प्रथम क्रमांक विजेती एकांकिका: लाईक कमेंट आणि शेअर

लाईक कमेंट आणि शेअर
लेखक – अक्षय मारुती पाटील.
प्रवेश पहिला
(रंगमंचावर स्वप़्निलला मध्यभागी बांधून रस्सीखेच चालू आहे...एका बाजूला दुर्गा, मयुरी, गणेश, गुरू आणि सुमित आहेत, तर दुसऱ्याबाजूला स्वप़्निलच्या कल्पनेतले मित्र आहेत.)
जोर लगाके....हैशा....
------------------------------------
प्रवेश दुसरा
(रंगमंचावर समोरून उजव्या बाजूला एक बिथरलेला मुलगा (स्वप़्निल…)…बसला आहे…तो खूप अस्वस्थ आहे…त्याचा मोबाईल कुणीतरी लपवून ठेवला आहे आणि त्यामुळे आता त्याची चिडचिड होत आहे…तो हाताला मिळेल ती प्रत्येक गोष्ट फेकून देत आहे.)
स्वप़्निल: माझा मोबाईल…माझा मोबाईल कुठाय…कुठाय माझा मोबाईल…?...(आदळाआपट करत आहे)…माझा मोबाईल…(घाबरतो)…
(तेवढ्यात तिथे मयुरी येते.)
मयुरी: स्वप़्निल…अरे हेबघ तूला भेटायला कोण आलंय…?...अरे बघ तरी…
(स्वप़्निल दुर्लक्ष करतो…स्वप़्निलचे सगळे मित्र आत येतात.)
गणेश: हाय स्वप़्निल…कसा आहेस…?
सुमित: इतके दिवस शाळेत का नाही आलास…?
गुरु: तुला माहीत आहे, आम्ही तूला खूप मिस केलं…
दुर्गा: बोल ना…अरे बोल…आधी तू इथे निट उभा रहा…सांग इतके दिवस कुठे होतास…?...शाळेत का नाही आलास…?...आमच्या सोबत बोलत का नाहीस तू…?...बोल ना…आता काय झालं…बोल ना…बोल बोल…
(स्वप़्निल रागाने दुर्गाचा हात झटकतो.)
स्वप़्निल: काय चाल्लय तुमचं…?...इथे माझा मोबाईल सापडत नाहीये आणि तुमचं काय चालू आहे…?...शिट यार…खूप मेसेज आले असतील मला…रिप्लाय द़्यायचाय सगळ्यांना...अरे पण माझा मोबाईल कुठाय…?...मयुरी...मयुरी…माझा मोबाईल तूझ्याकडे आहे ना…?
मयुरी: (रागात.)…आधी तू जागेवर जावून बस…
स्वप़्निल: अगं पण…
मयुरी: जा म्हणाले ना…
(स्वप़्निल जागेवर जावून बसतो पण…)
स्वप़्निल: (वैतागून)…मला आत्ताच्या आत्ता मोबाईल पाहीजे...
मयुरी: (एक खोटा मोबाईल त्याच्या दिशेने फेकून देत...)...हा घे तुझा मोबाईल...
(मयुरी त्याच्या हातात तो खेळण्यातला मोबाईल देते…स्वप़्निल मोबाईल बघून आनंदी होतो…)
स्वप़्निल: (मोबाईल लपवत)…ताई दरवाजा बंद कर ना…बाबा येतील…!
(मोबाईल हातात दिल्याबरोबरच त्याचे काल्पनिक काळे कपडे घातलेले आठ मित्र त्याच्या बाजूला येवून बसतात आणि त्याच्यासोबत बोलू लागतात…)
मित्र १: हाय स्वप़्निल…!
मित्र २: हॅलो स्वप़्निल…!
स्वप्निलः हाय…
मित्र ३: हाय स्वप़्निल कसा आहेस…?
स्वप़्निलः एकदम मस्त…
मित्र ४: आज बऱ्याच दिवसांनी ऑनलाईन आलास…?
मित्र ५: हॅलो स्वप़्निल…!
मित्र 6: हाय स्वप़्निल, इतके दिवस कुठे होतास…?
