायच्या आत,  लवकरात लवकर काम सुरु करूया.

मजूर 2 -लाकूडबी नंबरी हाय. जळानबी बक्कळ निघनार. साहेब आमचं पैसंबी जरा वाढवून द्या की!

मुकादम -शानपना करू नका, माझं पैसं वाढलं की तुमचं वाढवतो. उद्यापासून लागा कामाला. आता चला... निघा घरला. (तिघे जातात)

 

झाड -(दुःखाने)  चला निघा आता  तुम्हीही. आजपर्यंत  माझ्या भाऊबंदांची विकासाच्या नावाखाली कत्तल झाली, तशीच माझीही होणार. आता तुम्ही सारेजण नवा आसरा शोधा, निवारा शोधा.

चिऊ -असं  का बोलतोस झाडभाऊ?माझं घरटं,माझी कच्चीबच्ची घेऊन मी कुठंच जाणार  नाही.तुझ्याबरोबर आमचं काहीही होऊदे. आम्ही तक्रार करणार नाही.

फुल -मघाशी किती आनंदात बागडत होतो मी. पण आता खूप वाईट वाटतंय. झाडभाऊ तुझ्या शेवटच्या क्षणापर्यंत तुझ्यासोबत मी बसतो. तेवढाच तुझा सहवास. तुझ्यासोबत राहतो.

मधमाशी -मी आणि माझ्या सख्या शेवटपर्यंत लढू. तुझ्यावर हल्ला करणार्‍यांना चावून चावून मारू.

झाड -अरे तुमचा माणसा समोर निभाव काही लागणार नाही तुमचा आहे एवढासा जीव तुमचं काही चालणार नाही. (सगळे रडू लागतात )

काऊ - रडू नका, चिडू नका. काहीतरी उपाय निघेल. जगामध्ये थोडातरी चांगुलपणा शिल्लक असेल. मी सांगतो  मस्त युक्ती, आपल्या झाडभाऊसाठी. काय बरं आयडिया करावी?  कुणाला बरं पटवावं शाळेतल्या मुलानांच पटवतो.त्या साठी शाळेत जातो?येस...काव काव काव !

(अंधार)

 

प्रवेश दुसरा

टिचर -तर  मुलांनो,  आज  आपण वृक्षवल्ली  आम्हा सोयरे’  हा  अभंग  शिकणार आहोत.वृक्षवल्ली  आम्हा सोयरे,वनचरे  पक्षीही  सुस्वरे आळवीती  बरे असं संत तुकाराम  म्हणतात तर वृक्ष म्हणजे  आपल्या आजूबाजूला असणारी झाडे. बरोबर?आता मला सांगा बरं, ही झाडं का असायला हवीत ? (मुली गलका करतात) थांबा...थांबा...एकेक जण एकेक सांगा.

पयोजा -झाडं आपणाला लाकूड देतात.

निर्मिती -झाडं आपल्याला ऑक्सिजन देतात.

वरदा -झाडं आपल्याला सावली देतात, फळं देतात, फुलं देतात. (इतक्यात काव काव  करीत कावळा वर्गात घुसतो. मुलं  गोंगाट करू लागतात. काऊ इकडं तिकडं पळत राहतो. मुलं त्याला हाकलू लागतात.)

टिचर -ए...थांबा...ओरडताय किती?चुकून  आलाय तो.  थव्यातून चुकला असेल म्हणून घाबरला असेल. दंगा करू नका. ती खिडकी उघडा बघू. आपसूक जाईल तो. (मुलं खिडकी उघडतात. काऊ मागे पाहात काव काव करीत निघून जातो) हां ! आपण कुठे होतो ? झाडं आपल्याला भरपूर काही देतात. आपल्या अन्न, वस्त्र आणि निवारा या प्राथमिक गरजा झाडंच भागवतात, पण मला सांगा त्या बदल्यात ही झाडं आपल्याकडून काही मागतात का ?

सर्व -(एका स्वरात) नाही...

