तळं आणि मासे (अनुभव)

तळं आणि मासे

लेखन आणि चित्रेः नक्षत्रा पालशेतकर, वय ७ वर्षे

 

आम्ही रोजच्याप्रमाणे टेकडीवर गेलो होतो आणि आम्ही मारुती देवळाच्या बाजूने जात होतो. तिथून पुढे जाताजाता एक तळं लागतं आणि त्या तळ्यात मासे दिसले! आणि त्या तळ्यात बेडकाची पिल्लं सुद्धा आहेत! गप्पी मासे बघून आम्ही काही मासे पकडून घरी आणायचे ठरवले. 

दुसऱ्या दिवशी आम्ही (मी, आई, बाबा) जाळे घेऊन तळ्यापाशी आलो. आम्ही एका बाटलीत रंगीत मासे पकडले. घरी आल्यावर बघतो तर काय! काही मासे मेलेले होते. फक्त नऊ मासेच जगले. आम्हाला खूप वाईट वाटले. आम्ही ठरवलं की मासे परत तळ्यात सोडून यायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी मी आणि बाबांनी मासे परत तळ्यात सोडले. मेलेले मासे बेडकाच्या पिल्लांनी खाल्ले. आम्ही ठरवलं, की परत कधीही मासे घरी आणायचे नाहीत. मग आम्ही माशांना कुरमुरे आणि पोहे घालायला लागलो. माशांना खूप आवडायचं.

 

एके दिवशी मी आणि बाबा तळ्याकाठी बसलेलो तर काय! आकाशात इंद्रधनुष्य! आम्हाला खूप आनंद झाला. आम्ही घरी जायला निघालो आणि काय! मुसळधार पाऊस सुरू झाला. आम्ही रेनकोट घातले. आमच्याकडे एक छोटी काठी आणि मोठी काठीसुद्धा होती. गवतातून चालताना मोठ्या काठीचं एक टोक बाबांनी धरलं आणि मी दुसरं टोक धरलं. माझ्या दुसऱ्या हातात छोटी काठी धरली. आम्ही हळूहळू स्कूटरपाशी आलो आणि घरी गेलो.

जेव्हा आम्ही बरेचवेळा तळ्याजवळ जाऊ लागलो, तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं, की जर आपण तळ्यात कमळं  लावली तर! इथे छान कमळाची फुले येतील, तळं खूप सुंदर दिसेल आणि त्या कमळावर मधमाश्या येतील. तसच उन्हाळ्यात सुद्धा तळ्यात पाणी टिकून राहील. म्हणून बाबांनी कमळ बिया आणल्या आणि आम्ही त्या बिया तळ्यात टाकल्या.

 

पावसामुळे गवत खूप वाढले असल्याने नंतर काहीं दिवस आम्ही तळ्याजवळ जाऊ शकलो नाही.

आठवड्यांनी मात्र आम्ही तळ्याजवळ गेलो. आणि बघतो तर काय! तळ्यात कमळाची छोटी छोटी पाने आली होती. खूप बिया टाकल्या होत्या पण ५-६ रोप दिसली. आम्हाला खूप आनंद झाला. आता तर तळ्यातलं पाणी पण खूपच वाढलंय. जास्त रोपं येण्यासाठी आणि अजुन बिया आणून टाकायचं ठरवलंय.