टोपीवाला आणि माकडे

 या नाटकाचा एक प्रयोग काही पालकांनी पहिलीच्या मुलांसमोर नुकताच केला. त्या हौशी पालकांच्या प्रयोगाची ध्वनिचित्रफीत संहितेखाली शेवटी दिली आहे. तो प्रयोगही नक्की बघा.

-----------------------------

टोपीवाला आणि माकडे
लेखक: ऋषिकेश

~प्रवेश १~

(पडदा उघडतो तेव्हा मंचावर एक झाड आणि त्यामागे माकडं लपून असतील. जंगलातील आवाजाची ध्वनी. आवाज कमी होत जातात आणि सूत्रधार प्रवेश करतो)

सूत्रधार: बा अदब, बा मुलाहिजा.. होश्शियार!! आता तुमच्या समोर येणार आहे एक मजेदार गोष्ट... गोष्ट नुसती ऐकायची नाही तर पाहायची सुद्धा आहे.

ही गोष्ट पहायला तय्यार? चला तर.

ही गोष्ट तशी ओळखीची,

आपली तुपली नेहमीची

हुशार टोपीवाल्याची

नि गंमतशीर माकडांची

(डमरू वाजवत विंगेत आणि दुसऱ्या विंगेतून (इथे प्रवेश प्रेक्षकांतून शक्य) टोपीवाल्याचा प्रवेश होतो. सफेद सदरा आणि लेंगा घालून टोपीवाला येईल. डोक्यावर एक टोपी. पाठीवर गाठोडं असेल. त्यात माकडांच्या संख्येइतक्या टोप्या, शिदोरी)

टोपीवाला: (गात एंट्री करतो. चाल: "आला आला आला आला फुगेवाला आला")

आला आला आला आला टोपीवाला आला

छोट्या मोठ्या रंगेबीरंगी टोप्या घेऊन आला

टोप्या घ्या घ्या घ्या टोप्या घ्या (२)

(प्रेक्षकांना उद्देशून): राम राम! मी टोपीवाला आहे हे तुम्ही ओळखलं असेलच. मी हा असा जंगलात का फिरतोय, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल ना? त्याचं काय आहे माझ्या गावात आता सगळ्यांकडेच टोप्या आहेत.माझ्या टोप्या कोणीच घेईना, म्हणून म्हटलं दुसऱ्या गावाला जाऊ आणि तिथे विकूयात टोप्या. तिथेच चाललोय तर वाटेत हे जंगल! आता मला लागलीये भूक. जरा बरी जागा मिळाली की नुसतं खाणंच नाही तर एक झोपही काढेन म्हणतो. एखादं पाणी आणि छान सावली देणारं झाड हवं..
(झाड बघत) हा! हे झाड मस्तंय, खाली मोकळी जागाही आहे.
(बसतो, गाठोड्यातून शिदोरी काढून खातो, नदीवर पाणी पितो आणि झोपतो. झोपताना गाठोडे उशाला घेतो मात्र त्यातून टोप्या निघू शकतील अशा बेताने झोपावे.)

सूत्रधार: (प्रेक्षकांना)तर मित्रमैत्रिणींनो, आता झाडावर कोण असेल बरं? (प्रेक्षकांतली मुलं उत्तर देतील) बरोब्बर माकडं! (माकडं झाडामागून चेहरे बाहेर काढतील, डोकी खाजवतील, एकमेकांना वेडावून दाखवतील - एक दोनदा हशा येऊ देत)
आता ती माकडं काय करणार? (मुलं उत्तर देतील की टोप्या वर घेऊन जाणार - त्यांनी उत्तर दिलं की माकडं एकमेकांना खुणावणार, कानात बोलणार आणि टोप्या घेऊन झाडावर/मागे जाणार, त्याचं काय करायचं याचं खुणेने डिस्कस करणार आणि मग टोप्या डोक्यावर घालणार. मग टोपीवाला जागा होणार.)

(टोपीवाला उठणार, आळोखे पिळोखे देणार, आपलं गाठोडं उचलणार तर काय ते रिकामं!)

टोपीवाला: अरेरेरेरेरेरेरे टोप्या कुठे गेल्या? (गाऊ लागतो. चाल तीच सूर दु:खी)

अशा कशा अशा कशा टोप्या गायब झाल्या

आता होत्या निघून गेल्या कशा कुठे गेल्या

टोप्या द्या द्या द्या, टोप्या द्या! टोप्या द्या द्या द्या, टोप्या द्या!