टिचर -झाडं फक्त देत राहतात, नि:स्वार्थीपणे आणि याच त्याच्या चांगल्या स्वभावाचा माणसानं मात्र फायदा उठवला. हळूहळू एकएक करत आपल्या स्वार्थासाठी या  पृथ्वीवरची जंगलं माणूस बेफामपणे तोडत राहिला. विकासाच्या, प्रगतीच्या नावाखाली अनेक झाडं तोडली; पण त्याबदली नंतर लावली मात्र नाहीत,आणि त्याचे परिणाम आपल्याला हळूहळू दिसायला लागले.

पयोजा -म्हणजे बाई ?

टिचर -अगं, जंगलं नाहीत, झाडं नाहीत त्यामुळं पाऊस कमी झाला आणि अशी परिस्थिती  राहिली तर मग पाऊस आपल्यावर कायमचा रुसून निघून जाईल. पाण्याचे साठे संपतील आणि आपलंच नव्हे तर या पशु-पक्षांचं आणि पृथ्वीवरच्या प्रत्येक जीवाचं जगणं मुश्किल होऊन जाईल.

वरदा - पण बाई, पावसाचा आणि झाडांचा काय संबंध ?

तनिष्का -हो ना ! पाऊस तर ढगातून पडतो.

टिचर - अगं, तुम्ही म्हणता तेही बरोबर आहे. पण एक लक्षात घ्या, ही जी झाडं आहेत ना, ती पावसाचे मित्र आहेत, सखे आहेत, सोबती आहेत.

निर्मिती -म्हणजे ? नाही कळलं टिचर.

टिचर - मुलींनो, पाऊस येण्यामध्ये या झाडांचा खूप मोठा हातभार असतो. म्हणजे झाडं अडवतात वारे आणि ढग, त्यामुळे पावसाला मुक्काम टाकावाच लागतो जिथं झाडं असतात तिथं,आणि मग तो तिथं कोसळतो. नाले, नद्या, ओढे वाहायला लागतात. सगळीकडे समृध्दी येते.

पयोजा -किती छान वाटतं, पावसा मुळे सगळी कडे हिरवं हिरवं गार होतं तेंव्हा ....

टिचर -छान वाटतं ना? पण  झाडं  कमी झाल्यामुळे आणि  वायूप्रदूषामुळे तर पृथ्वीवरचं  कार्बनडायऑक्साईडचं प्रमाण वाढतंय.  त्यामुळे पृथ्वी हळूहळू तप्त होत चाललीये  आणि वातावरणामध्ये अचानक बदल होऊ लागलेत, अवकाळी  पाऊस पडू  लागलाय आणि  जेंव्हा पाऊस  हवा असतो तेंव्हा दुष्काळ पडू लागलाय. म्हणजे आपलं दोन्ही बाजूंनी नुकसान होतं. एक दिवस  लवकरच अशी परिस्थिती येईल की या पृथ्वीवर थेंबभरसुद्धा पिण्यायोग्य पाणी मिळणार नाही.  या पृथ्वीवरची सृष्टी तडफडून नष्ट होईल. एकूण काय,  आपण  झाडं वाचवली  नाहीत तर आपल्याला  कोणीच वाचवू शकणार नाही. मग मुलींनो, मला सांगा आपण काय केलं पाहिजे?

वरदा -झाडं  लावली पाहिजेत.  त्यांचं संगोपन केलं  पाहिजे. जी झाडं आहेत  ती तोडता कामा नयेत तर ती  राखली पाहिजेत. झाडांवर प्रेम  केलं पाहिजे. (इतक्यात काऊ काव काव करीत वर्गात परत येतो, ओरडतो.)

टिचर -अरे...हा कावळा परत का घुसला वर्गात? बराच भेदरलेला दिसतोय, अस्वस्थ दिसतोय. खरंतर  कावळा हा माणसात न घाबरता  मिसळणारा पक्षी पण काही विपरीत घडल्याशिवाय तो असा अस्वस्थपणे वर्तन करणार नाही.

