तारपावर थिरकले चिमुकले पाऊल (गोष्ट)

 तारपावर थिरकले चिमुकले पाऊल
लेखनः एकनाथ आव्हाड । चित्रः गौरी चौगुले

 

संध्याकाळी शाळा सुटल्यावर सुमन शाळेतून बाहेर पडली, ती मोठ्या उत्साहातच. तिचा मोठा भाऊ राघव तिच्यासोबतच होता. सुमा आठवीत आणि राघव नववीत. घरी येताना वाटेत सुमनची तोंडाची टकळी सारखी चालूच होती. राघव तिची अखंड बडबड ऐकून वैतागला, पण या बाईसाहेब थांबायचं नाव घेतील तर शप्पथ!

घरात पाय टाकल्याबरोबर तिने आईलाही तेच सांगायला सुरुवात केली. तेव्हा मात्र राघव चिडून म्हणाला, "अगं सुमा, जरा गप्प राहशील का? काय सारखं तुझं आपलं तेच तेच. माहितीय आनंद झालाय तुला, पण तेच तेच ऐकून आता तर माझे कान किटले बुवा." आई लगेच सुमनची बाजू घेत म्हणाली, "काय सांगायचं ते सांगू दे रे तिला. पोरगी हिरमुसली बघ."

आईने आपली बाजूने लावून धरल्यावर सुमनची गाडी कसली थांबतेय. "अगं आई, आज की नाही शाळेत काय झालं, जिल्हास्तरीय लोकनृत्य स्पर्धेत भाग घेण्यासाठी 'सरनोबत'बाईंनी मुलंमुली निवडल्या. मलाही त्यांनी निवडलं. निवड केलेल्या सर्व मुलामुलींसमोर काय त्या म्हणाल्या, 'सुमन या लोकनृत्य स्पर्धेचं नेतृत्व करेल, कारण नृत्याची तिला चांगली जाण आहे. भरतनाट्यमच्या पाच परीक्षा पूर्ण केल्या आहेत तिने.' अगं आई, सगळी मुलं माझ्याकडे कौतुकाने पाहत होती. मला तर खूप भारी वाटत होतं. स्पर्धेसाठी 'तारपा' नृत्य बसवणार आहेत बाई. शाळेतून घरी येताना वाटेत दादाला हेच सारं सांगत होते, तर तो बघ कसा चिडला माझ्यावर."

"अगं, आनंदाने हुरळून जाऊ नये, तेच सांगायचं असेल तुझ्या दादाला. पण, त्याची सांगायची पद्धत थोडी चुकलीच. बरं चला, आधी शाळेचे कपडे बदला आणि हातपाय तोंड धुऊन या. मी तुमच्या आवडीची गरमागरम थालीपिठं करते."

आई स्वयंपाकखोलीकडे वळणार तेवढ्यात बाबा घरी आले. सुमा आता बाबांना लगेच शाळेतली कथा सांगत बसते की काय, असे राघवला वाटले. सुमन बाबांना म्हणालीच, "बाबा आज शाळेत घडलेली गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. पण आधी हात पाय तोंड धुऊन फ्रेश होऊन येते." राघवने सुमनचे हे बोल ऐकून हुश्श म्हटले.

बाबा म्हणाले, "होय होय. मीही फ्रेश होतो. मग आपण छान गप्पा मारू." आई म्हणाली ,"गप्पांसोबत खायला गरमागरम थालीपिठं तयार होतीलच तोवर."
बाबा म्हणाले, "व्वा! मग तर दुधात साखरच."

बाबा, राघव आणि सुमा फ्रेश होऊन बाहेरच्या खोली येऊन बसले. लगेच आई स्वयंपाक खोलीतून गरमागरम थालीपिठं घेऊन आली. आता थालीपिठांवर ताव मारता मारता गप्पा सुरू झाल्या. सुमाने शाळेत घडलेली गोष्ट आधी बाबांना सविस्तर सांगितली. बाबांनी तिला विचारले, "पण सुमा, तुला तारपा नृत्याबद्दल काही माहीत आहे का?"

"नाही ना हो बाबा. तुम्ही सांगा ना."

"सुमा बाळा, नृत्य असो की अभ्यास, कोणतीही गोष्ट ही मुळापासून करावी आणि मनापासून करावी. म्हणजे, ती गोष्ट चांगलीच ध्यानीमनी बसते. बरं का राघव, आदिवासींमध्येही विविध समाज आहेत. त्यापैकीच वारली हा एक समाज. हा समाज कलाप्रिय आहे. उत्सवप्रिय आहे. वारली चित्रकला जशी प्रसिद्ध आहे तसेच या समाजातील तारपा नृत्यदेखील खूप प्रसिद्ध आहे. या समाजात तारपा नृत्याला फार वेगळे स्थान आहे. मंगल प्रसंगी, लग्न यावेळी तारपा नृत्याचा फेर धरला जातो. शिवाय भाताची किंवा नागलीची लागवड केली जाते, तेव्हा तारपा नृत्योत्सव साजरा केला जातो. तसेच हेच पीक तरारून आले की, या लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटतो त्या आनंदातही हे नृत्य सादर केले जाते. हे नृत्य सादर करण्याचीही एक वेळ आहे. साधारणत: चंद्र दिसल्यावर तारपा नृत्याचा फेर धरला जातो. मध्यरात्रीपर्यंत विशिष्ट रचनेतून हे समूहनृत्य सादर होते.
आदिवासी बांधवांचे लक्षवेधी कपडे, घुंगरू, ठेका धरण्याची विशिष्ट पद्धत व त्या ठेक्यावर ' हेऽऽऽऽ ओऽऽऽऽ ' अशा हाका देणे आणि बेधुंद होऊन नाचणे हा सोहळा बघताना बघणा-यांचे डोळे दिपून जातात. या रिंगणाच्या मध्यावर एकजण तारपा वाजवत असतो. हा तारपा तो वाजवत असतानाच तो देखील ठेका धरत असतो. गोलाकार, हातात हात गुंफून हे नृत्य जो तारपा वाजवत असतो त्याच्याकडे पाठ करून केले जाते. हे पूर्ण नृत्य गोलाच्या आत नव्हे तर बाहेरच्या दिशेनेच केले जाते. हातात हात गुंफून हे नृत्य केले जाते. 'हे आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून झाले आहे' असा संदेश यातील हातात हात गुंफणे ही रचना देते."