 (प्रेक्षकांना विचारणार) पाहिल्यात का हो टोप्या? (प्रेक्षकांतली मुलं सांगतील उत्तर)
ओहो! इथे या जंगलात माकडं आहेत होय माहीतच नव्हतं. काय बरं करावं?

(डोकं खाजवणार - लगेच सगळी माकडं डोकं खाजवणार... अशा दोन चार निरनिराळ्या मजेशीर कृती कराव्यात त्याचं माकडांनी अनुकरण करावं )

टोपीवाला: आयडिया! माझी नक्कल करता काय! (असं म्हणून गाठोड्याच्या कापडावर टोपी टाकणार.. माकडंही टाकणार टोपीवाला टोप्या घेऊन जाणार! गाणं गात जाणार)

आला आला आला आला टोपीवाला आला

माकडांकडून हुश्शारीनं टोप्या घेऊन आला

टोप्या घ्या घ्या घ्या टोप्या घ्या

सूत्रधार: काय कशी वाटली गोष्ट, पण माहितीए का आमची गोष्ट इथे संपत ना ही बरं! पुढे सांगू काय झालं ..

सांगतो, सांगतो..

ही गोष्ट नाही नेहमीची,

फार वर्षानंतरची

त्याच्या खापर पणतूची

नि गंमतशीर माकडांची

 (सुत्रधार मंचावर असतानाच प्रकाश कमी कमी होत जातो. )

प्रवेश २

(शक्य असल्यास पार्श्र्वभूमी रस्ता आणि आधुनिक इमारतींची. स्टेजवर झाड व सुत्रधार तिथेच. सुत्रधाराच्या पोशाखात फार बदल अपेक्षित नाही. मागे नवी माकडे लपलेली. सुरवातीला गाड्यांचा, रहदारीचा आवाज येतो, कमी होत जातो.)

सूत्रधार:  अरे इथे सगळं बदलंय की नाही.. तर काय झालं माहितीये का? काही वर्षांनी त्याच टोपीवाल्याचा खापरपणतू त्याच जंगलात आला!

टोपीवाला: (जीन्स टीशर्ट घालून, डोक्यावर फेल्ट हॅट, कानात हेडफोन्स, पाठीवर सॅक नि त्यात टोप्या, गात गात शिरतो.. )

"सुहाना सफर पण दुखले माझे पाय...

सुहाना सफर पण दुखले माझे पाय!"

(किंवा) हकूनामटाटा .... हकूनामटाटा 

छ्या! हे खापरपणजोबा आजोबा फार चालायचे बुवा. आता मला तर कोपऱ्यावर जायलाही स्कूटर लागते. कुठून ठरवलं खापरपणजोबांसारखं टोप्या विकायला चालत जायचं कोण जाणे. त्यांनी त्यांच्या प्रवासाबद्दल लिहूनही ठेवलं होतं तेच लिखाण आता आम्ही मोबाईल ऍपमध्ये ठेवलंय. त्यानुसार बघायचं तर रस्त्यात घनदाट जंगल हवं, पण इथे एक झाड दिसेल तर शपथ! एवढा मोठा रस्ता बनवलाय त्यात सगळी झाडं तोडून टाकलेली दिसतायत. बसने किंवा कारने न जाता त्यांच्यासारखंच चालत यायचं म्हटलं पण किती ते ऊन! त्यांचं ठीक होतं, त्यांना घनदाट जंगल वगैरे होतं, नदी होती. आता बघा सगळं रखरखीत! तुम्हाला माहितीए का त्यांना एकदा तर झाडावरच्या माकडांनी लुटलंही होतं. हा हा हा (पोट धरून हसतो. पुन्हा चालू लागतो)
सुहाना सफर पण दुखले माझे .. अरे वा! हे एक डेरेदार झाड शिल्लक आहे की! वा वा वा! इथे खाली छान पारही बांधलाय. इथेच बसतो आणि जेवतो, एक झोप काढतो आणि पुढे निघतो. (आधीच्या टोपीवाल्यप्रमाणे खाऊन झोपतो. झाडामागून एकदोन माकडं डोकावतात पण त्याचं लक्षच नाही)

सूत्रधार: अरेच्या! हा झोपतोय काय अरे त्याच्या खापरपणजोबांचा अनुभव विसरला की काय! अरे बापरे ही माकडं आलीच.. मी पळतो

(इथे माकडं बाहेर येतात)

माकड १: अरे हा बघ टोपीवाला!

माकड २: तुला कसं कळलं?

मा१: त्याच्या बॅगमधून टोपी बाहेर आलीय बघ!