पयोजा - मॅडम,  आम्ही  ज्या रस्तावरून  शाळेत येतो,  तिथली  खूप झाडं  तोडलेली आम्ही पाहिली. त्यातल्या कुठल्यातरी झाडावरचा असणार हा.

 

तनिष्का -हो मॅडम, आम्ही जिथून जातो ना तिथं खूप मोठं वडाचं झाड आहे. ते सुद्धा तोडणार  आहेत असं माझे बाबा म्हणत होते. तिथं खूप पक्षी असतात. त्यातला तर नसेल ना कावळा ?

निर्मिती - मॅडम, ते झाड आम्हाला खूप आवडतं. शाळेतून घरी जाता येताना आम्ही थोडावेळ तिथं थांबतो, खेळतो. त्या झाडावर खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत. फुलपाखरं आहेत. चिमण्या तर इतक्या आहेत सांगू ! तो चिवचिवाट ऐकताना खूप छान वाटतं. पण ते झाड आत तोडणार आहेत, म्हणून घाबरलाय वाटतं.

टिचर - अरे बापरे ! खूपच वाईट, दुःखद गोष्ट आहे. आपण त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे.

वरदा - मॅडम, घरी जाताना आम्ही त्या लोकांना सांगून बघतो.

पयोजा -असं सांगून ते लोक ऐकणार नाहीत.

निर्मिती -आम्ही तर लहान मुलं ! आपलंं कोण ऐकणार ?

टिचर - का नाही ऐकणार? आपण सर्वांनी मिळून जर प्रयत्न केले तर त्यांना ऐकावंच लागेल?

तनिष्का -कसं शक्य आहे मॅडम?

टिचर - शक्य आहे. या आधी आपल्या देशात असं घडलंय. ती गोष्ट मी तुम्हाला सांगते.

मुलं - गोष्ट!सांगा...सांगा.

टिचर - तर मुलांनो,1970 मध्ये उत्तराखंडात एक मोठं आंदोलन झालं होतं. त्याचं नांव होतं चिपको आंदोलन.

मुलं     -चिपको आंदोलन ?

टिचर -हां ! चिपको आंदोलन. उत्तराखंडातील सुंदरलाल बहुगुणा नावाच्या एका गांधीवादी नेत्यानं हे अहिंसक आंदोलन सुरु केलं. त्याची प्रेरणा कोण होती माहितीये? राजस्थानातल्या 350 वर्षापूर्वी खेरजीची झाडं वाचवण्यासाठी अमृतादेवी आणि इतर अडीचशे वृक्षप्रेमींनी केलेल्या बलिदानाची. त्याठिकाणी वृक्षतोड करणार्‍या ठेकेदाराला विरोध करण्यासाठी, सुंदरलालजींनी वनातील महिलांना तसेच गावकर्‍यांना प्रवृत्त केले. हातात करवती आणि कुर्‍हाडी घेतलेले मजूर पाहून सगळा गांव जंगलात गोळा झाला. या आंदोलनात 50 वर्षांची अशिक्षित गौरादेवी आघाडीवर होती. सुंदरलालजींच्या संदेशानुसार प्रत्येक झाडाला गावकरी मिठ्या मारत चिपकले. आमचे देह तुम्ही कुर्‍हाडीनं तोडले तरीही आम्ही मागे हटणार नाही. हे जंगल म्हणजे आमची आई आहे. आम्ही ते तोडू देणार नाहीआधी आम्हाला तोडा मग झाडाना तोडान असं निर्धारानी त्यानी ठेकेदाराला सांगितलं. हे गावकर्‍याचं हे आंदोलन अन्न-पाण्या वाचुन 4-5 दिवस चाललं होतं. शेवटी  गांवकर्‍यांचा निर्धार पाहून ठेकेदार मागं हटले.सरकारने कुर्‍हाडबंदीचा कायदा केला. चिपको आंदोलनाचा मोठा विजय झाला होता आणि त्यावरून प्रेरणा घ ेऊन पूर्ण देशभरामध्ये वनं वाचवण्यासाठी अशी आंदोलनं झाली आणि ती यशस्वीही झाली...हा तर आपण कुठे होतो?