(स्वप़्निल च्या त्या अवस्थेकडे बघून मयुरीचे मित्र मयुरीजवळ त्याची चौकशी करतात…)
सुमित: मयुरी…नक्की काय प्रकार आहे हा…?...त्या खोट्या मोबाईलवर कुणासोबत बोलतोय हा...?...(संपूर्ण रूम मध्ये सोशिअल मिडिआचे पोस्टर्स चिकटवलेले आहेत.)…आणि…हे काय आहे सगळीकडे…?...व्हॉट्सॲप...फेसबूक…ट्विटर…अरे ही रूम आहे, का ईंटरनेटचं जाळं…?
गुरूः कुणी केलं हे सगळं…?
मयुरीः अजून कोण…?...स्वप़्निल…
सुमितः काय…?...अरे पण का…आणि कशासाठी…?
गणेशः ए थांबा रे जरा…(स्वप़्निलकडे जात.)…स्वप़्निल…ए स्वप़्निल...अरे मी गणेश…हेबघ (टाळी देत)…अरे ए स्वप्ऩिल…अरे आपण एका वर्गात शिकतो...स्वप़्निल…ए स्वप़्निल…काय़ प्रकार आहे हा…?...सुमित अरे हा काहीच बोलत नाहीये माझ्यासोबत...!
मयुरीः (रागाने)…असा नाही बोलणार तो…त्याला थोडं मोबाईल मधलं विचार…मग बघ कसा तासभर बोलतोय ते…
गणेशः थांब…एक सेकंद…स्वप़्निल, काय मग नवीन मोबाईल घेतलास…कोणता आहे रे…?
स्वप़्निलः हा मोबाईल ना…सॅमसंग…खूप मस्त आहे…यात फोर जिबी रॅम आहे…आणि स्टोरेज ६४ जिबी…!…दोन-दोन कॅमेरे आहेत…एक रिअर आणि एक फ्रंट…रिअर तेरा मेगापिक्सल आणि फ्रंट आठ…!…यात तू हवेत तेवढे फोटो काढू शकतोस…हा मोबाईल मी खास व्हॉट्सॲप, फेसबूक ॲन्ड प्लेईंग पबजी…!…एकदम फास्ट…बोल, खेळणार तू…?...बोल…बोल…
गणेशः नाही नको…तूच खेळ…(सगळ्यांकडे बघत)…मी फक़्त याला मोबाईल कोणता घेतला, एवढंच विचारलं…आणि याने मला पुर्ण इतिहासच सांगितला…
मयुरीः बघ…बोलले होते ना तूला…
गुरूः फक्त एका मोबाईल मुळे एवढं…!
(गणेश डोक्याला हात लावून बसतो.)
दुर्गाः कशामुळे झालं हे…?
( सगळे मयुरीच्या बाजूला येवून बसतात आणि मयुरी त्यांना घडलेला प्रकार सांगू लागते.)
मयुरी: मागच्या वर्षी…म्हणजे, स्वप़्निल च्या वाढदिवस होता…स्वप़्निल हट्ट धरून बसला होता की, मोबाईलच हवा आहे…काही केल्या ऐकायला तयार नव्हता…शेवटी बाबांनी नाईलाजाने त्याला मोबाईल घेऊन दिला…पण, ती बाबांची सर्वात मोठी चूक ठरली…
सुमित: चूक ठरली म्हणजे…?
मयुरी: ज्या दिवशी बाबांनी स्वप़्निल च्या हातात मोबाईल दिला, त्या दिवसापासून स्वप़्निल सगळ्यांपासून दुरावला…
सुमित: काय…?
मयुरीः अग हो…!...सोशिअल मिडीआच्या पुर्ण आहारी गेला होता तो…
दुर्गा: विश्वास नाही बसत...
गणेश: माझाही नाही बसत…!
मयुरी: अरे आमचाही बसत नहीये अजून…सुरुवातील वाटायचं नवीन मोबाईल आहे…खेळत असेल…पण, नंतर-नंतर तो त्यात एवढा गुंतला की, त्याला त्या मोबाईल शिवाय दुसरं काहीच दिसत नव्हतं…ना आई…ना बाबा…ना मी…!
