मनाची पार्टी (कथा)
मनाची पार्टी
लेखन: अनुजा सामंत
चित्रे: अदिती विजय कापडी
“शी बुवा! मला ना त्या अनन्याच्या बर्थडे पार्टीला जाम बोअर झालं." काहीशी धुसफूसतच अद्विका घरात शिरली. “मी आता कोणत्याच बर्थडे पार्टीला जाणार नाहीये. एवढी तयारी करायची थीमसाठी. आणि बदल्यात काय मिळणार? हे एवढंसं, असलं रिटर्न गिफ्ट?"
आई अद्विकाच्या चिडचिडिकडे काहीसं दुर्लक्ष करत होती. गेल्या काही दिवसांपासून तिचं बदललेलं हे वागणं आईला कळत होतं, पण अजूनतरी आई अद्विकाला काही बोलली नव्हती. “मला तर बर्थडे मेनू पण काही विशेष आवडला नाही. काहीतरी स्पेशल असेल, बंगल्यात राहणारे लोक आहेत, नेहमीप्रमाणे भरपूर पाहुणे असतील, काहीतरी प्रोग्रॅम अरेंज केला असेल असं मला वाटलं होतं. हे खूप कॉमन आहे आजकाल. पण एवढ्या बेसिक गोष्टी सुद्धा नव्हत्या."
आता मात्र हळूहळू फुणफुण वाढतेय म्हटल्यावर आईने तिला विचारले, “नक्की काय सांगायचं आहे? त्रास कसला होतोय? पार्टी तुझ्या मनासारखी नव्हती त्याचा की तुझ्या बर्थडेला पार्टी कशी हवी हे सुचवायचं आहे तुला?"
आईचे हे शब्द ऐकून अद्विका अजूनच वैतागली. “आई ना, मी काय सांगते ते कधी ऐकत नाही. नुसते प्रश्न विचारत राहते. आणि ठरलाय ना, मी पार्टी देणार नाहीये. मग हा प्रश्न येतोच कसा?" स्वत:शी बडबडत ती बाबांकडे गेली.
“ही आई बघ ना बाबा, मी सांगते काय आणि ती बोलते काय? मी सांगतेय ते अनन्याच्या पार्टीबद्दल, आणि हिचं काहीतरी वेगळंच! आपल ठरलंय ना, माझ्या पार्टीचे काय ते! तरी ही मला असं कसं विचारू शकते? मला ना बोलायचंच नाहीये हिचाशी. अशक्य आहे ही."
“तुला नेमका राग कसला आलाय आईचा की पार्टीचा?" बाबाने विचारले.
“बाsबाss." तिथूनही पाय आपटत अद्विका तिच्या रूममध्ये निघून गेली.
सुरुवातीचा काही वेळ उगाच चाकचुक करत, वाकड्या तोंडाने खोलीभर फिरत राहिली. नंतर वस्तू उगीचच इकडे-तिकडे करायला लागली. मग आरशासमोर उभी राहिली आणि जोरजोरात बोलायला लागली “बघ कशी दिसतेयस आता? मगाशी इतकी सुंदर दिसत होतीस. तू ड्रेसमुळे छान गुलाबी दिसते आहेस की तुझ्या गुलाबी रंगामुळे ड्रेस खुलून दिसतो आहे हेच कळत नव्हते. आणि आता बघ दोघेही अगदी - अगदी वाईट्ट दिसतायत. चिडका चेहरा अन उदास ड्रेस.” आरशातल्या अद्विकाकडे तोंड वेडावलं आणि पटापट कपडे बदलले. तोंड स्वच्छ धुतले आणि पुन्हा आरशासमोर येऊन उभी राहिली. “Now, you are looking much better." स्वतःकडेच म्हणत हसली आणि धावत बाहेर येऊन आईच्या गळ्यात पडली.
आईनेही तिला अगदी जवळ घेतले. “thats great, looking fresh" आईच्या स्तुतीनेती अजूनच खुलली. “मला खूप भूक लागली आहे.", तिने आईला सांगितले.
“अगं, पण तू पार्टीला गेली होतीस. म्हणून मी फक्त आमच्या आवडीची खिचडी झटकन टाकली. सकाळची पोळीभाजी आहे. ती खातेस का? की पटकन पोळीची Frankie बनवून देऊ?" आईचे प्रश्न मध्येच थांबवत अद्विका म्हणाली, “अगं, तसं खाणं झालंय तिथे. फक्त पोट भरलं नाहीये. थोडीशी खिचडी चालेल ना. तशीही तुझ्या हातची गरमागरम खिचडी वर तुपाची धार कोण सोडणार?"
एरवी खिचडी पहिली की नाक मुरडणारी अद्विका आज चक्क खिचडी खायला तयार आहे हे पाहून आई चक्रावलीच. तिचे काहीतरी बिनसले आहे हे दोघांनाही समजले होते. पण ती स्वत: हून बोलेल ह्याची दोघांना खात्री होती. जेवण झाल्यावर अद्विकाने आईला आवराआवर करायला मदत केली. झोपायची तयारी सुरु झाल्यावर मात्र अद्विका त्यांच्याशी बोलायला आली.
“आई, बाबा, मी तुम्हाला अगदी खरं सांगू का? मला पण खरंतर माझ्या वाढदिवसाला पार्टी द्यायची होती मैत्रिणींना."
“आदू… "
बाबा काही बोलणार तर त्याला थांबवत ती म्हणाली, "ऐक न बाबा, मला तसं आधी वाटत होतं, पण आता वाटत नाहीये तसं. कारण, मला तुमचं म्हणणं पटलं. खरंच माझ्या काही मैत्रिणी आहेत, त्यांच्या आईबाबांना ह्या लॉकडाऊनमध्ये काम नाहीये, त्यांना मजा करता येत नाही. अशावेळी मी पार्टी करणार, तर त्यांना गिफ्टसाठी खर्चात टाकणार. शिवाय मजा करताना त्यांना वाईट वाटू शकते. म्हणुन पार्टी नाही हे पटल मला."