पयोजा - मॅडम,  मग  आम्ही  सगळ्या मुली  एकत्र येऊन जर  असं आंदोलन केलं तर? आम्हीही म्हणू आधी आम्हाला तोडा आणि मग या झाडालातर ते मान्य करतील ?

टिचर - असं काही करू नका. उद्या आपण ठरवू, काय करायचं ते.

वरदा - मॅडम, उद्या नको आजच ठरवूया. कारण शाळेत येताना आम्ही पाहात होतो ते झाड तोडायची तयारी करत होते काही लोक.(बेल वाजते)

टिचर -बरं मुलींनो, आता शाळा सुटलीये. तुम्ही पुढं जा, तिथेच थांबा मी आलेच मागून,पाहू काय करता येतंय ते.

(अंधार)

 

प्रवेश तिसरा

(झाडाचा परिसर. मुलं येतात)

पयोजा -अहो काका, ओ काका ! हे झाड तुम्ही का तोडताय ?

मजूर 1 -अरे  बाळांनो,  आमी  इथं रस्ता  मोट्टा करण्यासाठी  साफसफाई करतोय.

जागा मोकळी करतोय.

वरदा -अहो काका, पण तुम्ही इतकं मोठं झाड का तोडताय ?

तनिष्का -मोठी माणसं सांगतात, शाळेत शिकवतात, की झाडं तोडू नका आणि तुम्हीच झाडं तोडताय?

मजूर 2 -ए पोरांनो, जावा घराकडं. आमाला आमचं काम करूद्या.

मजूर 1 -आई वाट बगत आसंल, जावा. अरं ह्ये झाड तोडायला लई येेळ लागनार हाय

आमाला! आमचा येळ खाउ नका.ओ साहेब यांना सांगा की.

मुकादम - पोरींनो, काय चालवलंय...चला पळा बरं !

निर्मिती - अहो काका, हे झाड तोडू नका. आम्हाला या झाडाखाली खेळायला मिळणार नाही. त्याची सावली मिळणार नाही.

मुकादम -पोरांनो, इथं होणार आहे रस्ता. रस्त्यावर कुटं खेळनार हायसा? आरं ए, त्या  पोरांच्या  तोंडाकडं काय  बगत बसलायसा? काम  आवर चटाचटा. चला पोरांनो, जावा घराकडं ! संध्याकाळ झालीये. आमाला काम करूदे न्हायतर साहेब ओरडतील आमाला.

वरदा - तुम्ही झाडं तोडताय हे पर्यावरणाला हानिकारक आहे.

मुकादम -तुमचं शाळेतलं ज्ञान ठेवा शाळेतच.बारकी हायसा म्हनून ऐकून घेतलं न्हायतर एकएक फटकं दिलं आसतं तुमाला. चला जावा बरं...

पयोजा -आम्ही पण चिपको अंादोलन करू.आम्ही अजिबात जाणार नाही ईथून.

मुकादम - जाणार न्हाय...बगतोच कसं जात न्हय ते (मजुराना)ए, तुम्ही चला  च्यायला...मी सायेबाला फोन लावतो...सायेब...हीथं झाडं तोडताना आम्हाला काही शाळंच्या पोरी   ताप द्याला लागल्यात. काय करू सांगा उगा काय तर झाडाची फांदी डोक्यात पडली तर नसता ताप नको...किती डाव समजावून सांगितलं तरी हालायला तयार न्हाईत. कसलं तर आंदोलन करणार म्हणत्यात.

(दरम्यान मुली एकत्र येतात, काही ठरवतात आणि अचानक त्या झाडाभोवती वर्तूळ करून उभ्या राहतात. मजूर चहा पिऊन येतात तेंव्हा त्यांना ही मुलं दिसतात.)

मुकादम - हया   पोरी हायत का भुतं ? थांबा, आता तुमच्या शाळतंच फोन लावतो.

कोन हायत तुमचं सर ?

