गुलाबो (कथा)

गुलाबो
लेखन: दिप्ती देशपांडे
चित्र: पारूल समीर

बागेतल्या झाडांशी कविताची घट्ट मैत्री होती. झाडांबरोबर बोलायचं, गप्पा मारायच्या, शाळेतल्या मित्रमैत्रिणींच्या, बाईंच्या गमतीजमती झाडांना सांगायच्या हे तिचं आवडीचं काम. पक्षी घरटी कशी करतात? एक एक काडी आणून पक्ष्यांना घरटी करायला किती वेळ लागतो? सुरवंट जेव्हा कोषात जातो तेव्हा तो खरंच झोपतो का? का अंग जड झाल्यामुळे त्याला जागचं हालताच येत नाही? आम्हा लहान मुलांना जशी मोठं होण्याची घाई असते, तशी प्राणी-पक्षी, सापांना, माशांना, झाडांना घाई असते का? असे कितीतरी प्रश्न कविताला तिच्या अंगणातल्या बागेत फिरताना पडायचे.

अंगणात एक आंब्याचं बहारदार झाड होतं. तिथेच ती अभ्यास करत बसायची, पण आज हे सगळं बाजूला ठेवून तिला गणिताचा अभ्यास करायचा होता. कारण, उद्या गणितचा पेपर होता. कविताला गणित विषय थोडाथोडा आवडायचा. मराठी विषय खूप आवडायचा. गणिताचं पुस्तक, पेन्सिल, खोडरबर, पाटी-पेन्सिल घेऊन कविता आंब्याच्या झाडाखाली बसली होती. कविताला एक सवय होती. वस्तू जागेवर न ठेवण्याची. तिचे आई-बाबा तिला सतत सांगायचे बरेच वेळा प्रेमाने, रागाने, चिडून, ओरडून “कविता वस्तू जागेवर ठेव. वस्तू जागेवर ठेवली की लगेच सापडते. शोधाशोध करावी लागत नाही. वेळ वाचतो. तो वेळ दुसऱ्या कामासाठी देता येतो.” पण, हे सगळं कविताला कधी ऐकायलाचं यायचं नाही. तिच्या कानाला ही वाक्य घासूनसुद्धा जायची नाहीत. झाडाखाली कविताचा अभ्यास करून झाला, पण तिचा खोडरबर ती नेमका झाडाखालीच विसरली.

 

दुसरे दिवशी कविता शाळेत गेली. कविताला बाईंनी पेपर दिला. कविताने गणितं छान सोडवली. एक गणित सोडवताना मात्र तिची चूक झाली, म्हणून खोडण्यासाठी ती कंपासमधला खोडरबर काढायला गेली, तर तिथे खोडरबर नव्हताच.
“आता कोणाकडे खोडरबर मागू? माझा खोडरबर... आता काय करू?” असे प्रश्न ती मनातल्या मनात स्वत:ला विचारु लागली. कविताने मित्रमैत्रिणींकडे खोडरबर मागितला, पण त्यांना हवा असल्याने तिला कोणी मदत केली नाही. त्यामुळे कविता रडवेली झाली. शेवटी नाईलाजाने तिने तिच्या बाईंना सांगितले. बाईंनी तिच्यासाठी खोडरबरची व्यवस्था केली. बाई म्हणाल्या, “पुढच्या वेळी लक्षात ठेव. आता घे खोडरबर.”

तिला कोणी खोडरबर दिला नाही याचं खूप वाईट वाटत होतं. परिक्षा झाल्यावर ती कोणाशी फारसं काही बोलली नाही. गप्पगप्प होती. शाळा सुटल्यावर ती घरी गेली. तिने आईला काहीही सांगितलं नाही. आंब्याच्या झाडाखाली येऊन बसली. तेवढ्यात टण्, टण्, टण्,टण् उड्या मारत खोडरबर कवितासमोर आला.
“काय गं झालं कविता?”, कविताने इकडेतिकडे पाहिलं, चक्क खोडरबर कविताशी बोलत होता.
कविता म्हणाली, “अरे! तू बोलतोस?”
खोडरबर म्हणाला, “तू गप्प गप्प दिसतेस, म्हणून आलो तुझ्याशी बोलायला. आज झाडांशी बोलायचं नाही वाटतं. काही झालं का शाळेत?”
“तुला कसं माहीत?”
“अंदाज अपना अपना” कविता खुदकन हसली.