अंधार
(रंगमंचावर समोरून उजव्या बाजूला स्वप़्निल बसला आहे आणि त्याच्या आजूबाजूला सोशिअल मिडीआच्या आहारी गेलेल्या माणसांची प्रचंड गर्दी आहे…)
अंधार
गणेशः हा...म्हणजे एकंदरीत असं झालं तर…!
गुरू: मग तुझ्या आई-बाबांनी का नाही समजावलं त्याला…?
मयुरी: अरे समजावण्याच्या पलिकडे गेला होता रे तो…जेवणाकडे लक्ष नाही…अभ्यासाकडे लक्ष नाही…
गणेश: अग पण तू होतीस ना त्याच्या जवळ…तू समजवायचंस त्याला…
मयुरी: समजावलं नसेल का मी त्याला…?...कधी रागाने त्याच्या हातातून मोबाईल काढून घेतला तर, आदळाआपट करायचा.
स्वप़्निल: ए माझ्या फोटोला लाईक नाही केलस तू अजून…लाईक कर…
मयुरी: भयानक आहे हे सगळं…पण, त्याची ही अवस्था झालीच कशी…?
मयुरी: त्या दिवशी स्वप़्निलच्या वर्गशिक्षिका घरी आल्या होत्या…त्या बाबांना खूप बडबडू लागल्या...तूमचा मुलगा शाळेत मोबाईल आणतो…इतर विद्यार्थ्यांना सोबत घेऊन गेम खेळत बसतो…
गुरू: मग पूढे…?
मयुरी: मग काय…त्यांनी शेवटी हेही सांगितलं की, तुमच्या मुलाची प्रगती शुन्य आहे…हे जर असंच चालू राहीलं तर, आम्हाला तुमच्या मुलाला एक दिवस शाळेतून काढून टाकावं लागेल…!
दुर्गाः मग तूझ्या बाबांनी काय केलं…?
दियाः अगं बाबांना हा अपमानच सहन झाला नाही आणि त्या रागाच्या भरात बाबांनी स्वप़्निल चा मोबाईल फोडला...खूप मारलं त्याला…त्यात दोन दिवस त्याला या खोलीत बंद सुद़्धा करून ठेवलं…आणि या सगळ्याचा जो काही परिणाम झाला तो तुम्ही बघतच आहात…!
(स्वप़्निल त्याच्या काल्पनिक मित्रांसोबत बोलत आहे…)
स्वप़्निल: दोन महिने झाले, तूला मी फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवलीये…बघ जरा…
गणेश: तरी किती दिवस झाले, हा असा वागतोय…?
मयुरी: अरे सहा महिने झाले हा असा विचित्र वागतोय…रोज सकाळी उठला की, मोबाईल शोधत बसतो…मोबाईल नाही मिळाला तर, आदळाआपट करतो…रडकुंडीला येतो…त्याचं काय चाललंय ना, मला काहीच कळत नाही…
गणेश: अरे याला काय अर्थ आहे…म्हणजे बघ हा…ज्यावेळी तो मोबाईल साठी हट्ट करत होता, तेंव्हाच तुम्ही त्याला ओरडायला पाहिजे होतं…नंतर ओरडून आणि मारून काही फायदा आहे का...?
गुरूः अरे तुझं बरोबर आहे…पण…
मयुरीः गुरू तू थांब जरा…बरोबर बोलतोय तो…
गुरूः अगं पण…
मयुरीः अरे चूक माझ्या आई-बाबांचीच आहे…म्हणजे बघ ना…जेव्हापासून स्वप़्निलच्या हातात पडलाय तेंव्हापासून स्वप़्निल चोवीस तास त्या मोबाईल वर असायचा…पण…पण, आमचे आई-बाबा…आमचे आई-बाबा त्याला थांबवायचं टाकून, घरात येणाऱ्या-जाणाऱ्यांना काय सांगायचे…?...काय सांगायचे…की, बघा…बघा आमचा स्वप़्निल किती हुशार आहे…एवढ्याशा वयात मोबाईल चालवतो आमचा स्वप़्निल…मोबाईल मधलं सगळं कळतं त्याला…सगळं…बघताय ना…बघताय ना…मोबाईल मधलं आता खूप जास्तच कळतं त्याला…
(मयुरी नाराज होऊन खाली बसते.)