मजूर 1 - ए पोरींनो, चला इथून आमाला आमचं काम करूद्या.

वरदा - काका,आमचं काम आम्हाला करूद्या.आम्ही आहोत या देशाचे भावी नागरिक.ही झाडं आमची ऑक्सिजन आहेत. त्यांना आम्ही तोडू देणार नाही.

पयोजा -ही  संपत्ती  आमच्या पूर्वजांनी  दिलेली. ती संपवायचा  तुम्हाला आम्हाला

अधिकार नाही. आमची सावली तुम्हाला हिसकावून देणार नाही.

वरदा -तुम्हाला पण खायला प्यायला लागतं ना ? तर त्यासाठी पाऊस लागतो. या झाडांमुळं येणारा पाऊस सगळ्या जगाला अन्न पाणी देतो. तेंव्हा झाडं तोडू नका.

मुकादम -ए पोरीनो जादा शानपना नकोय ...ए काढ रे बाजूला या पोरींना...

मजूर 1 - ए  पोरींनो,  चला  इथून (त्यांना  हाकलायला लागतो,  पण  त्या  हालत नाहीत मुकादम एकीला पारावरुन ढकलतो).

मुली - मॅडम...

टिचर -काय झालं तुम्ही काय करताय हे? कळत नाही तुम्हाला ?

मुकादम - मॅडम, अस्स्...तुमी यांच्या मास्तरीणबाई हाय काय ?

टिचर -हो...?

मुकादम -बरं  झालं मॅडम  तुमी आलासा.  हया पोरी आमास्नी  कामच करू देत न्हाईत. हितनं हालायचं नावच घेत न्हाईत.सरकारी कामात अडथळा आनत आहेत.

टिचर - अडथळा कसला ?अहो या पोरांचा लाडका मित्र असलेलं झाड, पशुपक्षी, कीटकांचं आश्रय असलेलं इतकं जुनं झाड तोडताय त्यामुळं पर्यावरणाचं आणि परिसराचं केवढं मोठं नुकसान तुम्ही करताय, कळतय का तुम्हाला?

मुकादम -अवो मॅडम, यात आमची काय चूक हाय ? आमचं हे कामच हाय.

टिचर - पण हे काम तुम्ही थांबवा.

मुकादम -अवो मॅडम आम्ही असं मध्येच काम थांबवू शकत नाही,आम्हाला टायमात काम पुर्ण करायचं असतंया...

टिचर - मग आम्ही तक्रार करायची कुठं?

मुकादम -(विचार  करुन) त्या  कलेक्टर मॅडमनी  रस्त्याची आर्डर काढली  हाय. त्यांच्या आर्डरनंच आमी ह्ये काम बंद करू शकतो.

टिचर - चालेल,आम्ही त्यांच्याकडं जाऊ पण आज आणि उद्या सकाळपुरतं हे काम तुम्ही थांबवा नाही तर आम्ही इथून हालणारच नाही.

मुकादम - त्यानंतर या पोरींची कटकट आमाला होनार न्हाई याची ग्यारंटी तुमी घेता का?

टिचर - ती जबाबदारी माझी. पण आता काम थांबवा.

मुकादम -ठीक  हाय. ए,  जावा  रं घराकडं.  आज काम थांबवा.  मॅडम,  उद्या  मातूर आमाला थांबता येनार नाय. (मुकादम, मजूर जातात)

टिचर - तर मुलींनो, उद्या सकाळी शाळा सुरू व्हायच्या आधी कलेक्टर ऑफिसमध्ये जाउया. घरी  सांगून या. मी फोन करून अपॉईन्टमेन्ट  घेऊन ठेवते. चला आता सगळया निश्‍चिंत घरी जा.

(अंधार)

 

(कलेक्टर ऑफिस)

शिपाई     -मॅडम इंजिनीयर जोशी साहेब आलेत

कलेक्टर -हा, पाठवा त्यांना.

जोशी   -नमस्कार मॅडम...

कलेक्टर -त्या बायपास रस्ताच्या रुंदीकरणाची फाइल, नकाशा आणलाय ना?