कविता म्हणाली, “आज तुला विसरले पेपरला जाताना. आजूबाजूच्या मित्रमैत्रीणींकडे दुसरा खोडरबर मागितला. कोणी दिला नाही. मग बाईंकडे मागितला. दिला त्यांनी, पुढल्या वेळेस लक्षात ठेव म्हणाल्या. मला कसंतरीच झालं तेव्हा. वाटलं मी का विसरले तुला? मी नकोच होतं विसरायला. मग दुसरा मागावाही लागला नसता.”
खोडरबर म्हणाला, “होय. मला विसरलीस तू! कळलं न आता वस्तू जागेवर ठेवायची असते ते. आई-बाबा सांगतातच की नेहमी तुला.”
“मी मुद्दाम नाही विसरले.”
“हो, पण परीक्षा आहे म्हणून मुद्दाम लक्षातही नाही ना ठेवलंस? काळजी करू नको बालिके. यापुढे मुद्दाम लक्षात ठेव. कविता, तुला माहिती आहे का, मी कसा तयार होतो.? तुला झाडं आवडतात ना म्हणुन विचारतोय.”
“खरंय. यापुढे मी मुद्दाम लक्षात ठेवेन, पण झाडांचा आणि तुझा काय संबंध?”
“अगं माझं झाड असतं, रबराचं.”
“काय सांगतोस! म्हणजे झाडापासून खोडरबर तयार करतात? मग तू एवढा लहान होऊन आमच्यापर्यंत कसा पोहोचतोस? झाड तर किती मोठं असतं.”
खोडरबर म्हणाला, “शेतकरी ताई-दादा रबराची झाडं लावतात. छान काळजी घेऊन त्यांना वाढवतात. मग काही काका, मावश्या येऊन, रबर गोळा करून कारखान्यात पोहोचवतात.”


कविताचा उत्साह अजून वाढला. कविता अधीरपणे म्हणाली, “मग मग पुढे काय करतात?”
खोडरबर म्हणाला, “अगं, किती घाई. सांगतो, सांगतो. कारखान्यात काम करणारे ताई, दादा मग त्याच्यावर प्रक्रिया करतात त्याला आकार, रंग, सुवास देतात. मग जाऊन कुठे आम्ही तयार होतो.”
“पण मग, तुम्ही आम्हा मुलांपर्यंत कसे पोहोचता? दुकानात कुठून येता?
“कारखान्यात झालेले खोडरबर काही कामगार काका, ताया आणि ड्राइव्हरकाका मिळून शहरापर्यंत आणतात. मग दुकानातले काका विकण्यासाठी ठेवतात. मग तुमचे आई बाबा पैसे देऊन मला तुमच्यासाठी घेतात.”
कविता म्हणाली, “एवढ्याशा खोडरबरसाठी एवढं काय काय करावं लागतं. बापरे! मी किती सहज विसरते कोणत्याही ठिकाणी तुला.”

खोडरबर म्हणाला, “कविता, प्रत्येक वस्तूची अशीच गोष्ट असते. पेन्सिल, पट्टी, दप्तर, रंग, आपण रोज ज्या वस्तू वापरतो ती प्रत्येक गोष्ट अशीच खूप जण मिळून तयार करतात."
“मी माझा खोडरबर घरी विसरले ते बरंच झालं रे!”
“का गं?”
कविता हसत म्हणाली, “अरे, म्हणून तर तू मला भेटलास ना आणि तुझी गोष्ट सांगितलीस. मी आता माझ्या सगळ्या वस्तू इथे तिथे न विसरायचा नक्की प्रयत्न करेन. मी विसरले तर प्लीज टणटण उद्या मारून आठवण करशील का मला? आपल्या दोघांचं गुपित.”
खोडरबर म्हणाला, “आपण एक आयडिया करू, जेणेकरून तुला वस्तू लक्षात ठेवायला मदत होईल. आपण कंपासमधल्या किंवा ज्या वस्तू तू सारख्या विसरतेस त्यांना कमी आवाजाचे घुंगरू लावू आणि त्या वस्तू छान सजवू.”
कविता म्हणाली, “भारी आयडिया सुचली तुला! थांब, मी आईच्या डेकोरेशन किटमधलं सामान घेऊन येते.” कविताची आई फॅशन डिझायनर आहे. कविताने सगळं सामान आणलं. कंपासमधल्या वस्तू छान सजवल्या.
कविता शाळेत काय घडलं ते सगळं विसरली होती. खोडरबर म्हणाला, “किती छान सजवलंस गं मला. मला गुलाबी कपडे घेतल्यासारखं वाटतंय.”


कविता म्हणाली, “मी तुझ्या अर्धा बाजूला गुलाबी कागद चिकटवला आहे, आणि एक पीन घालून तुला घुंगरू लावले आहेत. मी तुला आजपासून गुलाबो म्हणणार आहे.”
“वा! आवडलं आपल्याला नाव. आता मला कंपासमध्ये भरून ठेवशील?
“गुलाबो, मी आता माझ्या वस्तू कधीच विसरणार नाही.”
गुलाबो गोड हसला. कविताने कंपास भरली. तिला दप्तरात ठेवून झाडांबरोबर गप्पा मारायला गेली.