फॅन फिक्शन: लॉस्ट इन अंटार्क्टिका
लॉस्ट इन अंटार्क्टिका
लेखन: निनाद आपटे, इयत्ता ८वी, अक्षरनंदन
चित्र: स्मितकबीर
केविन व त्याचे कुटुंबीय दर वर्षी ख्रिसमसला वेगवेगळ्या ठिकाणी जात असत. त्यांनी जवळ-जवळ संपूर्ण जग पाहिलेलं असतं. या ख्रिसमसला त्यांना प्रश्न पडतो की आता कुठे जायचं?
केविन मनातल्या मनात म्हणतो, ‘आपण संपूर्ण जग फिरलोय ना? मग साऊथ पोल आणि नॉर्थ पोल विमानातून बघायला फार मजा येईल.’ त्याला ही मस्त आयडिया सगळ्यांना सांगावीशी वाटते. जिन्यावरून खाली उतरताना आरोळी मारल्यासारखं दोन्ही हात तोंडावर ठेवून तो ओरडू लागतो, “सगळ्यांनी पटकन खाली या! एक जबरदस्त आयडिया सुचली आहे!” तेवढ्यात त्याचा पाय सटकून तो घरंगळत खाली येऊन पडतो. आह-आह करून लंगडत-लंगडत लिविंग रूम मध्ये पोहोचतो.
सगळे जमल्यावर तो म्हणतो “आपण ह्या ख्रिसमसला साऊथ किंवा नॉर्थ पोलला जायचं का?”. सगळे तोंडं वेडीवाकडी करत ती आयडिया न आवडल्याचं दर्शवतात. केविन आश्चर्यचकितच होतो. त्याला वाटतं की “काय?! माझी अमेझिंग आयडिया का बरं नसेल आवडली यांना?” शांतता... कोणीच काही बोलत नसतं. “काहीतरी बोला!” असं केवीनने म्हटल्यावर, पडत्या फळाची आज्ञा मानून त्याचे काका म्हणतात की, “साऊथ आणि नॉर्थ पोल ही काही पर्यटन स्थळं नाहीत. ह्या जागा निसर्गाच्या आहेत माणसाच्या नाहीत, म्हणून तिथे औद्योगिकीकरण झालं नसल्याने आपल्याला बर्फ सोडून काहीच दिसणार नाही.” केविन सोडून सगळे माना डोलवतात. हे बघून तो म्हणतो, “आपण फिरायला तसंही सगळीकडे जाऊन आलो आहोत. काही सुचलं नाही तर आपण कुठेही जाणं अवघड आहे. मग अंटार्क्टिका विमानातून बघायला काय हरकत आहे?” केविनचे कुटुंबीय चिंतित नजरेनी एकमेकांकडे पहायला लागतात. आई आणि बाबा “ठीक आहे.” असं म्हणून केविनला पाठिंबा देतात. हे ऐकून केविन फार खुश होतो.
त्याचे आई-बाबा लॅपटॉपवरून अमेरिका-ऑस्ट्रेलिया-अंटार्क्टिका-अमेरिका अश्या राउंड ट्रिप फ्लाईटची तिकिटं बुक करत असतात तेवढ्यात केविन सगळ्याची चौकशी करायला लागतो. “हे विमान बुक करा, ते सीट बुक करा” अश्या सूचना आई-बाबांना द्यायला लागतो. ते पाहून त्याचे बाबा वैतागून विचारतात, “तुला जायचंय ना ट्रिपला?” केविनला तो सूर लक्षात येतो आणि तो तिथून काढता पाय घेतो.
केविनला नंतरचे सगळे दिवस नीट झोपच लागत नसते. ‘मी कधी एकदा त्या विमानात पोहोचेन आणि सगळ्यांच्या आधी ती विंडो सीट मिळवून माझ्या भावंडांना चिडवेन’ ह्याचीच केविन फार उत्सुकतेने वाट पाहत असतो. आणि अंटार्क्टिका कसं असेल ह्याच विचारांमध्ये तो गुंतलेला असतो.
