झाडं चालायची थांबली (लोककथा)

झाडं चालायची थांबली
लेखन: अश्विनी बर्वे
चित्रे: ज्योती महाले

फार फार पूर्वी माणूस जगण्यासाठी जंगलात भटकत असे त्यावेळची ही गोष्ट. त्यावेळी झाडं आजच्यासारखी एका जागी स्थिर नव्हती. मग कशी होती? तर ती माणसासारखीच हिंडत फिरत असत.
‘अरे, इथे किती ऊन आहे, जरा माझ्यावर सावली धर बरं.’ असं माणसाने सांगितलं की लगेच एखादं झाड माणसाच्या जवळ येऊन उभं राही. हो, हो, झाडांना माणसं जे काही बोलत ते सगळं कळत असे.
‘आज तुम्ही सगळेजण माझ्याबरोबर डोंगरावर चला, तिथं काहीसुद्धा खायला मिळत नाही. तुमची फळं खाऊन मी तिथं राहू शकेन.’ असं माणूस झाडांना म्हणायचा. मग लगेच झाडं माणसाचं ऐकत. जेव्हा कोणीही माणूस झाडाला हाक मारी, तेव्हा झाड त्याच्याकडे जाई आणि त्याला साथ देई. झाडाला माणसाचं म्हणणं आणि माणसाला झाडाचं म्हणणं कळत असे.


कधी कधी माणूस शिकार करून दमत असे, तेव्हा खेळ म्हणून झाडं आणि माणूस धावण्याची शर्यत लावत असत. “अरे, माझ्यापेक्षा वेगाने धावू नकोस!” माणूस झाडाला म्हणे. यावर झाड मोठमोठ्याने हसे. त्याला धावण्यात गंमत वाटत असे.
त्या काळात ‘इलपमन’ नावाची एक जागा होती. तिथे झाडं आणि माणसं नाचत,गाणी म्हणत आणि खूप आनंद लुटत. ते मित्रांसारखे भावंडासारखे तिथे हसत खेळत. मनोरंजन करत ते आपला वेळ घालवत.
पण, काळ बदलला आणि माणसाच्या मनात वर्चस्वाच्या - म्हणजे आपण झाडांपेक्षा हुशार आहोत या - भावनेने प्रवेश केला. तो झाडाला काम सांगू लागला, “मला तुझ्या फांदीवर बसव आणि पळ.” झाड तसं करत असे. मग माणूस झाडावर बसून शिकार करू लागला.


‘मला शेकोटीसाठी लाकडं दे.’ अशी आज्ञा माणूस झाडाला देई. तेव्हा झाड स्वतःला गदागदा हलवून फांद्या पाडी. यावेळी झाडाला खूप वेदना होत. एक दिवस तर माणसाने झाडाच्या अंगावर मोठमोठे दगड ठेवले आणि त्याला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर वाहून न्यायला लावले. झाडाला ते ओझं सहन होईना. त्याला ते दगड घेऊन चालता येईना. ते कसेबसे अडखळत चालू लागले. त्याचे ते चालणं बघून मदत करणं दूरच उलट माणूस जोरजोरात हसू लागला. झाडांना मदत करण्याच्याऐवजी त्यांची चेष्टा करू लागला.
“आपण माणसाला एवढी मदत करतो, पण तो तर आपल्याला हसतो.” झाडं एकमेकांना म्हणू लागली. त्यांना खूप वाईट वाटलं. “आपण तर त्यांना आपले मित्र मानत होतो, पण ते तर आपल्याशी वाईट वागताहेत” एक झाड म्हणालं. मग सर्व झाडांनी मिळून ठरवलं की आता आपण अजिबात चालायचं नाही आणि धावायचं नाही. तेव्हापासून झाडं स्थिर झाली. त्यांनी माणसासारखं इकडे तिकडे फिरणं बंद केलं.

झाडं चालत नाही हे माणसाच्या लक्षात आलं. झाडं आता माणसाशी बोलत नव्हती, त्यांच्यासोबत नाचत नव्हती. पण, आता काही उपयोग नव्हता. त्यांना आपल्या वागण्याचा पश्चात्ताप झाला. पण झाडं आपल्या जागेवरून हलली नाहीत.
माणसाने त्याची चूक कबूल केली, “आम्ही तुम्हांला हसणार नाही, पण तुम्ही परत चालायला लागा.” असं माणूस म्हणाला. झाडांनी ऐकलं नाही. पण त्यांनी आपल्या जुन्या मित्राला मदत करण्याचं मात्र सुरू केलं. आजही माणूस झाडांकडून सावली घेतो, लाकडं घेतो, फळं-फुलंही घेतो. काही माणसं झाडांवर खूप प्रेम करतात, त्यांना पाणी घालतात, त्यांच्याजवळ येऊन बसतात, त्यांच्याशी गप्पा मारतात आणि त्यांना कुरवाळतात. तेव्हा झाड आनंदाने डोलतं, आपल्या पानांचा सळसळ आवाज करतं. पण, त्याने चालण्याचं मात्र सोडून दिलं आहे.

अजूनही काही माणसे झाडाशी वाईट वागतात, म्हणून झाडं आजही चालत नसतील का? माणूस झाडं तोडत राहिला, तर झाड कसं वागेल त्याच्याशी? झाडं ही असलेली मैत्री तोडतील का? काय होईल मग? तुला काय वाटतं?