पंढरीचा चोर (गोष्ट)

पंढरीचा चोर
लेखन: अमृता गोटखिंडीकर
चित्र: ज्योती महाले


“दुधूला पराठ्यासोबत दही नको हा, तूप दे” आजी म्हणाली, तसा दुधुला राग आला. सारखं कसं आजीचं ‘हे नको करू, ते नको करू’ असं असतं. उभ्याउभ्या गटागटा पाणी पिऊ नको, सोफ्यावर दडादडा उड्या मारू नको, जेवण झाल्यावर गडबडा लोळू नको. दुधुला आजीचा खूप राग आला होता, पण गटागटा, दडादडा, गडबडा असे शब्द आठवून हसूपण आलं. तरीही आजीकडे बघत, तिने जोरात विचारलं, “मलाच का? सगळे खाताएत ना!”
“अगं, आताच खोकला बरा झालाय ना!” आई म्हणालीआणि तिने दह्याचा सट उचलून फ्रिजमध्ये ठेवला. दुधू बारीक डोळे करून आजीकडे बघत फिसकारली. 
थोड्यावेळाने आई-बाबा सगळं आवरून कामाला बाहेर निघून गेले. दुधूने थोडावेळ चित्रं काढली, पुस्तकं न्याहाळली, खेळली पण डोक्यातून दही खायचा विचार काही जाईना. सारखा डोळ्यांसमोर फ्रिजमधला दह्याचा सट दिसायला लागला. थोड्यावेळाने आजी आणि दूधू जेवल्या, तरी दुधूची दह्याची भूक कमी होईना. 

जेवण झाल्यावर आतल्या खोलीमध्ये आजी पेपर वाचत फरशीवर झोपली. तिने दुधूला तिथेच खेळत बसायला सांगितलं. दुधूने मुकाट्याने ऐकलं आणि खेळायला आजीच्या खोलीत गेली. कारण तिला माहीत होतं, पुढे काय होणार ते आणि तसचं घडलं! थोड्यावेळात आजीचा हात हळूहळू खाली आला. हातात धरलेला पेपर घसरत घसरत नाकापर्यंत आला. पेपर तोंडावर पडला. पेपराच्या खालून घुर् घुर् घोरायचा आवाज यायला लागला. म्हणजे आजी झोपली.

आजी झोपल्याचे कळलं, की लगेच दुधू बाहेरच्या खोलीत आली. मग तिने ‘म्युटडान्स’ केला.. म्हणजे काय तर तोंडाने अजिबात आवाज न करता, जोरजोरात नाचायचं, आरोळ्या ठोकायच्या, उड्या मारायच्या. सोफ्यावर कोलांट्या उड्या मारायच्या.. पण हे सगळं करताना अजिबात आवाज नाही आला पाहिजे. ऑनलाईन शाळेत सगळे दंगा करायला लागले, की ताई सगळ्यांना म्युट करतात. मुलांना कळत नाही म्युट केलं आहे ते. कोणी बोलतच बसतं, कोणी उठून दंगा करायला लागतं, कोणी चित्र दाखवायला लागतं, तो सगळा गोंधळ बघून दुधूला हा असला डान्स सुचला आहे.

भरपूर नाचून झाल्यावर दुधूने फ्रिज उघडला आणि त्यातून गारेगार झालेला दह्याचा सट काढला. सावकाश खाली ठेवला. फ्रिज हळूच बंद करून, ती मांजरीच्या पावलांनी वाटी-चमचा आणायला स्वयंपाकघरात गेली.  तिने ट्रॉलीचा ड्रॉवर ओढला, पण वाट्या एकमेकांवर आदळून खळाळऽऽऽ असा जोरात आवाज आला. दुधू घाबरली. आवाजाने आजी उठली तर! तेवढ्यात दाराची बेल वाजली. दुधू अजून घाबरली. तिला काय करायचे ते सुचेना. बेल परत एकदा वाजली. तेवढ्यात आजीचा आवाज आला, “कोण आलंय ते दुपारच्या वेळेला” 

दुधुने विचारले, “आजी, मी उघडू का दरवाजा?”
“नको. मी आले. बघू दे आधी कोण आलंय ते. आई गं! गुडघे दुखतात गं" आजी उठत उठत म्हणाली.
दूधुला वाटलं, आजी बाहेरच्या खोलीत आली आणि तिला दह्याचा सट दिसला, तर ती खूप रागवेल म्हणून आजी बाहेर यायच्या आधी, तिने पटकन सट फ्रीजच्या मागे लपवला. 
आजी हळू हळू हॉलमध्ये आली, तेव्हा दूधु सोफ्यावर बसून पुस्तक वाचत होती .आजीने दरवाजा उघडला तर अमेझॉनवाले काका आले होते. आजीने पार्सल घेऊन दरवाजा बंद केला.
आजी म्हणाली, “चल जरा आत. झोप नाही आली, तरी पडून तरी रहा जरा”


आजीच्या मागे गपचुपपणे दूधु आतल्या खोलीत निघाली पण तिची नजर दह्याचा सट जिथे लपवला होता तिथे भिरभिरत होती.

