टेकडीच्या निमित्ताने ५: दारुडा कामगार
टेकडीच्या निमित्ताने ५:
दारुडा कामगार
लेखन व चित्रे: ओजस फाटक,(इयत्ता ७वी, अक्षरनंदन)
याधीचे भागः एक । दोन | तीन | चार
"ती नक्की तुझी आईच आहे ना? - म्हणजे ताई नाही ना?" त्याने परत विचारलं. "नाही, आईच आहे". मी मुद्दाम वैतागल्या सारख्या सुरात म्हणालो.
ती तिघं पुढे गेल्यावर. तिथे काम करणारा दारुडा कामगार त्याच्याशी काहीतरी बोलू लागला.
बडबड चालू होती त्या कामगाराची.
मध्येच तो काहीतरी उडी मारल्यासारखं विचित्र करून मागे आमच्याकडे बघायचा. काय हो तुमचं नाव? गाव काय? गाडी चालवता येते? डंपर येतोय तिथे, चिमणी एवढा ट्रॅक्टरही आहे. इथे कमान बघायची आहे, असं काहीतरी बडबडत होता. ती मुलं त्याला 'गप बस' 'शांत बस' 'मुकाटपणे काम कर' वगैरे काहीतरी बोलत होती.
मग दारुडा मागे वळला आणि आमच्याकडे बघून म्हणाला, "तो, नाही मी! वो वो! मैं नही!!"
मग आभा म्हणाली आम्हाला, "थांबा रे! काहीतरी करायचं आपल्याला!"
मग ती तीन मुलं, दारुडा कामगार आणि आम्ही तिघं काही वेळ हळूहळू पुढे सरकत राहिलो.
त्याची बडबड चालू होती. सर्वात पुढे तीन सभ्य मुलं, मग काही अंतरावर मागे एक महामूर्ख दारुडा कामगार आणि काही अंतरावर, सर्वात मागे आम्ही तिघं.
मध्येच तो कामगार थांबला. मागे पाहिलं, पुढे पाहिलं, आम्ही तिघं व ती तीन मुलंही थांबली.
कामगार समोरच्या बिजाच्या झाडाकडे पाहून बोलू लागला, "यहाँ तीन, वहाँ तीन मैं एकटा!"
आणि मग त्यांनी वर-खाली बघितलं आणि मग डोक्यावर काहीतरी चाचपून पाहिलं. बहुधा त्याला डोक्यावर हेल्मेट आहे ना, याची खात्री करायची असावी.
मग चार-पाच उड्या मारल्या आणि हवेतल्या हवेत जोरदार लाथ मारली.
तेवढ्यात ती तीन मुलं त्याला काहीतरी म्हणाली. दारुडा त्याच्यांकडे टकामका बघू लागला. मग २ क्षण आमच्याकडे बघितलं. मग परत त्याच्यांकडे, आणि मग काहीतरी आरडत-ओरडत बोंबलत तो त्यांच्यावर धावून गेला. ती मुलं पळायला लागली. आम्ही निष्कर्ष काढला की त्यांनी शिवीगाळ केला असावा.
ती मुलं आणि दारुडा दिसेनासा झाला. आम्ही उत्सुकतेपोटी भरभर चालू लागलो.
माझा वेग या दोघांपेक्षा थोडा जास्त असल्याने मी पुढे गेलो. भिंत ओलांडली.
पहिल्या मारुती मंदिरापाशी ती तीन मुलं हसत बसली होती. त्यांनी मला तिथे बोलावलं. मी गेलो.
"तो तुम्हाला ही काही म्हटला का?",लाल शर्टवाल्यानी विचारलं.
मग एक मोठी दाढीवाला म्हणाला, "तो म्हणाला की मी ही बाटली मारीन म्हणून!"
"तुला नाही विचारलं रे, राहुल!" तो लाल शर्ट वाला म्हणाला.
"तो आम्हाला म्हणाला की 'मी उद्या जसा दगड मारला होता ना, तसा कालही मारतो बघा! कल मारा था उद्या मारेंगे म्हणून!'", मी थाप ठोकली.
काही वेळानी आभा आणि तुहिनबरोबर स्कूटरवर बसलो.
इंजिन सुरू झालं तेव्हा माझ्या मनात विचार आला, '३-४ महिन्यापूर्वी एक माणूस आपला पाठलाग करत होता, हा तोच तर नसेल ना?! कुणास ठाऊक!'
(क्रमश:)
या लेखनाचे डिजिटल टंकन करण्यास मदत केल्याबद्दल उदय क्षीरसागर यांचे आभार