गुरु: ए तुम्हाला एक गंमत सांगू…सांगू…?
सगळेः सांग…
गुरूः माझे आई-बाबा आहेत ना…ते मोबाईल वरच एकमेकांना गुड नाईट, गुड मॉरनिंग बोलतात…पण, माझे आजोबा…नाही हा…नाही…माझे आजोबा तर, मला मोबाईलला हात सुद्धा लावून देत नाहीत…
मयुरीः का…?
गुरूः का, तर डोळे खराब होतील…!
सुमित: हे तर काहीच नाही…माझा मोठा भाऊ तर, २४ तास त्या मोबाईलमध्ये गुंतलेला असतो…आई तर ना वैतागून जाते…रोज एकच बोलत असते, वाटोळं-वाटोळं होईल त्या मोबाईल कंपनी वाल्याचं…
मयुरी: या मोबाईल मुळे ना, सगळे एकत्र असून देखील एकत्र नसतात…
दुर्गा: हा बरोबर…आमच्या घरात तर ना, रात्री जेवून झाल्यावर सगळे मस्त एकत्र बसलेले असतात पण, त्यांचा काहीही उपयोग नसतो…सगळे मेले मोबाईल मध्ये...मग मी मग एकटी पडते…
सगळेः आ….
दुर्गाः का रे तुम्ही पण…
गणेश: ए पण, या मोबाईलमुळे ना माझा आणि माझ्या बाबांचा खूप फायदा झाला हा…
मयुरी: कसला…?
गणेश: पुर्वी माझी आई मला रोज सकाळी दोन शिव्या घालून मगच उठवायची…पण एक दिवस मी टी.व्ही. वर जाहीरात पाहीली…मग मी साठवलेल्या पैशातून आणि थोडी बाबांची मदत घेत आईला मोबाईल गिफ्ट केला...आता आई खूप शांत असते…आनंदी असते...त्यामुळे मी आणि माझे बाबा देखील खूप आनंदी असतो…
(सगळे टाळ्या वाजवतात.)
गुरुः झालं…आता या खाली…
(सगळे हसत आहेत पण, मयुरी नाराज आहे…गुरू तिला समजावतो…)
गुरू: मयुरी…आपला स्वप़्निल होईल ठीक…तू काळजी नको करू…आम्ही आहोत ना सगळे तुझ्यासोबत…
गणेशः कसा ठीक होत नाही ते बघतोच…(गणेश स्वप़्निलच्या खांद्यावर हात ठेवत.)…काय रे स्वप़्निल…?
(स्वप़्निल गणेशला ढकलून देतो…सगळे हसायला लागतात…गणेश रागाने स्वप़्निलच्या हाततला मोबाईल खेचून पळू लागतो…स्वप़्निल रागाने त्याच्या मागून पळतो…शेवटी गणेश त्याला मोबाईल देतो…)
गणेशः नाय रे नाय आता माझ्यात ताकद नाय...?
मित्र १ हाय स्वप़्निल…
स्वप्निलः हाय करण…
गणेशः झाली याची परत सुरुवात…
मित्र १ काय करतोयस…?
स्वप्निलः काही नाही रे…बसलोय…
मित्र २ अरे स्वप़्निल, नविन गेम आलाय…!
स्वप्निलः हा माहीत आहे...पबजी मोबाईल…
मित्र ३ स्वप़्निल, चल बाहेर खेळायला जाऊ…
स्वप्निलः नाही नको...मला मोबाईलवरचेच गेम खेळायला आवडतात…
मित्र ४ स्वप़्निल, माझ्या वाढदिवसाचे फोटो लाईक केलेस का तू…?