जाण्याचा दिवस येतो. सकाळचे ७:०० वाजलेले असतात. सगळे ढाराढूर झोपलेले असतात... अचानक गाड्यांचे हॉर्न कुईई करून वाजतात. केविनचे आई व बाबा दचकून उठतात. फ्लाईट ९ वाजता असते. ते दोघे एकमेकांकडे १-२ सेकंद पाहतात आणि जोरात किंचाळतात! एका हाकेतच सगळे उठतात. शेवटी ७:४५ च्या आसपास सगळे कसेबसे तयार होऊन टॅक्सीपर्यंत पोहोचतात. केविनची आई प्रसाद वाटल्यासारखं प्रत्येकाच्या हातावर बोर्डिंग पास ठेवते. टॅक्सीवाल्याला हागमूत लावत सगळे एअरपोर्टवर पोहोचतात, ९ ची फ्लाईट पकडतात आणि त्यांचा प्रवास सुरु होतो.
सगळेजण आहेत ना, ह्याची खात्री आई विमानात करत असते. पण तिला केविन दिसत नाही, म्हणून ती सगळीकडे शोधायला लागते. आणि तेवढ्यात केविन वॉशरूममधून रमत-गमत येतो आणि आईला विचारतो, “काय झालं आई?” आई दचकतेच! पण लगेच मागे फिरून पाहते, तिला केविन दिसतो म्हणून तिला जरा हायसं वाटतं. “असं न सांगता कुठेही जाऊ नये!” असं प्रेमानं रागवत आई त्याला सगळ्या गालातल्या गालात हसणाऱ्या पॅसेंजर्सच्यामधून त्याच्या सीटवर आणून बसवते. विंडो सीट न मिळाल्यानं तो जरा दुःखी असतोच. शिवाय “असं करू नये, कुठेही जाताना मला किंवा बाबांना सांगून किंवा बरोबर घेऊन जा!” वगैरे वगैरे… न संपणा-या आईच्या सूचना ऐकतच केविन कंटाळून झोपून जातो. आई त्याच्यावर पांघरूण घालते आणि आपल्या सीटवर जाऊन बसते. विमानातला अमेरिका ते ऑस्ट्रेलिया हा प्रवास केविन झोपेतच करतो.
जेव्हा त्याला जाग येते तेव्हा तो बघतो की विमानात फक्त त्याची आई आणि तो दोघेच आहेत. विमान ऑस्ट्रेलियाला पोहोचलेलं असतं. “किती वेळ आणि किती गाढ झोपावं एखाद्या माणसानी? मी कित्ती वेळ तुला उठवायचा प्रयत्न केला!” असं म्हणत-म्हणत आई केविनला विमानाबाहेर आणते. केविनच्या झोपेने उशीर झाल्यामुळे बाकी कुटुंबीय थोडेसे वैतागलेलेच असतात. एअरपोर्टवर ऑस्ट्रेलिया-अंटार्क्टिका-अमेरिका ही फ्लाईट शोधण्याचं मिशन सगळे हाती घेतात. अगदी शेवटच्या मिनिटाला ते फ्लाईटपर्यंत पोहोचतात आणि ते प्लेनमध्ये बसतात.
यावेळेला मात्र केविन परत झोप लागू नये, म्हणून डोळ्यात तेल घालून अंटार्क्टिका येण्याची वाट पाहू लागतो. आणि तो क्षण येतोच. विमानाबाहेरचं ते अंटार्क्टिकाचं सुंदर रूप बघून तो स्तब्ध होतो. सर्वत्र पांढरा शुभ्र बर्फ पाहून केविन फार खूष होतो. ‘खाली सगळं कसं असेल बरं?’ असे विचार त्याच्या मनात येऊ लागतात. त्या मस्त विचारांच्या नादात असतानाच त्याला पोटात काहीतरी गडबड असल्याची जाणीव होते आणि तो वॅाशरूमच्या दिशेने धाव घेतो. आणि ह्या वेळी मात्र तो आईला सांगून वॅाशरूमला जातो. येता-येता त्याला पॅराशूट आणि एक इमर्जन्सी एग्झिट दिसतात. त्याला जणू बाकी सगळ्याचाच विसर पडतो आणि तो सरळ पॅराशूट घालतो, एग्झिटचं दार उघडून खाली उडीच मारतो!
