मनूची छत्री खरेदी (कथा)

मनूची छत्री खरेदी
लेखन: योगिता शिंदे
चित्रेः पारूल समीर


आज तसा रविवार, तरीही मनू सकाळी लवकर उठली. डोळे चोळतच बाबाजवळ आली.
“काय रे बाबा, ऊठ ना लवकर!” असं रडवेलं होऊन म्हटली.
“मन्या, झोप गं तू पण अन् मलाही झोपू दे बरं. आज सुट्टी आहे.” बाबाने पांघरूण अंगावर ओढून घेत म्हटलं.
“ऊठ रे बाबा! नाहीतर बाजारातल्या छत्र्या संपून जातील ना!” मनू गाल फुगवून म्हणाली.
आज मनू बाबाबरोबर बाजारात छत्री आणायला जाणार होती. शाळेत ताईंनी नाणी–नोटा हा भाग शिकवल्यानंतर मनूला काहीतरी खरेदी करायचं होतं, पण काय हे सुचत नव्हतं. आई मनूला म्हणाली, “बघ, तुला काय घ्यायचं हे तूच ठरव. पण लक्षात ठेव, ती वस्तू गरजेची पण असायला हवी.”
मनूच्या डोक्यात दोन दिवस खरेदीचाच विचार सुरू होता. मनूला एकदम आठवलं, तसं ती आईबाबांकडे धावतच आली.
"आई, तू मला म्हटली होती, की मी तुला छत्री घेऊन देईन आणि मला नको तो रेनकोट. मी मोठी झाली ना रे बाबा आता!" मनू आई बाबांकडे बघत म्हणाली. तसं बाबाने रविवारी आपण छत्री खरेदीला जाऊया असं कबूल केलं. आई त्या दोघांबरोबर जाणार नव्हती, कारण तिला ऑफिसचं महत्त्वाचं काम होतं.
“ए काय गं आई सुट्टीच्या दिवशीपण काम?” असं मनूचं आईला विचारून झालं होतं; पण, 'आईला खरंच महत्त्वाचं काम असेल, नाहीतर ती आलीच असती' असं मनूनं मनाशीच म्हटलं.
“ए आई, कशी छत्री घेऊ गं मी? सिन्ड्रेलावाली आणू की यूनिकॉर्नवाली? की पिहूकडे आहे तशी रंगीबेरंगी? नाहीतर नको. लगेच ती मला कॉपीकॅट म्हणेल.” असं तोंड वेडावून मनू म्हणाली.
छत्री खरेदीचं ठरल्यापासून घरातलं वातावरण अगदी छत्रीमय झालं होतं. मनूने तर तिला कशी छत्री हवी याचं चित्रही काढलं होतं.

मनू अन् बाबानं भरभर आवरलं. बाबाने केलेले पोहे खाल्ले आणि मनू नि बाबाची ‘सवारी’ बाजारात निघाली. गाडीत बसल्यानंतर मनू बाबाला म्हणाली, “बाबा, आपली गाडी जर उडत उडत बाजारात गेली, तर आपण किती पटकन छत्री आणायला जाऊ नं.”
तसा बाबा मोठ्याने हसला.

बाबा आणि मनू गाडी पार्क करून दुकानात गेले.
“बाबा, किती छत्र्या आहेत ना इथे! असं वाटतंय, आपण छत्र्यांच्या देशातच आलो आहोत की काय!” डोळे मोठे करत, आश्चर्याने मनू म्हणाली. बाबाने हसत मान डोलावली.

 


मनू म्हणाली, “दुकानकाका, मला सिन्ड्रेलाची,नाहीतर फुलाफुलांची छत्री दाखवा ना.”
दुकानकाकांनी मनूला विविध रंगांच्या, कार्टून्सच्या, फुलाफुलांच्या खूप साऱ्या छत्र्या दाखवल्या. मनूला तर, कोणती छत्री घेऊ अन् कोणती नको असं झालं होतं. शेवटी मनूने तिच्या आवडीच्या आकाशी रंगाची फुलाफुलांची नक्षी असलेली छत्री घेतली.
“बाबा, तू फक्त माझ्याजवळ उभा रहा. माझी छत्री मीच खरेदी करणार .”
“ठीक आहे बाईसाहेब तुम्ही म्हणाल तसं.” बाबा हसत म्हणाला.
मनूने दुकानकाकांना मोठ्ठं असल्याच्या आविर्भावात विचारलं, “किती रुपयांची आहे हो काका, छत्री?”
दुकानकाका मनूच्या बाबाकडे बघत व हसतच “४५०रुपये” असं म्हणताच, मनू मोठे डोळे करून म्हणाली, “नाही हो काका, थोडे पैसे कमी करा ना.”
नंतर बाबाकडे बघत व काहीतरी विचार करत म्हणाली, “बाबा, ४५०रुपये म्हणजे १००रुपयांच्या ४ नोटा आणि ५० रुपयांची १ नोट ना?”
बाबा म्हणाला, “बरोबर!”


मनू दुकानकाकांकडे बघून बोटांवर हिशोब करत म्हणाली, “काका, ५० रुपये तरी कमी करा ना, प्लीज. नाहीतर १००रूपयांच्या ३ नोटा घ्या. म्हणजे ३०० रुपये होतील.”.
तसे काका हसत हसतच म्हणाले, “नाही गं बाळा, किंमत योग्यच आहे. पण तू एवढं म्हणते आहेस, तर ५० रुपये कमी करतो हं.” असं म्हणून मनूला छत्री उघडून आणि बंद करून दाखवली व तिलाही तसं करायला सांगितले. नंतर मनूने दुकानकाकांना मोजून ४०० रुपये दिले.

मनू आज खूप खूश होती. घरी येऊन मनूनं आईला छत्री दाखवली. छत्री उघडून मस्त गिरकी घेतली.


“ए आई, आता पाऊस केव्हा येईल गं?” आणि गंमतच झाली तेव्हाच रिमझिम पाऊस सुरू झाला. मनूनं आई-बाबाला हाक मारली आणि तिघेही मनूच्या छत्रीतून अंगणात निघाले. पण, तिघेही एकदम छत्रीत काही मावेना. मग, आधी बाबाला नंतर आईला मनूने छत्रीतून मस्त चक्कर मारली. आज मनूला खरंच मोठं झाल्यासारखं वाटत होतं.
“मी शाळेत छत्री घेऊन जाणार हं.”
“आई, मी उद्या बाईंना सांगेन की मी स्वतः छत्रीची खरेदी केली.”
मनूचं छत्रीपुराण सुरू झालं. आई हसली आणि मनूला म्हणाली, “चल, आता आपण जेवूया बरं.”
पण, हे ऐकायला मनू तिथं होतीच कुठे! ती तर केव्हाच पळाली होती, मित्रमैत्रिणींना छत्री दाखवायला.