स्वप्निलः हा करतो…थोड्य़ा वेळाने…
दुर्गा: ए…आपल्याला ना असं काहीतरी करावं लागेल की, ज्याने हा मोबाईल बाजूला ठेवेल आणि पूर्ण बरा होईल…
गणेश: अगं बाई…सहा महिने झाले…जे डॉक़्टर करू शकले नाहीत, तिथे आपण काय करणार…?
दुर्गा: आपण प्रयत़्न तरी करुयात ना…
गुरू: हा बरोबर बोलतेय ती…विचार करा सगळ्यांनी…
स्वप़्निल: चला मित्रांनो, आता माझी पबजी खेळायची वेळ झालीये…आपण बोलू नंतर…बाय…
(हे ऐकल्याबरोबर सुमित मोठ्याने ओरडतो…)
सुमित: आयडीया…
गणेशः ए काय झालं…?
सुमितः (नाचत)…आयडीआ सापडली… आयडीआ सापडली…
(सुमित गणेशचा हात पकडून नाचू लागतो.)
मयुरी: ए….झालं…?...(गणेशकडे बघत.)…आता सांगशील…?
गणेशः काय…?
मयुरीः आयडीया…
गणेशः अगं बाई…आयडीआ त्याची होती...माझी नाही…(सुमितकडे बघत.)…ए सांग ना…
सुमीत: या इकडे, सांगतो…आपण ना परत एकदा स्वप़्निल ला त्याच्या हसत्या-खेळत्या दुनियेत घेवून जावूया…
सगळेः म्हणजे…?
सुमितः अरे…सांगतो ना...ऐका…
(सगळे सुमितच्या भोवताली गोळा होतात आणि सुमित त्यांना आयडीआ सांगतो.)…(पाठीमागे कवीता सादर होत आहे.)
कवीता - बालपण
आठवनिंचा काळ तो बालपणीचा…
निरागस बोबड्या शब्दकोड्यांचा…
लगोरीतल्या नेमबाजाचा असायचा एक वेगळाच साज…
का कुणास ठावूक, तो लहानगा मोबाईल मध्ये हरवलाय आज…
चोर पोलीस खेळताना मात्र असायची त्या चोराची मजा…
तासनतास चालायची शोधाशोध पण, मिळायची त्या पोलीसाला सजा…
लंगडी असो वा डोंगर का पाणी...आठवणींच्या माळेत जोडला जायचा एके-एक मणी…
पण आता, मोबाईल मध्ये गुंतलेल्या लेकराची हाक, कधीतरीच पडते आईच्या काणी…
या काळाबरोबरच सगळेच काही लुप्त झाले…
मैदानातले निरागस पाय, मोबाईल वर अंगठ्याने रांगू लागले…
सुमित: चला तर मग ठरलं…
(सुमित हात पुढे करतो…सगळे त्याच्या हातात हात ठेवतात…)
मयुरी: असं करून जर स्वप़्निल ठीक झाला तर, खरच खूप बरं होईल…
दुर्गा: होईल ग…तू ठेव हात...
(सगळे सुमितच्या हातावर हात ठेवतात…)
सुमित: बोला…मिशन…
सगळे: स्वप़्निल…
स्वप़्निल: ए जरा हळू बोला ना…मला डीस्टर्ब होतंय…
(सगळे कपाळाला हात लावतात…)
गणेशः थांबा…
सुमितः आता काय झालं…?
गणेशः अरे पण याला रुम मधून बाहेर कोण काढणार…?
दुर्गा: एवढंच ना…ते माझ्यावर सोडा…
(सगळे नाचत विंगेत जातात.)
अंधार
----------------------------------------------------------
प्रवेश तिसरा
(रंगमंचावर सनोरून उजव्या बाजूला एक झाडाचं पार आहे आनि त्यावर स्वप़्निल मोबाईल वर खेळत बसलेला आहे...बाजूलाच सुमीत आहे आणि आता तो हातातल्या दांडूने विटी उडवण्याच्या तयारीत आहे...मयुरी शिटी वाजवून खेळ चालू करते.)
गणेशः ए चिटींग…चिटींग…चिटींग…
गुरूः ए मी नाही चिटींग केली…
(सगळे गणेश सोबत भांडू लागतात.)
