बायो बबल - भाग ६ (मायझ्मा सिद्धांत)

बायो बबल - भाग ६ (मायझ्मा सिद्धांत)
लेखन: विद्याधीश केळकर

याआधीचे भाग: भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५

दोस्तहो, गेल्या काही भागांतून आपण जेन्नरच्या लसीची कथा जाणून घेतली. १९व्या शतकाच्या मध्यापर्यंत देवीची लस सर्वदूर पसरली होती. जगभर तिचा वापर होत होता. असं असलं तरी ही लस नक्की का उपयुक्त ठरते, लसीमुळे रोगाला अटकाव का होतो किंवा या लसीमागचा विचार इतर रोगांना कसा लावता येईल, असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरीत होते. अशातच १८५०च्या दशकाच्या उत्तरार्धात जीवशास्त्राच्या एका नवीन शाखेच्या उगमाची चाहूल लागली, जीवाणू-शास्त्र (Bacteriology). याची सुरुवात झाली ‘लुई पाश्चर’पासून, ज्याचा वारसा पुढे ‘रॉबर्ट कॉख’ने यशस्वीपणे चालवला. या दोघांच्या कार्यातून आणि इतर संशोधनांमधूनच पुढे आली ’Germ Theory', अर्थात रोगाचे कारण, प्रसार आणि निवारण स्पष्ट करणारा असा ’जंतू सिद्धांत’. या सिद्धांताकडे आपण येऊच, पण या सिद्धांतापूर्वी ‘रोग का होतात?’ याबद्दल जनमानसात नक्की काय विचार होता, ते पहायचं असेल तर पार दोन-अडीच हजार वर्षं मागे जावं लागेल. अगदी सुश्रुत-चरक-हिप्पोक्रेटिस यांच्या काळात...

सुश्रुत संहिता, चरक संहिता हे वैद्यकशास्त्रावरचे अतिशय महत्त्वाचे असे ग्रंथ. यातील सुश्रुत संहितेमध्ये रोगांबद्दल सांगताना सुश्रुत लिहितो, "ताप, खोकला, डोळ्यांचे आजार, पोटाचे आजार व इतर संसर्गजन्य रोग हे एकत्र खाण्याने, शरीर संपर्कातून, लैंगिक संबंधातून, एकमेकांच्या वस्तू वापरण्यामुळे एका व्यक्तीपासून दुसर्‍या व्यक्तीमधे असे पसरतात." ह्या ग्रंथाचा साधारण काळ हा इ.स.पू ६व्या शताकाचा आहे. यानंतरचा रोगासंबंधीचा विचार सापडतो तो इ.स.पू ४थ्या शताकात, हिप्पोक्रेटिसच्या लिखाणात. त्याच्या मते रोग हे एका खास प्रकारच्या दूषित हवेमुळे पसरतात. याला तो मायझ्मा (Miasma, Greek for 'Pollution') असं म्हणे. हाच सिद्धांत पुढे १८५०-६० पर्यंत Miasma Theory म्हणून ओळखला जात होता. Germ Theoryच्या उगमापर्यंत Miasma Theoryच सर्व रोगांचे कारण शोधण्याकरिता वापरली जाई. या सिद्धांतानुसार, कोणताही रोग हा दूषित हवा, अशुद्ध पाणी आणि अस्वच्छ पर्यावरण यामुळे पसरतात. या अशा परिस्थितीत पर्यावरणातील ‘मायझ्माटा’चं (Miasmata) म्हणजेच दूषित घटकांचं प्रमाण वाढतं. हे असे घटक आपल्या शरीरात गेल्याने रोग होतात असे हा सिद्धांत सांगतो. या सिद्धांतानुसार रोग एका व्यक्तीतून दुसर्‍या व्यक्तीत न जाता अस्वच्छ, दूषित भागात राहणार्‍या आणि मायझ्माच्या संपर्कात आलेल्यांनाच होतो.

त्यानंतरच्या काळात अजूनही बरेच वेगवेगळे सिद्धांत मांडले गेले. हिब्रू बायबल मधील Mosaic Lawमध्ये ’रोगकारका’बद्दल (Contagion) विचार मांडले आहेत. तर दुसर्‍या शतकातील ग्रीक वैद्य गॅलेनने मायझ्मा थिअरी पुढे नेली. त्याच्या मते हवेमध्ये प्रत्येक रोगाची ’बीजं’ असतात, ही माणसात प्रवेशली तर त्याला तो रोग होतो. हे बीज नष्ट झालं की रोग बरा होतो, पण काहीवेळा बीज फक्त अशक्त होतं आणि शरीरातच राहतं. काहीकाळानी ते सशक्त झाल्यास तोच रोग पुन्हा होतो असं तो म्हणे. पुढे १७व्या शतकात Antonie van Leeuwenhoek (आंटोनी फान लेउवेन्होक) यानी सूक्ष्मदर्शाकाचा शोध लावला. या सूक्ष्मदर्शकाचा वापर करून १६७४मध्ये प्रथम त्याने पेशीपेक्षा लहान अशा सूक्ष्मजीवांचं अस्तित्त्व सिद्ध केलं. तो त्यांना Animalecules म्हणे. त्यांनंतर जवळपास शंभर वर्षांनी काही संशोधकांनी व वैद्यांनी स्मॉलपॉक्स, रेबीज, कुष्ठरोग हे अशा Animalecules पासून होतात असं प्रतिपादन केलं पण त्याकाळात मायझ्मा थिअरीचा प्रभाव इतका होता की हे आवाज ऐकलेच गेले नाहीत. 