जोशी   -येस मॅडम. हा पहा.

कलेक्टर - त्या रस्यावरच्या झाडांच काय ?

जोशी   -अंदाजे 20 लहान आणि 10 मोठी झाडे काढावी लागतील. काम सुरू झालंय त्यांचं. सर्व परवानगया घेउन आम्ही रीतसर मान्यता घेऊन ती झाडं हटवत आहोत. त्याच्या बदल्यात नियमाप्रमाणे नविन झाडंही लावणार आहोत.

कलेक्टर -ठीक आहे ...

शिपाई     -मॅडम आपल्याकडे शाळेतल्या शिक्षिका आणि काही मुली आल्यात.

कलेक्टर -हा पाठवा त्यांना. (सगळे येतात)

टिचर - आम्ही येऊ का मॅडम?

कलेक्टर - या बसा मुलींनो. तुम्हीही बसा.

टिचर - मॅडम, तुम्ही इतकी अर्जंट अपॉईन्टमेन्ट दिलीत, त्याबद्दल थँक्स.

कलेक्टर -याच का त्या आंदोलन करणार्‍या मुली?

टिचर - आंदोलन वगैरे नाही मॅडम, आमचं एक छोटसं निवेदन होतं फक्त.

कलेक्टर - (शिपायाला) हे इनवर्ड करून घ्यायला सांगा.

कलेक्टर - मॅडम  तुमची तक्रार  पोहोचली मला म्हणुन  मी आमचे एक्झिकेटिव्ह इंजिनीअर  जोशींना पण बोलावलय.तुमचं म्हणणं  रास्त आहे. ते रीतसर मान्यता घेऊन ती  झाडं हटवत आहेत. त्याच्या बदल्यात नियमाप्रमाणे नविन झाडंही लावणार आहेेत.

वरदा - मॅडम...

टिचर - हो हो...मॅडम  आपली परवानगी असेल तर आमची विद्यार्थिनी  काही बोलली तर चालेल का?

कलेक्टर -बोल बोल, अगदी बिनधास्त बोल.

वरदा - मॅडम नमस्कार .मी वरदा... मला थोडसं बोलायचं आहे...आम्हाला नेहमी शिकवलं जातं  झाडे लावा, झाडे जगवा. ती तोडू नका आणि तुम्हीच झाडे तोडायला सांगता?

कलेक्टर -खरंय तुझं...पण आपल्याला आपल्या गावाचा विकास करायचा असेल, प्रगती  करायची असेल  तर चांगले मोठे  रस्ते आवश्यक आहेत  ना! त्याशिवाय या भागात इंडस्ट्रिज येणार कशा, शिवाय रस्ते छोटे असल्याने अपघात  होतात. वाहतुकीची कोंडी होते तेव्हा  प्रगती करण्यासाठी काही गोष्टी मनात नसतानाही  कराव्या लागतात. रस्याला अडथळा होणारं ते झाड तोडावंच लागणार आम्हाला.

निर्मिती - मॅडम,  ते  मोठं  झाड तुम्ही  पाहिलंत का ?  खूप  पक्षी  आहेत त्याच्यावर.आम्हीच नव्हे तर आमचे वाडवडीलसुद्धा त्याच्याच छायेमध्ये वाढलो, खेळलो असं सांगतात.

टिचर - मॅडम,परवाच  तुम्ही एके  ठिकाणी वृक्षारोपण  केलंत ना ?तेव्हा तुम्ही म्हणालात,मी वृक्षारोपण केलंय खरं पण ते झाड जगणार काआणि वाढणार का? केंव्हा मोठं होणार आणि केंव्हा सावली देणार याची मला काळजी वाटते.

कलेक्टर - हो खरंय ! त्या इवल्याशा नाजूक रोपाकडं पाहताना मला वाटलं होतं तसं. त्याच्या या प्रवासात ते मरून जाणार नाही ना? अशी काळजी वाटली होती. जगलं नाही तर फार वाईट वाटेल, असं म्हंटलं होतं खरं.