सुमा म्हणाली, "खूपच छान ना बाबा. पण बाबा, तारपा म्हणजे काय हो?"

"सुमा, तारपा हे या वारली समाजातील एक खास वाद्य आहे. सुकलेला भोपळ्यापासून हे वाद्य तयार केले जाते. एक मोठा वाळलेला भोपळा घेतला जातो. तो कोरून-कोरून पोकळ बनविला जातो. त्याला विशिष्ट ठिकाणी छिद्र पाडले जातात. आदिवासी अर्थात वारली कलेनुसार त्याला सजविले जाते आणि हा तारपा वाजविला जातो. तारपा वाजवताना तुमच्या श्वासावर तुमचे उत्तम नियंत्रण हवे. त्याच बरोबर तारपा वाजवताना तुमचा दमही जास्त टिकायला हवा. गारुड्याच्या पुंगीसारखे असणारे हे तारपा वाद्य वाजविणारा वादक जेव्हा आपली लय बदलतो त्यावेळी या नृत्याची लयही बदलते."

मग बाबांनी यू ट्यूबवर काही तारपा नृत्याचे व्हिडिओ मोबाइलवर दाखवले. हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार मोबाइलवर पाहून सुमा राघव खूपच खूश झाले. सुमा तर या नृत्य प्रकाराने एकदम हरखूनच गेली. रात्री झोपल्यावर तर, ती स्वप्नात आदिवासी वारली बांधवासोबत तारपा नृत्य करून आली.


स्रोतः युट्युब

दुस-या दिवसापासून सुमाच्या डोळ्यापुढे एकच ध्येय होते. ते म्हणजे तारपा नृत्यात पारंगत होणे. आवड असली की सवड आपोआप मिळते. शाळेत जास्त वेळ थांबून ती तारपा नृत्याचे धडे इतर मुलामुलींसोबत मनापासून गिरवत राहिली. सरनोबत बाई आणि सर्व मुलेमुली हे तारपा नृत्य अधिक चांगले , अधिक नेमके होण्यासाठी खूप मेहनत घेत होते.

एकदाचा स्पर्धेचा दिवस उजाडला. या स्पर्धेच्या निमित्ताने केवढे तरी लोकनृत्य प्रकार सुमाला पाहायला मिळाले. परीक्षकांनी अंतिम दोन उत्तम नृत्य प्रकार निवडले, एक आदिवासी तारपा नृत्य आणि दुसरे कोंकणातील बाल्या नृत्य. अगदी अटीतटीचा सामना झाला. मग परीक्षकांनी दोन्ही गटाला समोर बोलावले.

लोककला अभ्यासक सदानंद राणे परीक्षक होते. त्यांनी दोन्ही गटातील मुलामुलींना, त्यांनी सादर केलेल्या नृत्यप्रकाराबद्दल काही प्रश्न विचारले. बाल्यानृत्य गटातील मुले गप्पच राहिली. मग तारपा नृत्यातील गटातील मुलांनाही तोच प्रश्न विचारला. तीही मुलं क्षणभर गप्पच, पण लगेच सुमा पुढे आली. बाबांनी सांगितलेली तारपा नृत्याची माहिती व तारपा नृत्याबाबत बाबांनी दाखवलेले व्हिडिओ तिला आठवले. तिने घडाघडा सारे सांगितले. सगळे अवाक झाले.

निकाल सांगताना सदानंद राणे सर म्हणाले, "या लोकनृत्य प्रकारांची स्पर्धा घेण्यामागे हे नृत्यप्रकार तुम्हा मुलांना कळावे, ते जतन केले जावे हा तर उद्देश आहेच, पण त्याबरोबरच तिथल्या लोकांची संस्कृती, त्या नृत्यामागची त्यांची भावना, त्यांची जीवनशैलीही तुम्हाला समजावी हाही उद्देश आहेच. आणि यात सरशी ठरलेली शाळा आहे अभ्युदय विद्यामंदिर. त्यांनी सादर केलेल्या तारपा नृत्याला अंतिम प्रथम क्रमांक जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे या गटात सामील असलेली 'सुमन सरदेशमुख' ह्या विद्यार्थिनीला माझ्याकडून विशेष बक्षीसही देण्यात येणार आहे. आता तिला वेगळे बक्षीस का ते तुम्हाला कळले असेलच!"

टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला आणि सुमाला आठवले बाबांचे शब्द 'कुठल्याही गोष्टीचा अभ्यास वरवर न करता मुळापासून करावा आणि मनापासून करावा. म्हणजे ती गोष्ट चांगलीच ध्यानीमनी बसते.' सुमा पुटपुटली,'आणि मनापासून केली की असे बक्षीसही मिळवून देते.' या विचाराने तिच्या गालावर आपसूक हसू फुलले आणि का कुणास ठाऊक तिला बाबांचा खूप खूप अभिमानही वाटला.