जगभरात अनेक ठिकाणी या Miasma Theory चा उल्लेख सापडतो. ग्रीससह संपूर्ण युरोप तसेच चीन, भारत या देशातही या थिअरीचा उल्लेख, वापर झालेला सापडतो. पार १९व्या शतकाच्या मध्यापर्यंत हाच सिद्धांत रोगांच्या साथीचे स्पष्टीकरण देण्यासाठी वापरला जाई. १८५४ साली लंडन आणि पॅरीसमधे आलेल्या कॉलराच्या साथीचं कारण स्पष्ट करायला लोकांनी याच सिद्धांताची मदत घेतली. संशोधकांच्या मते हा आजार हवेद्वारे पसरत होता, आणि थेम्स नदीकाठी या आजाराचा उगम झाला कारण या नदीभोवती खूप मोठ्या प्रमाणावर मायझ्माटा किंवा प्रदूषके होती. तो काळ औद्योगिक क्रांतीनंतरचा होता. यंत्राच्या आणि कारखान्यांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ यामुळे प्रदूषणातही प्रचंड वाढ झाली होती. कदाचित त्यामुळेच मायझ्मा थिअरी इतकी मान्यताप्राप्त ठरली असावी. पण, त्यामुळे झालं असं की अनेक रोगांचं निवारण अवघड झालं, कारण सगळेच रोग काही हवेद्वारे पसरत नाहीत, किंवा कुठलाच रोग हा हवेत तरंगणार्‍या ’प्रदूषकां’मुळे होत नाही. रोग होतात ते जीवाणू, विषाणू, बुरशी अशा सूक्ष्म्जीवांमुळे, ज्यांच्या वाढीचं एक कारण आहे दूषित हवा.

पण Miasma Theory मुळे एक गोष्ट मात्र नक्की चांगली झाली. हॉस्पिटल्समधील निर्जंतुकीकरण! याची सुरवात फ्लॉरेन्स नाईटिंगेल या नर्सने केली. ती Miasma Theoryची मोठी समर्थक होती. रोग हे जर दूषित हवेमुळे होतात तर रुग्णांच्या आजुबाजुची हवा ही अतिशय स्वच्छ आणि शुद्ध असायला हवी. म्हणून तिने हॉस्पिटल्स अतिशय स्वच्छ, सुंदर आणि सुगंधी कशी राहतील यासाठी काम केलं. रुग्णांना जास्तीत जास्त शुद्ध हवा मिळाली पाहिजे असा प्रयत्न ती करीत असे. अशी ही Miasma Theory!

पण मग रोग सूक्ष्मजीवांमुळे होतात हे कसं समजलं? ह्या विचाराचा उगम कुठे आणि कसा झाला? Miasma Theory चुकीची कशी ठरवली गेली? Germ Theory किंवा जंतू सिद्धांत नक्की काय सांगतो? ते आता पुढच्या भागात!

(क्रमश:)
चित्र: आंतरजालावरून साभार (चित्रस्रोत) . सदर चित्र रॉबर्ट सेमूर या चित्रकाराने कॉलरा साथीच्या वेळी काढलेले चित्र आहे. 


अटक मटकच्या मॉनिटरकडून:
ही एक नवीन लेखमालिका आहे. एकुणच लसीचा शोध आणि त्याचा इतिहास समजून घेणं अत्यंत रंजक आहेच तितकंच माणसाच्या चिकाटीबद्दल कौतुक वाटायला लावणारंही आहे. दर बुधवारी या मालिकेतील पुढील भाग प्रकाशित होणार आहे. तुम्हाला जर याबद्दल काही प्रश्न असतील तर monitor.atakmatak@gmail.com या इमेल पत्त्यावर किंवा फेसबुक कमेंटमध्ये जरूर विचारा. आम्ही ते लेखकापर्यंत पोचवू. त्याचं उत्तर पुढील भागांत असेल किंवा आम्ही ते पुढील भागात देण्याची विनंती करू