टिचर - मग मॅडम, जे तोडलं जाणारं झाड आहे ना ते ज्यांनी लावलं असेल, वाढवलं असेलसांभाळलं असेल त्यांना आणि त्या निसर्गाला, त्याच्यावरती राहणार्‍या पशुपक्ष्यांना, कीटकांना किती वाईट वाटत असेल? आपला आसरा जाणार या  भीतीनं किती भेदरले असतील ते?  आपल्यासाठी  रस्ता होईल पण त्यांचं काय ? हा निसर्ग त्यांचाही आहे. हे निवेदन म्हणजे या  मुलींबरोबर त्या सर्वांचीही कळकळीची विनंती आहे असं समजा...नाहीतर आपण मोठेयांना जे शिकवतो त्यात आणि जे प्रत्यक्ष वागतो त्यात खूप अंतर आहे, खोटेपणा आहे असं त्यांना वाटेल. त्याचा शिक्षणावरचा, चांगुलपणावरचा विश्‍वास उडून जाईल.

मुली - मॅडम,करा ना काहीतरी ते झाड वाचवा...(गयावया करु लागतात)

कलेक्टर - काही चांगला पर्याय मिळाला तर...मी निश्‍चित विचार करीन...मुलींनो माझी पण इच्छा आहे झाडं वाचावी. जोशी काहीच मार्ग नाही का?

जोशी - मॅडम, आपली परवानगी असेल तर बोलू का?

कलेक्टर -बोला...

जोशी   - मॅडम,या मोठ्या झाडांना वाचवता येईल असा पर्यायी मार्ग काढता येईल.

कलेक्टर -तो कसा काय?

पाटील - (नकाशा दाखवत)...काही ठिकाणी ही मोठ्ठी झाडे मध्यात ठेऊन दोन्ही बाजूंनी रस्ता

मोठा करता येईल ,त्यामुळं या  रस्त्यावरची जास्तीत जास्त झाडं वाचतील आणि रस्ताही होईल.

कलेक्टर - गुड...वा जोशी! अहो आधीच करायचं हे,असो,मग आता लगेच हा नवीन प्रस्ताव तयार करा,जोशी आपल्याला विकास आणि प्रगती हवीच पण विनाशाच्या मार्गावरून नको. ही देशाची भावी पिढी जशी संपत्ती आहेत तशीच ती झाडेसुध्दा देशाची संपत्ती आहे. दोन्हीचंही जतन करायची आपली जबाबदारी आहे...मुकादम घाडगेंना फोन लावा आणि सांगा,मॅडमची ऑर्डर आहे की, काम ताबडतोब थांबवा.

जोशी - ओके मॅडम,येतो मी.

कलेक्टर -थांबा कॉफी घेऊन जा.(शिपायाला) आपल्यासाठी कॉफी आणि या स्मार्ट मुलींसाठी आईस्क्रीम मागवा.

मुली       -आईस्क्रीम ?

(अंधार)

काऊ -        चला या रे सगळेजण बघा, मी म्हंटलं नव्हतं. काव काव निघेल काहीतरी मार्ग

राव.  आपलं झाड  वाचलं,  पोरींचं  आंदोलन यशस्वी  झालं. अशीच असते एकतेची शक्ती. कधी कधी श्रेष्ठ ठरते नामी युक्ती...या रे. सगळे या .(गीत)

(पडदा)

----------------------------

सदर एकांकीकांचे सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन आहेत. त्यांचे प्रयोग करण्याआधी लेखकाची परवानगी आवश्यक आहे.

दोन्ही चित्रे चिपको आंदोलनाशी संबंधित आहेत. एक तत्कालीन मिनिएचर पेंटिंग आहे तर दुसरे प्रत्यक्ष छायाचित्र आहे. दोन्ही इमेजेस पक्रिएटिव्ह कॉमन्स या प्रताधिकाराअंतर्गत येत असल्याने श्रेयअव्हेर घोषित करत प्रकाशित केली आहेत