त्याचे सगळे कुटुंबीय खूप जोर-जोरात ‘केविन! केविन!’ असं ओरडायला लागतात. आई तातडीने पायलटला सांगते पण पायलट म्हणतो “मी आता प्लेन खाली नाही उतरवू शकत कारण इथे रनवे नाहीये. पण मी तुम्हाला अर्जेंटिनामध्ये उतरवतो. मग तुम्ही एक जहाज पकडा आणि अंटार्क्टिकाला जा.” आई त्याचे आभार मानते.
खाली आल्यावर अंटार्क्टिका किती छान, सुदंर आणि स्वच्छ आहे ह्या विचारांमध्ये मग्न असतानाच केविनला माणसांच्या बोलण्याचा आवाज ऐकू येतो. “अरे यार, आपल्याला कुठेच पोलर बेअर दिसत नाहीये राव!” केविन तो आवाज लगेच ओळखतो. त्याला कळतं की हे ते आधीचेच चोर हॅरी आणि मार्फ आहेत. त्याला त्यांचा प्लॅन कळतो.
त्यांना पोलर बेअरची कातडीअमेरिकेत जाऊन विकायची असते आणि खूप पैसे कमवायचे असतात. “Oh no! Oh no! Oh no no no no!” असं तो भीतीने पुटपुटू लागतो, पण अंटार्क्टिकामधल्या शांततेमुळे तो आवाज त्या चोरांपर्यंत जातो. ते म्हणतात “अरे आता अंटार्क्टिकामध्ये कोण आलं?” म्हणून ते मागे फिरून बघतात. चोरांनी केविनला पाहण्याच्या आतच तो तिथून धूम ठोकतो. मार्फ म्हणतो, “अरे हॅऱ्या, आपल्याला माणसं नकोत, पोलर बेअर हवं आहे. त्यात लक्ष घाल. कसंबसं पोलीसांना गंडवत-गंडवत इथे आलोय आणि एक साधं अस्वल नाही सापडलं आपल्याला!” असं म्हणून ते परत त्यांच्या पोलर बेअरच्या शोधकार्यासाठी निघून जातात.
अर्जेंटिनामध्ये उतरून अंटार्क्टिकाला जाणाऱ्या जहाजाच्या कॅप्टनला केविनचे कुटुंबीय विनंती करतात की “आम्हाला कृपया अंटार्क्टिकामधे आमच्या मुलाला शोधायला मदत करा." कॅप्टन कमला राजी होतात आणि सगळे अंटार्क्टिकाला जायला लागतात.
मागे-पुढे न बघता खूप वेळ पळाल्याने केविन दमतो. १०-१५ मिनिटं आराम करून उठतो तर त्याला एक पोलर बेअर गर्रर्रर्र असा आवाज काढताना दिसतो तो जोरात किंचाळतो. अस्वल केविनच्या मागे लागतं. म्हणून केविनची पळता भुई थोडी होते. त्या चोरांना लांबून ते अस्वल दिसतं म्हणून ते सुद्धा अस्वलाच्या मागे लागतात. थोडा वेळ पाठलाग केल्यावर मार्फ म्हणतो “आता आपण थांबूया. आपण खूप वेळ पळतोय. मला नाही वाटत आपण त्याला पकडू शकू!” तो म्हणतो, “अरे मार्फ्या, कसंबसं एक तरी अस्वल सापडलंय आणि ते तुला असंच सोडून द्यायचंय?” मार्फ निमूटपणे त्याच्या मागून पळत राहतो.