मा३: हो की! चला घेऊयात

मा४: अरे अरे थांबा!.. आजोबांनी काय सांगितलं होतं. टोप्या घ्यायच्या नाहीत म्हणून

(मा१, मा३ नुसते हसू लागतात आणि टोप्या उचलतात. मा४ गोंधळून बघतो)

मा२: उचल रे! सांगतो गंमत! ( मा४ च्या कानात काहीतरी सांगतो. मा२, मा४ टोप्या उचलतात)

(टोपीवाला उठू लागतो. मा३ सावध करतो. सगळे हसतात, एकमेकांना टाळ्या देतात आणि पुन्हा झाडामागे जातात)

 टोपीवाला: (आधीच्या टोपीवाल्याची आठवण होईल इतकं कृतीत साधर्म्य. बॅग हलकी लागते, बघतो, टोप्या गायब!) अरेच्या! इथे जंगल नाही तर, मला वाटलं माकडंही नसतील!! आता काय करावं. मला जितकं आठवतंय माझ्या खापर पणजोबांनाही हाच प्रॉब्लेम आला होता. थांबा बघतो त्यांनी काय केलं.

(खिशातून मोबाइल काढतो, वाचण्याचा अभिनय)

टोपीवाला: ओह! हा हा हा! ही माकडं कसली भोळी आहेत. इतकं सोप्पं आहे हे! आपले पणजोबा हुशार होते म्हणायचं! बघूया तरी माकडं ते म्हणतायत तसं करतात का?

(डोक्याला हात लावतो, माकडंही लावतात, इतर कृतींचंही अनुकरण माकडं करतात.)

(मुलांना विचारतो) आता टोपी फेकू? (मुलं हो म्हणतील मग टोपी फेकतो. माकडं नुसतीच हसतात.

उचलून पुन्हा टोपी फेकतो, माकडं एकमेकांना टाळ्या देतात)

टोपीवाला(माकडांना उद्देशून): ही चिटिंग आहे. माझ्या आजोबांनी सांगितलं होतं की तुम्ही टोप्या फेकता म्हणून

चारही माकडं (वेडावून दाखवत): आम्हालाही आजोबा होते म्हटलं!

(टोपीवाला डोक्याला हात लावतो)

टोपीवाला (स्वगत): काय करावं बरं. त्यांच्याशीच बोलून बघावं लागेल. (माकडांकडे बघत) आता काय तुम्हीच सांगा काय केलंत तर त्या टोप्या द्याल!

माकडं खाली उतरतात आणि फेर धरून गाऊ लागतात: (चाल: ए आई, मला पावसात जाऊ दे)

कोरस: टोपीवाल्या, आम्हा खेळायला मिळू दे

तुझ्याकडे किती टोप्या एक आम्हा घालूदे

 

माकड१:

इथे कितीतरी झाडं होती

वाऱ्यासंगे खेळत होती

तेव्हा तुझ्या टोप्यांना काय भाव होता रे?

 

माकड २:

आता खेळाया नाही सावली

घरात बसुनी खेळतो भावली

आमचे मित्र प्राणी पक्षी दूर दूर गेले रे

 

माकड ३:

आता ऐक सांगतो मी काय

वेळ अजूनही गेली नाय

प्रत्येकाने लावून झाड काळजी त्याची घेऊ रे

 

टोपीवाला: म्हणजे काय?

एक माकड: एवढं गाऊन दाखवलं तरी नाही कळलं. आम्हाला टोप्या नकोयत, त्या आम्ही देऊही पण त्याबदल्यात आम्हाला काय देणार?

टोपीवाला: काय हवंय सांगा.

माकड३: ऐक आम्हाला दोन गोष्टी हव्यात.

१. एक म्हणजे आमच्याशी खेळा, आम्ही बोअर झालोय

२. आमचे फोटो हवे आहेत. (इथे प्रेक्षक मुलांकडून करून घ्यायची कोणतीही गोष्ट अट म्हणून घेता येईल)

टोपीवाला (माकडांना): मी कॅमेरा काही आणलेला नाही नि मोबाईल बॅटरी आताच संपली, पण माझे काही मित्र मैत्रिणी आहेत ते तुम्हाला तुमचं चित्र काढून देऊ शकतात. आणि नक्की खेळूया, पण आधी टोप्या द्या

(मुलांकडे पाहून): तुम्ही कराल मदत? (मुलं हो म्हणतील.) (माकडांना -) झालं का आता.

माकड १: हो झालं थँक्यु.