मयुरीः ए तूम्ही आधी जरा शांत व्हा…शांत व्हा…
गणेशः यांनी चिटींग केली आहे…
सगळेः नाही…
सुमितः अरे जरा त्याला ऐकू जाईल असं बोला…मोठ़्याने बोला जरा…
गणेशः हा…हा…(उगाचच मोठ़्याने.)…काय नाही…?...मी स्वतः बघितलंय…विटी खाली पडली होती…
मयुरीः (स्वप़्निलकडे बघत.)…बर…चला परत खेळा…जा जागेवर…
गुरूः अगं पण…
मयुरी (रागावते)…चला…
(सगळे परत खेळू लागतात.)
सुमितः मयुरी…ए मयुरी…स्वप़्निल बघत होता का…?
मयुरीः होय…
सगळेः एस…
दुर्गाः ए चला आता खेळा…
(गणेश परत विटी उडवतो आणि गुरू ती झेलतो…)
सगळेः (गुरुला)…अरे टाक ना विटी स्वप़्निलच्या अंगावर...अरे टाक ना…टाक…
(गुरू ती विटी स्वप़्निलच्या अंगावर टाकतो…स्वप़्निल विटीकडे बघून आनंदी होतो…पण त्याचे काल्पनीक मित्र त्याला आडवतात.)
सगळे मित्रः स्वप़्निल मोबाईल...मोबाईल...मोबाईल…
(हातातली विटी खाली फेकून देत.)
स्वप्निलः हा...हो...नाही नको...माझा मोबाईल...माझा मोबाईल…
(सगळे नाराज होतात.)
गणेशः ए सगळ्यांनी ईकडे या जरा…आपला प्लॅन फसला रे…
सुमित: नाही…प्लॅन नाही फसलेला…मगाशी स्वप़्निल आपल्याकडे बघत होता…मयुरीला विचारा…
मयुरीः अरे हो...स्वप़्निल बघत होता आपल्याकडे...
सुमितः चला...हार मानू नका...(हात पुढे करत.)…आता प्लॅन बी…
(आता या सगळ्या मुलांनी कांदाफोडी नावाचा खेळ खेळायचं ठरवलं आहे…आणि त्या तयारीला लागले आहेत.)
मयुरीः (शिटी वाजवत)…स्टार्ट…
दुर्गाः बोला…कांदा की, बटाटा…?
गुरूः कांदा…
(उडी मारता-मारता सुमित स्वप़्निलच्या अंगावर मुद्दाम जातो… आणि चुकून गणेश कडून स्वप्ऩिलचा मोबाईल खाली पडतो…स्वप़्निल चिडतो….स्वप़्निल गणेशला ढकलून देतो…गणेश खाली पडतो)
स्वप़्निलः काय चाललंय तुमचं…?...माझा मोबाईल फुटला असता ना आता…!...(परत मोबाईल वर खेळत खाली बसतो)
(गणेश त्याला समजवायला जातो.)
गणेशः (नाराज होत)…स्वप़्निल…स्वप़्निल चल ना रे खेळायला…तूझ्याशिवाय मजा येत नाही रे खेळायला…
मयुरीः कशाला त्या मुर्खाच्या नादी लागतोस…तूम्हाला बोलले होते मी, काहीही करा…हा कधीच सुधारणार नाहीये…चला घरी…
गणेशः थांब मयूरी…मी हार नाही माननार…मी त्याला या अवस्थेत नाही बघू शकत…
सुमितः बरोबर बोलतोय गणेश…अग आम्ही कुणीच स्वप़्निलला या अवस्थेत नाही बघू शकत…
मयुरीः अरे हो…पण, बघतोयस ना…काही परिणाम होतोय का त्याच्यावर…आपण खेळयला लागलो की, तेवढ्यापुरताच बघतो आपल्याकडे…आणि नंतर…परत तो आणि त्याचा मोबाईल…
सुमितः निघेल काहीतरी मार्ग निघेल…तू जरा आधी शांत हो…
दुर्गाः होय ग बाई…तू आधी जरा शांत हो…(दुर्गा तिला गुदगुल्या करते…मयुरी हसायला लागते.)