आजी परत पेपर वाचत फरशीवर झोपली. शेजारी दूधुसुद्धा पहुडली. थोड्यावेळात आजीचा हात हळूहळू खाली आला. हातात धरलेला पेपर घसरत घसरत नाकापर्यंत आला. पेपर तोंडावर पडला. पेपराच्या खालून घुर्ss घुर्ss घोरायचा आवाज यायला लागला. म्हणजे आजी झोपली.

दूधु हळूच उठली. आवाज न करता बाहेरच्या खोलीत गेली. फ्रिजच्या मागून दह्याचा सट काढला आणि ती डायरेक्ट  मोठ्या बेडरुममधल्या बाल्कनीच्या दरवाजापाशी आली. तिने ठरवलं, की दही बाल्कनीमध्ये बसून खायचं. तेसुद्धा हाताने. वाटी चमचा वगैरे भानगडच नको. तिने सट खाली ठेवला आणि हळूच बाल्कनी चा दरवाजा उघडला. दह्याचे भांडे बाल्कनी मध्ये ठेवलं आणि अचानक ...जोराचा वारा आला आणि बाल्कनीचे दार जोरात आपटले. धुम्मsss दूधु घाबरली. तेवढ्यात आजीचा आवाज आला. “दूधु.. ए दूधु.!”

दूधुला कळेना ओ द्यावी की नाही. ती पटकन आत आली आणि पलंगावर झोपून गेली. तिने पटकन डोळे मिटले. आजीने अजून एक दोन वेळा हाका मारल्या, पण दूधुने उत्तर नाही दिलं. ती तशीच डोळे मिटून झोपायचं नाटक करत पडून राहिली. 

दूधुने हाकेला उत्तर दिलं नाही म्हणून आजी उठली.  तिला शोधत-शोधत बेडरुममध्ये आली. दूधु झोपलेली बघून आजीला आश्चर्य वाटलं. तिने दूधुच्या डोक्यावर हात फिरवला. गळ्याला हात लावून ताप आलाय का ते पाहिलं आणि काहीतरी पुटपुटत, तिने बाल्कनीचं दार लावून टाकलं. दूधु तशीच पडून राहिली. 

तिला वाटलं, आता आजी परत झोपेल तेव्हा आपण गॅलरीत जाऊन दही खाऊ. तोपर्यंत असेच डोळे मिटून वाट पाहू. पण, तेवढ्यात आजीला कोणाचा तरी फोन आला. आजी फोनवर बोलत बसली आणि दूधु तिचा फोन कधी संपतोय याची वाट बघत पडून राहिली. वाट बघता बघता दूधुला झोप कधी लागली ते कळलंच नाही

तिला जाग आली, तेव्हा तिला आईचा आवाज येत होता. तो आवाज ऐकून आईला भेटायला, ती हॉलमध्ये पळत गेली.  मग खाली खेळायला गेली, रात्री बाबाबरोबर दंगा केला, जेवली आणि या नादात ती दह्याचं अगदी विसरून गेली . रात्री पुस्तक वाचता वाचता डोळयांवर पेंग यायला लागली, तशी तिला दह्याची आठवण आली. तिने इकडे तिकडे  पाहिलं, तर बाबा केव्हाच झोपला होता. दुधुने झोपायचा प्रयत्न केला. डोळ्यासमोर शाळेतल्या  गमती, दिवाळीतली मज्जा आणायचा प्रयत्न केला. पण  छे! त्या सगळ्या विचारांमध्ये पांढरेशुभ्र, मऊमऊ दहीच आठवायला लागले.  मग दुधू हळूच उठली. चोरपावलांनी आजीच्या खोलीत गेली, तर आजी गाढ झोपली होती.  दुधूला आनंद  झाला, तिने आधी म्युटडान्स केला आणि मग दही खायला स्वयंपाकघराकडे निघाली. 

हळूच फ्रिजचा दरवाजा तिने उघडला, तर काय आश्चर्य! फ्रिजच्या उघडलेल्या दरवाजातून येणाऱ्या प्रकाशात तिला हॉलमध्ये कोणीतरी दिसलं. निवांत पाय पसरून, सोफ्यावर बसून अंधारात काहीतरी  खात बसलेलं. कोण होतं ते दुधूला  लगेच  कळलं. आईऽऽऽऽ फ्रिजमधला दह्याचा सटसुद्धा दिसत नव्हता. काही न बोलता, तिने फ्रिज बंद केला आणि ट्रॉलीमधला एक चमचा घेऊन ती हॉलमध्ये  आली. गपचूपपणे आईच्या शेजारी येऊन बसली. आई इतकं मन लावून दही खात होती, की दुधू तिच्याजवळ आलीये ते तिला कळलंसुद्धा नाही. आईकडे हसून बघत दुधू म्हणाली, “धरिला पंढरीचा चोर.....”

हाहाहा!!.. चोरी  पकडली गेल्याने आई खुदुखुदू हसायला लागली आणि तिने दह्याची वाटी दुधूसमोर धरली.