“हो!कारण गिफ्ट, रिटर्न गिफ्ट शिवाय वाढदिवस होतात हे तुम्हाला मान्य नसत." आईने सांगितले.
हे ऐकल्यावर अद्विकचा चेहरा पुन्हा पडला. पण तरीही तिने पुन्हा बोलायला सुरुवात केली, “अनन्याच्या बर्थडेच्या निमित्ताने मला मजा करता येईल असं वाटत होत. त्यांच्याकडे कसं सगळं परफेक्ट प्लॅन्ड , ऑर्गनाइज्ड असतं. फॅमिली, फ्रेंड्स सगळे एकत्र येतात. भरपूर माणसं असतात. धमाल-मस्ती असते. पण, तिथे गेल्यावर लक्षात आले की तिचा मामा, आजी आजोबा येणार नाहीयेत. तिच्या आजीची तब्येत अचानक बिघडली. तिलाअॅडमिट केलेय. म्हणून सगळी पार्टी कॅन्सल केली. फक्त अनन्याला वाईट वाटू नये म्हणून आम्हा काही ५-६ मैत्रिणींना बोलावलं. तिचं औक्षण केलं. केक वगैरे कापला. एवढा मोठा केक, एवढं सगळं जेवण त्यातलं थोडंसं ठेवून बाकी परस्पर बाहेर दिलं. आम्ही काही मैत्रिणी होतो तिथे. पण कोणाचा पार्टी चा मूड नव्हता. अनन्याला वाईट वाटू नये, म्हणून पार्टी दिली. खरंतर तिचा मामा रिटर्न गिफ्ट आणणार होता, पण तो आला नाही, तर तिच्या आईने ही छोटी कार्ड्स आम्हाला रिटर्न गिफ्ट म्हणून दिली. माझ्या अपेक्षेप्रमाणे काही नव्हते तिथे म्हणुन माझाही मूड गेलेला खरंतर. पण कार्ड्स देताना काकूंच्या डोळ्यात पाणी होते. तेव्हा आई तू म्हणते ते कळले. वाढदिवस साजरा करायला गिफ्ट्स आणि रिटर्न गिफ्ट्सची गरज नाही. पण … तरीही….”
अद्विका बोलताना अडखळायला लागली. तिला नेमकं काय वाटतंय ते कळत नव्हतं. किंवा शब्दात मांडता येत नव्हतं. पण बाबा त्यावर लगेच बोलला, “अग पण तू मनात अपेक्षा ठेवली होतीस, स्वप्न पाहिलं होतं, की तुला तिथे कसं एन्जॉय करता येईल आणि ते सगळे उलट झाल्याने तुला त्रास झाला. त्रास होतोय ते चूक आहे हे कळलं, तरी असा कसा मी त्रास करून घेते? म्हणजे मी चूक करते? असाही विचार पुन्हा करत राहिलीस. नाही का?”
“नाही. म्हणजे मला कळलं, की जरी माझ्या मनाप्रमाणे झाले नाही तरी चिडचिड करायची नाही. पण मग अनन्याच्या आजीला बरं नाही, तरी तिची आई तिच्यासाठी सगळे करतेय, हे अनन्याला का समजत नाही? तिने स्वतः पार्टी कॅन्सल नको का करायला? ती अशी कशी वागू शकते? ह्याचा राग यायला लागला.”
“अगं, अनन्यावर कशाला चिडते? तिची इच्छा नसेलही, घरातल्या मोठ्यांनी तिला वाईट वाटू नये म्हणून सांगितले असेल. किंवा तिचा हट्ट असेल तरी तिला कळेल काही दिवसांनी. आई बाबा नाही म्हणणार मग ती तोंड एवढे करून बसणार, त्यापेक्षा त्यांना हा योग्य मार्ग वाटला असावा. समोरचा माणूस कसा वागतो हे आपण ठरवू शकत नाही. "
अद्विकाने नुसतीच मान डोलावली.
“आई, तुम्ही सगळे कसा सतत मुलांचा विचार करता गं? घरी आल्यावर पण बघ; तू लगेच खिचडी कशी खाशील? काय बनवून देऊ? विचारत बसलीस. आम्ही किती त्रास देतो ना ग तुम्हाला?" असं म्हणून रडायलाच लागली.
आईबाबांनी दोघांनी तिला जवळ घेतलं. “मी फ्रेश झाले तेव्हा मला कळलं की आरशासमोर उभं राहून मी जसं माझ्याबद्दल बोलेन, तशीच मला मी दिसेन. काय होतं सांगू का? मी काहीतरी ठरवलं, आणि तसं झाल नाही, की माझी चिडचिड होते. बरेचदा माझं चुकीचं असतं. पण मग काय बरोबर आणि काय चूक ह्यातच जास्त गोंधळून जाते. आरशासमोर उभी राहिले आणि छान मनापासून हसले की छान वाटत होते. चिडका चेहरा केला की त्रास होत होता. मला आता कळलंय की खूष व्हायचं की नाराज हे मी ठरवू शकते. म्हणून मी खूष व्हायचं ठरवलं. आणि म्हणूनच मला आजपासून खिचडी सुद्धा आवडायला लागली आहे." अद्विका असं म्हणत एकदम गोड हसली.
"वाढदिवस यायच्या आधीच छोटी अद्विका मोठी झाली की! आज अनन्याचा नाही, बहुतेक अद्विकाचाच वाढदिवस आला म्हणायचा!" बाबा बोलला आणि तिघेही हसायला लागले.