गणेशः बर मला सांगा, स्वप़्निलचा आवडता खेळ कोणता…?
मयुरीः आवडता गेम…?
दुर्गाः क़्रीकेट…!
सुमितः हड…तुला कुणी सांगितलं, स्वप़्निलला क़्रिकेट आवडतो म्हणून…?...पहिल्याच बॉल ला आऊट होतो तो…त्याचा आवडता खेळ आबादुबी आहे…
गुरूः आबादुबी…?...मला नाही वाटत…
गणेशः तसा तो कबड़्डी सुद़्धा खेळायचा…पण नको…कबड़्डी नको…थोडा अजून विचार करा…
(सगळे विचार करू लागतात आणि अचनक त्यांचं एकमत होतं.)
सगळेः गोट्या…!
मयुरीः ए…आपलं एकमत झालं…!
गणेशः मग आता आपण त्याच्या समोर गोट्या खेळायचं…
मयुरीः आणि स्वप़्निलला आपल्याकडे परत आणायचं…
(सगळे आनंदाने ओरडायला लागतात.)
गणेशः जरा हळू बोला…तुम्ही तयारीला लागा, मी गोट्या घेऊन येतो.
(सगळे तयारीला लागतात…गणेश गोट्या घेऊन येतो…मयुरी पुन्हा एकदा शिटी वाजवून खेळ चालू करते.)
सुमित: बोला कोणती उडवू...?
गुरू: ती हिरवी...
गणेश: नाही नको…ती लाल…
सुमितः (हसत)…लाल…आत्ता उडवतो बघ…
गणेशः हा उडव…उडव…
(सुमित गोटी उडवायला जातो पण त्याचा नेम चुकतो आणि सगळे हसू लागतात.)
गणेशः आला मोठा…चला आता मी…
गुरूः नाही मी…
(गणेश आणि गुरू भांडू लागतात.)
गणेशः नाही मी…
(गणेशच्या हातातून गुरू गोटी हिसकावून घेतो)
गुरूः बोल...कोणती उडवू...
दुर्गाः ती हिरवी...
(गुरुचा देखील नेम चुकतो आणि सगळे त्याच्यावर हसायला लागतात.)
गुरूः हा असुदे...असुदे...
गणेशः आता मी...
(गणेश गोटी उचलायला जातो तेवढ्यात तिथे स्वप़्निल येतो आणि तो गोटी उचलतो…सगळे आच्छर्याने स्वप़्निलकडे बघत आहेत.)
स्वप्निलः बोला कोणती उडवू…
गुरूः उडव…कोणतीही उडव…
स्वप़्निलः (गुरूला)…हे बघ…असं उभं रहायचं असतं…
गुरूः हा…हा…
(स्वप़्निल अचूक त्या गोटीला उडवतो...)
स्वप़्निल: एस...
(सगळे आच्छर्याने त्याच्याकडे बघत आहेत...स्वप़्निल जिंकलेल्या गोट्या गोळा करत आहे...थोडा वेळ शांतता आणि मग एकदाच सगळे मोठमोठ्याने ओरडू लागतात...स्वप़्निलला उचलून घेतात...दुर्गा स्वप़्निल चा मोबाईल त्या काल्पनिक मित्रांवर फेकून देते...)
अंधार
--------------------------------------------------
प्रवेश चौथा
(रंगमंचावर समोरून उजवीकडून स्वप़्निलचे मित्र टायर काठीने ढकलत डावीकडे जातात...त्यांच्या मागून स्वप़्निल येतो...मयुरी त्याला हाक मारून थांबवते...आणि प्रेक्षकांकडे बघत...)
मयुरी: काय मग...कशी वाटली आमची आयडीआ...?...आवडली ना...अरे मग बघताय काय...?...लाईक करा...
गणेश+सुमितः कमेंट करा आणि...
दुर्गा+स्वप़्निल: आणि…
सगळेः शेअर करा…
पडदा
-----------
सदर एकांकीकांचे सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन आहेत. त्यांचे प्रयोग करण्याआधी लेखकाची परवानगी आवश्यक आहे.