केविनला पळता-पळता एक घर दिसतं. मदत मिळेल अश्या आशेने त्या घरात जाण्याचा विचार केविनच्या मनात येतो. तो त्या घराचं दार आपटून जोरात म्हणतो “मला आत येऊ द्या. माझ्या मागे एक अस्वल लागलं आहे!” ३-४ सेकंदात दार उघडतं आणि त्याला सॅन्टाक्लॉज दिसतो. आत सांताबाबा असतो. केविन फारच हादरलेला असतो. सांता म्हणतो, “काय रे? काय झालं?” केविन म्हणतो, “मला प्लीज आत घ्या मी लगेच सगळं सांगतो. ” सॅन्टा त्याला आत घेतो आणि विचारतो “काय रे, काय झालं तुला?” केविन सॅन्टाला पूर्ण कहाणी सांगतो. तेवढ्यात त्या चोरांचा आवाज त्या दोघांना येतो आणि केविन घाबरून म्हणतो, “सॅन्टा, कृपया मला माझ्या कुटुंबापर्यंत पोहोचवा.” सॅन्टा “हो! हो! काळजी नको करूस बेटा.” असं म्हणत त्याच्या स्लेमध्ये केविनला बसवतो आणि जाता-जाता त्या चोरांना बेशुद्ध करून त्यांनासुद्धा पकडतो.
रेनडिअरच्या आकाराच्या तबकडीला उडवत-उडवत केवीनचे आई-बाबा असतात त्या जहाजावर आणून सोडतो. केविनला बघून सगळे फार खूष होतात. “कुठे गेला होतास? का गेला होतास? वेडा कुठला!” अश्या स्टेटमेंट्स ऐकत-ऐकत केविन सगळ्यांना सॉरी म्हणतो आणि त्यांना मिठी मारतो. पण त्याला आई दिसत नाही. तो थोडा चिंतित होतो.
तेवढ्यात तो सॅन्टा त्याचं मुंडकं काढत-काढत म्हणतो, “मी एक डिटेक्टिव आहे. मला ह्या चोरांचा प्लॅन आधीपासूनच माहित होता. मी त्यांचा कॉल हॅक करून माहिती मिळवली होती. म्हणून त्यांना घाबरवायला आणि माझी आयडेंटिटी लपवायला मी सॅन्टाचे कपडे घातले होते. तुमच्या मुलाला पाहिलं आणि त्याच्यामागे पोलर बेअर आणि चोर लागले आहेत हे त्याने सांगितलं. केविनला घेऊन नक्की कुठे जायचं ते मला कळेना. मी माझ्या रेडार स्कॅनर वर पाहिलं की एक जहाज अंटार्क्टिकाकडे येतंय म्हणून मी ह्या तिघांना घेऊन ह्या जहाजावर आलो.” सगळे त्या डिटेक्टिव्हचे आभार मानतात. त्या चोरांना सगळे पोलिसांच्या हवाली करतात. पोलिसांनी धरल्यावर हॅरी शॉक बसल्यासारखा अंग वेडंवाकडं करायला लागतो. पोलीस त्या दोन्ही चोरांना जाब विचारतात आणि लाथा मारत-मारत त्या दोघांना कारावासात घेऊन जातात.
इतकं सगळं होऊनही केविन मात्र चिंतेतच असतो आणि इकडे-तिकडे पाहत असतो. तेवढ्यात त्याला त्याची आई कॅप्टन रूममध्ये बसलेली दिसते. तो जोरात पळत-पळत आईकडे जातो. तिला मनापासून सॉरी म्हणतो. आईच्या डोळ्यांमधून पाणी येतं. ते एकमेकांना घट्ट मिठी मारतात. काही वेळानंतर केविनला जाणवतं कि गेले कित्येक तास त्याने वॅाशरूमचं तोंडही पाहिलेलं नाहीये आणि त्याची शोधाशोध सुरु होते. त्याची आई त्याच्याकडे हताशपणे पाहतच राहते.
अशाप्रकारे केविन मेकॅलिस्टरचा आणखी एक ख्रिसमस एकदम चित्तथरारक आणि मजेत जातो.