टेकडीच्या निमित्ताने ७: ग्लिरिसिडीया
टेकडीच्या निमित्ताने ७:
ग्लिरिसिडीया
लेखन व चित्रे: ओजस फाटक,(इयत्ता ७वी, अक्षरनंदन)
याधीचे भागः एक । दोन | तीन | चार | पाच | सहा
ग्लिरिसिडीया म्हणजेच उंदीरमार, कापायचा उद्योग आम्ही सुरूच ठेवला. ग्लिरिसिडीयाला शिशिर ऋतूत गुलाबी फुलं येतात आणि पानं गळतात. शेवटच्या अर्ध्या शिशिर ऋतूमध्ये ग्लिरिसिडीया गुलाबी फुलांनी बहरलेला असतो. मागे निळं निरभ्र आभाळ असताना ही फुलं सुंदर दिसतात. शिवाय हिवाळ्यातील दुपारी चारच्या उन्हातही सोनेरी रंगाकडे झुकतात. पण २०१९-२० च्या हिवाळ्यात जास्त थंडी पडलीच नाही, त्यामुळे फुलं उशिरा आली आणि थोsडी लवकर गळाली. काही फुलं वाळलेली पण दिसली; उन्हामुळे या फुलांची फळं होतात की शेंगा ते काही मला माहीत नाही. पण बहुधा शेंगा होत असाव्यात. कारण आतापर्यंत मी पाहिलेल्या बहुतांश संयुक्त पर्णी वनस्पतींना शेंगाच येतात. उदाहरणार्थ – चिंच, बहावा, टाकळा, शिरीष, करंज, बाभूळ, हिवर, खैर आणि बरीच झाडं.
म्हणे सुमारे तीस वर्षांपूर्वी ग्लिरिसिडीयाची लागवड पुण्यातल्या टेकड्यांवर केली. ग्लिरिसिडीया विदेशी आहे. त्याची टेकड्यांवर लागवड केली, कारण तो पटापट वाढतो, प्रसार पटपट होतो; आणि कापला तरी परत येऊ शकतो. (बऱ्याचदा परत येतो.) पण ग्लिरिसिडीया विदेशी असल्याने ग्लिरिसिडीयाला खाणारे पक्षी, प्राणी, कीटक इथे नसतात. म्हणूनच तर तो इतका भरभर वाढतो! टेकडीवर ज्या देशी वनस्पती आहेत त्या त्याच्या तुलनेत हळू वाढतात. ग्लिरिसिडीया भरभर वाढत असल्याने त्याची मुळं जमिनीत जाऊन देशी वनस्पतींना नुकसान पोहोचवतात. त्यामुळे देशी वनस्पती मरतात किंवा कमी होतात. देशी वनस्पती कमी झाल्यामुळे त्यांना खाणारे प्राणी, पक्षी, कीटक कमी होतात. हे होणं घातक असतं.
हे होऊ नये, म्हणून खूप काय काय करता येऊ शकतं. त्यातल्या काही गोष्टी आम्ही करतो; दोनच करतो. एक तर ग्लिरिसिडीया कापणे, दुसरं म्हणजे देशी बिया पेरणे. अजून देशी झाडं लावण्याचं काम वनविभाग करतो. ते कामगार बिया पेरत नाहीत, तयार झाडं प्लास्टिकच्या पिशवीतून आणून लावतात. आणि प्लास्टिकच्या पिशव्या वनविभागाचे कामगार तिथेच टाकून निघून जातात. आम्ही तिघं त्या पिशव्या सुतळीने बांधून टेकडीवरून खाली आणून रिसायकलिंगला देतो. ज्या ग्लिरिसिडीयाच्या खोडाचा व्यास सुमारे इंचभर व उंची सात-आठ फुटाहून कमी असते, असा ग्लिरिसिडीया कापणं आम्हाला शक्य होतं. ग्लिरिसिडीया कापायला आम्ही तीन सुरे घेऊन जातो. एकाला दाते आहेत, एक सरळ पातंवाला, आणि एक सुरीसारखा पण मोठा.
एका हाताने वर पकडायचं आणि एका हाताने मुळाशी नेम लावून घाव घालायचा. त्यासाठी खाली वाकावं किंवा बसावं लागतं. वरच्या हाताला सुरा लागत नाही, कारण तो हात बराच वर असतो. पहिल्या चार-पाच वारात फांदी तुटली नाही तर फांदी वाकवायची आणि मग सुरा न मारता खुपसायचा. खालचा भाग कापायचा असेल तर, मारायचं नाही. कारण सुरावाल्या हाताला आधी कापलेल्या फांद्यांची टणक देठं लागू शकतात. त्यामुळे करवतीसारखं कापायचं. अशावेळी दातेवाल्या सुरीचा उपयोग होतो. कापलेला ग्लिरिसिडीया नत्र-स्थिरीकरणासाठी (नायट्रोजन फिक्सिंगसाठी) आम्ही रोपं - झाडं यांच्या मुळाशी टाकतो.
