जीवाभावाची मैत्री (कथा)
जीवाभावाची मैत्री
लेखन: एकनाथ आव्हाड
चित्र: रसिका काळे
"माधव कुणाच्या जवळ राहतो रे? बरेच दिवस झाले, तो शाळेच्या ऑनलाईन तासाला येतच नाही. बरं, त्याचा फोनही लागत नाही." झूम ॲपवर 'आठवी ब'च्या वर्गशिक्षिका मुळेबाईंनी त्यांच्या तासाला माधवबद्दल मुलांना विचारले. माधवचा विषय निघताच प्रणवच्या मनाला चुटपुट लागली. कारण, माधव प्रणवचा खास मित्र. खरंतर, प्रणवनेही दोन तीन वेळा माधवला फोन केला होता, पण त्याचाही फोन लागलाच नाही.
सध्या कोरोनाच्या साथीमुळे घरातच ऑनलाईन शाळा भरत होती. पण नेमका माधवच हल्ली तासाला येत नव्हता. काय झालं असेल बरं? अनेक शंकाकुशंका प्रणवच्या मनात यायला लागल्या. तसा पटकन स्वतःला सावरुन, तो बाईंना म्हणाला, "बाई, मी लवकरच कळवतो तुम्हांला त्याच्याबद्दल ."
"हो, कळव नक्की." असं म्हणून बाईंनी शिकवायला सुरूवात केली. पण आजच्या तासाकडे प्रणवचं लक्ष नव्हतंच मुळी. राहून राहून त्याच्या मनात माधवचाच विचार येत होता.
आजचे सर्व ऑनलाईन तास झाल्यावर प्रणव आईला जरा काळजीनेच म्हणाला, "आई, अगं माझा मित्र तो माधव आहे ना, तो ऑनलाईन तासाला सध्या येतच नाही. काय झालं असेल गं? मी जाऊन येऊ का त्याच्या घरी?"
प्रणवचं बोलणं ऐकून तिथे त्याची मोठी बहीण श्रावणी आली. ती लगेच म्हणाली, "प्रणव, अरे आपण मुलांनी घराबाहेर पडू नये म्हणूनच तर शाळेने ऑनलाईन तास घरीच सुरु केले आहेत ना? पण तू काळजी करु नकोस. आपण बाबांना पाठवू माधवच्या घरी. मी फोन करते तसा बाबांना. कामावरून घरी येताना ते त्याच्या घरी जाऊन येतील. माधवची चाळ माहीतच आहे बाबांना." ताईच्या बोलण्याने प्रणवला हायसे वाटले. श्रावणीने लगेच बाबांना फोन लावलाही आणि त्यांचाही तिकडून लगेच होकार आला. आईला आपल्या मुलीच्या तत्परतेचं, निर्णयाचं कौतुक वाटलं.
संध्याकाळी बाबा कामावरून घरी आले. आधी त्यांनी स्वच्छ आंघोळ केली. कपडे घातले. मग प्रणवला ते म्हणाले, "प्रणव, तुझ्या मित्राच्या घरी गेलो होतो मी. अरे, त्यांचा मोबाईलच हरवलाय आणि आता नवीन मोबाईल घ्यायला सध्या त्यांच्याजवळ पैसेही नाहीत. त्याच्या आईचे घरकाम या कोरोनामुळे सुटलेय. बघू म्हणाले नंतर..."
प्रणवने काहीतरी विचार केला आणि पटकन तो आतल्या खोलीत गेला.आणि आपला पैसे बचत करुन ठेवायचा गल्ला बाबांकडे देत म्हणाला, " बाबा, या गल्ल्यात चार वर्षांपासून मी पैसे बचत करतोय. आपण या पैशातून माधवला नवीन मोबाईल घेऊन देऊया का? तो तासाला आला तर मला फार आनंद होईन. वडील नाहीत त्याला, तो काम करुन शिकतो. शाळेत येण्यापूर्वी, तो उदबत्त्या विकतो. पण बाबा, या कोरोना काळात उदबत्त्या विकायला तो बाहेर कसा पडणार? प्लीज आपण देऊया ना त्याला एक मोबाईल. "
प्रणवच्या हट्टापुढे वडिलांचे काहीच चालेना. शेवटी गल्ला फोडला. आठ हजार रूपये साठले होते गल्ल्यात . बाबांनी त्यात आणखी दोन हजार रूपये घालून दहा हजाराचा एक चांगला ॲण्ड्राईड मोबाईल ऑनलाईनच बुक केला- माधवसाठी. दोन दिवसात मोबाईल घरी आला. बाबांनी त्यात नवीन सिमकार्ड टाकून इंटरनेट डाटा भरला आणि तो मोबाईल माधवला ते देऊन आले. 'आता तासाला जाॅईन हो. राहिलेला अभ्यास प्रणवकडून घे." असं आवर्जून त्यांनी त्याला सांगितले.
माधवने नवीन मोबाईलवरुन पहिला फोन केला तो आपल्या मित्राला, प्रणवला. म्हणाला, "प्रणव, तुझ्या या भेटीबद्दल मी काय बोलू मित्रा. तुझ्यामुळे माझी थांबलेली शाळा आता पुन्हा सुरु झाली बघ .आणि हे मी कधीच विसरु शकणार नाही. पण प्रणव, मित्रा ,माझं एक ऐकशील? कोरोनाचे हे संकट कमी झाल्यावर मी पुन्हा जोमाने उदबत्त्या विकण्याचे माझे काम सुरु करणार आहे. तेव्हा मी मोबाईलला लागलेले सर्व पैसे तुझ्या बाबांना नक्की परत करेन. आणि तेव्हा तू ते पैसे घ्यायला हवेत. घेशील ना? मला वचन दे." प्रणवला क्षणभर यावर काय बोलावं कळेना. पण एका मित्राचा स्वाभिमान दुस-या मित्राने जपलाच पाहिजे, असे प्रणवला वाटले. आणि तो म्हणाला, "ठीक आहे मित्रा. जशी तुझी इच्छा.आईची काळजी घे आणि आता आॅनलाईन तासाला रोज ये... " बोलता बोलता का कुणास ठाऊक प्रणवचे डोळे इकडे भरून आले . आणि तिकडे माधवचेही.
फुकटचीवस्तू कुणाकडूनही घेऊ नये, ही माधवच्या मनातली घालमेल जशी प्रणवला कळत होती. तशीच मित्राचं शिक्षण कुठल्याच कारणामुळे थांबू नये ही प्रणवच्या मनातली धडपड माधवलाही समजत होती. कारण न बोलताही मित्रांच्या मनातलं सारं काही सांगून जाते... तिच तर खरी मैत्री असते ना...!
------०००००-------
लेखकाचा ईमेल: eknathavhad23@gmail.com