माकड २: खरंतर ना आम्हाला आणखी एक गोष्ट हवीय

टोपीवाला: आता काय?

माकड २: आमचं ना जंगल हरवलंय. त्यामुळे ना आम्हाला निवारा आहे ना अन्न आहे ना इतर मित्रप्राणी. मग असं कोणी आलं की खायला, खेळायला लावावं लागतं. ही थोडी झाडं उरली आहेत ती आम्हाला पुरत नाहीत. आमचे कितीतरी मित्र दूरवरच्या जंगलात गेलेत. तुम्ही दिलेले वेफर्स खाऊन आमचे घसे खराब झालेत.

माकड३: माझी एक मासोळी मैत्रीण होती, पण नदीतलं पाणी इतकं खराब झालंय की ती तिथे राहूच शकत नाही. आता मला खेळायलाच कोणी नाही.

चौथं माकडः आमचं जंगल हरवलं आहे. द्याल मिळवून परत?

टोपीवालाः ते मी कसं देणार? मला आवडेल द्यायला पण मी काय करू?

एक माकडः तू आणि तुझ्या ओळखीतल्या प्रत्येकाने एक झाड लावून ते पूर्ण वाढेपर्यंत त्याची काळजी घ्याल ? आता सुरूवात म्हणून इतकंही पुरेल.

टोपीवालाः मला तुमचा मुद्दा पटलाय. आता टोप्या विकताना मी लोकांना हे ही सांगणार आहे. तुमचं हरवलेलं जंगल आता आम्ही पुन्हा मिळवून देऊ! मुलांनो लावाल ना तुम्हीही झाडं? (प्रेक्षक/मुलं हो म्हणतील)

(माकडं खूश होऊन फेर धरतात. इतरही सर्व पात्र सामील होतात.) (चाल: झिंगाट)

 जंगलात आला टोपीवाला आजच्या दुपारी

अन टाकली डोक्यावरची टोपी त्यानं बघा खाली

माकडं अधीर झालीया, आन बधिर झालीया

त्याचं बघून त्यांनी टोपी फेकून दिलीया

हासतंय रंगात, पळतंय बुंगाट, घेऊन टोप्या त्या

झालं झिंग झिंग झिंग झिंगाट...

 

त्याचा खापणपणतू आला बघा बाशिंग बांधून

हातापायावरती कसली चित्रं टॅटूनं गोंदून

पण माकडं हासतीया, वरचढ ठरतीया

आन करून त्याचा पचका त्याच्या टोप्या चोरतीया

टोपीवाल्यास झाडांचं प्रॉमिस घेऊन सोडतीया

झालं झिंग झिंग झिंग झिंगाट...

 

समद्या माकडांना झाली आता जंगलाची घाई

खाली हिरवंगार रान वर आभाळाची शाई

आता जंगल वाढलंया, आन् मंगल झालंया

फळांनी वाकल्या झाडावरती दंगल चाल्लीया

हिरव्या रानात मित्रांची संगत माकडं नाचातीया

झालं झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट...

(सगळी पात्रं नाचत विंगेत जातात)

समाप्त

===============================

श्रेय आणि प्रताधिकारासंबंधी सूचना:
या नाटकाची संहिता लेखकाने मुलांसाठी कुठेही मोफत होणाऱ्या प्रयोगांसाठी खुली केलेली आहे. फक्त प्रयोग करतेवेळी संहितेच्या लेखकाचा योग्य तो नामनिर्देश करावा इतकीच विनंती आहे. 
सशुल्क प्रयोगांसाठी तसेच इतर कोणत्याही माध्यमांत/भाषेत रूपांतर करायचे असल्यास लेखकाची परवानगी आवश्यक. त्यांच्याशी अटकमटक.कॉम द्वारे संपर्क साधता येईल

अटकमटकतर्फे आवाहन:
या संहितेचा प्रयोग तुम्ही पालक मिळून किंवा शिक्षक मिळून सादर करणार असाल किंवा मुले सादर करणार असतील तर आमच्या monitor.atakatak@gmail.com या इमेलपत्त्यावर जरूर कळवावे. आम्ही प्रयोग बघायला येण्याचा पूर्ण प्रयत्न करू.

===============================

ध्वनिचित्रफीत:

सदर नाटक एकदा पहिलीच्या मुलांसमोर त्यांच्याच आईबाबांनी सादर केलं. नाटकाचा संच हौशी असूनही मुलांनी नाटकाचा आनंद लुटलेला त्यांच्या आवाजातून/उत्तरांतून जाणवेलच!