आम्ही ग्लिरिसिडीया कापायला सुरुवात केली त्यानंतर हळूहळू आम्ही कुठे कापण्याजोगा ग्लिरिसिडीया दिसला की तो लक्षात ठेवून कापू लागलो. पण मोठी झाडं आम्ही कापत नाही, कारण आम्हाला ते जमणार नाही. दुसरं म्हणजे मोठी झाडं कापण्यासाठी वनविभागाची परवानगी लागते. आम्ही ग्लिरिसिडीया कापणं हळूहळू वाढवत गेलो. अर्थात आता लॉकडाउन मुळे टेकडीवरचं काम बंद आहे.
नवनवीन जागा शोधून ग्लिरिसिडीया कापायचो. एकदा आम्ही ग्लिरिसिडीया कापत असताना एक माणूस आला आणि म्हणाला, “तुमचा व्हिडिओ काढू का?” आम्ही नको म्हटलं.
कुणास ठाऊक हा माणूस व्हिडिओ काढेल आणि ‘हे झाडं कापतात’ म्हणून तक्रार करेल! कारण, काही लोकांना झाडं ओळखता येत नाहीत. मुख्य म्हणजे, काय चाललंय ते समजून न घेता थेट गैरसमज करून घेऊन काहीतरी नसत्या गोष्टी करून बसू शकण्याची शक्यता असू शकू शकते. असे लोक बरेच असू शकतात. ग्लिरिसिडीयाला खालपासूनच फांद्या फुटतात. ग्लिरिसिडीयाची पानं समोरासमोर (opposite) असतात आणि फांदीच्या शेवटी एक पान. पुरेशा मोठ्या खोडाचा खालचा भाग वगळता सालीवर पांढरे ठिपके असतात.
ग्लिरिसिडीया कापताना ताकद लागते, त्यामुळे हाताचा व्यायाम होतो. अर्थात कुणावर राग असेल, तर तोही निघतो! मुख्य वाटेच्या आजूबाजूला लक्षपूर्वक पाहिलं, तर बराच हाताचा दिसतो. कापाकापी करून झाल्यावर कापलेली एक फांदी हलकी असते, पण अशा आठ नऊ फांद्या झाल्या की वजन जास्त होतं. बरीच लोकं बघायची आम्हाला कापाकापी करताना. पण कोणी काही म्हणायचं नाही. काहीजण आम्हाला सांगायचे की तिकडे बहुतेक तसं झाड आहे. ते ग्लिरिसिडीया असलं आणि कापण्याजोगं असलं तर आम्ही त्याचे अनेक हात कलम करायचो.
आम्ही एकदा ग्लिरिसिडीया शोधत मुख्य वाटेवरून जात होतो. डावीकडे आम्हाला ग्लिरिसिडीया दिसला, पण तो कापलेला होता.
“हा आपण नाही ना कापला?” तुहिन.
“नाही... पण मग कोणी कापला?” मी.
“कोणीतरी दुसरं आपलं बघून कापत असेल.” आभा
तो ग्लिरिसिडीया विचित्र कापला होता. कापलेल्या त्याच्या फांद्यांनी तिथेच राडा केला होता. धड कापलेलाही नव्हता. काही फांद्या पूर्ण तुटलेल्या होत्या, चार-पाच धागे जोडलेले होते आणि फांदी विचारी लोंबकळत होती! मी ती हाताने खेचून पूर्ण उखडली. पुढे बऱ्याच झाडांचं असं भजं केलेलं दिसलं. त्या सर्व भज्या आम्ही पूर्ण उखडून दुसरीकडे मातीत टाकल्या.
काही वेळानी एक माणूस कोयत्याने ग्लिरिसिडीया कापताना दिसला. आम्ही प्लांटेशनच्या भागात आलो होतो. इथला ग्लिरिसिडीया वनविभागाने तोडला होता. तो माणूस एका हाताने धरून दुसऱ्या हाताने मारत नव्हता, फक्त मारत होता. ते सुद्धा सपकन मारायचा, एका घावात तुटली नाही तर सोडून द्यायचा.
काही वेळानी आमचं संभाषण झालं. आणि त्याला आभानी सांगितलं की काय करायचं. तोपर्यंत मी एका पांढऱ्या सालीच्या, थोड्या लवचीक असलेल्या खोड- फांद्यांच्या झाडावर चढून उभा होतो.
पुढच्या दिवशी त्या माणसासोबत अजून एक माणूस आला. हे दोघेही आमच्या प्रमाणे ग्लिरिसिडीया कापू लागले. चांगलं आहे. या टेकडीवर गलिरिसिडिया कापणारे चार हात वाढले!
आता म्हातोबा मंदिरापाशी जाणं सोपं वाटतं, ते मंदिर दूरवरून दिसतं. सहा-सात वर्षांपूर्वी आम्ही यायचो, तेव्हा म्हातोबा पर्यंत यायला घाबरायचो. शेवटची झाडी दाट आणि आठ-दहा फूट उंच, लाल मुंग्यांची वारुळं, झाडावर मधमाश्यांची पोळी. जमिनीवरून डोंगळे फिरायचे, झाडांवरून मुंगळे. आणि मुख्य म्हणजे गवतावर मोठाले किडेs!! त्यात बरीच देशी झाडंही होती, पण जास्त ग्लिरिसिडीयाच होता. वनविभागानी तिथली काही देशी झाडं कापली. बहुदा मुंग्यांची वारुळंही उद्ध्वस्त केली.
की त्या तिथून निघून गेल्या? मग वारुळाचं काय? झालं कुणास ठाऊक!
(क्रमश:)