गंपूचं गुपित (कथा)
गंपूचं गुपित
लेखन: मृण्मयी काळकर
चित्रे: ज्योती महाले
गंपू माकड होतं तसं लहान, पण त्याचा रोजचा नियम अगदी आखीव-रेखीव होता. सकाळी लवकर उठून १२ सूर्यनमस्कार घालणे, अंघोळ करून, गणवेश घालून शाळेत जाणे, घरी आल्यावर भरपूर खेळणे, मित्र-मैत्रिणींना जमा करून धुडगूस घालणे, रात्री जेवून झोपणे. त्याचं एकच खास वैशिष्ट्य होतं, गंपू फक्त आणि फक्त केळंच खात असे. ज्या दिवशी केळं नसेल, त्या दिवशी त्याचा उपास! तो दुसरं काहीच खात नसे. केळ्याची शिकरण, केळ्याची कोशिंबीर, केळ्याचा केक, केळ्याचा शिरा, केळ्याचा घावना, केळ्याचे वेफर्स...
एकदा काय झालं, गंपूच्या बाबांची खूप लांबच्या गावात बदली झाली. सगळं आवरून, झुकझुकगाडीने आई-बाबा आणि गंपू दूर गावात राहायला जातात. नवीन घर मोठं तर असतंच, पण बाहेर अंगणही खूप छान असतं. लवकरच घर नीट लागतं. दुसर्या दिवसापासून गंपू नवीन शाळेत जाणार, म्हणून आई बाजारात जाते सामान, फळं, भाज्या आणायला.
फळवाल्याला जेव्हा ती विचारते, “दादा, केळी कशी दिलीत?” तेव्हा फळवाला म्हणतो, “केळं? ते काय असतं? इथे नाही मिळत.” आई जरा आश्चर्यानेच पुढे दुसर्या दुकानात जाते. तिथेही तो दुकानदार हेच म्हणतो, “केळं? ते काय असतं?” मग तिसर्या, चौथ्या जवळजवळ सगळ्या दुकानांत आई जाते, पण तिला कुठेच केळी मिळत नाहीत.
घरात आल्या आल्या गंपूचं सुरू होतं, “किती वेळ जातेस गं आई, मला खूप भूक लागलीये. ती केळ्यांची बिस्किटं, चिप्स सगळं संपलंय.” आई म्हणाली, “अरे बघ! मी तुझ्यासाठी बाजारातून किती छान नवीन खाऊ आणलाय. हे फळ बघ खाऊन, कसं गोड, पाणीदार आहे. फक्त इथेच मिळतं हे.” गंपू म्हणाला, “नाही! मला केळंच हवंय.” आईने खूप वेगवेगळ्या पद्धतीने समजावलं, पण गंपू आता जोरात रडायला लागला. त्याने हात-पाय आपटून खूप अकांडतांडव केले. शेवटी थकून तसाच झोपला. दुसर्या दिवशी आईने त्याला वचन दिलं, “थोडेच दिवसात मी तुला केळी देईन”, तेव्हा कुठे गंपू शाळेत जायला तयार झाला. फक्त दूध पिऊन तो शाळेत गेला. आईने मग शेजारी विचारले, दुसर्या बाजारात जाऊन दुकानदारांना विचारलं. इतकंच काय, बाबाने ऑफिसमधल्या लोकांनासुद्धा “केळी कुठे मिळतील?” असे विचारलं, पण कोणालाच केळं म्हणजे काय, हे माहीत नव्हतं. त्यांनी कधी बघितलंच नव्हतं असं फळ, तर खाणं राहिलं दूर! आता मात्र आईला गंपूची खूप काळजी वाटायला लागली.
आता आई त्याला रोज समजावून, कधी रागावून, कधी लाडाने दुसरी फळं खायला लावायला लागली, पण गंपू काही पोटभर जेवायचा नाही. शेवटी आईला एक युक्ती सुचली. गंपू घरी आल्यावर तिने त्याला युक्ती सांगितली. गंपूला थोडासा आनंद झाला, पण तरी केळं नाही मिळत म्हणून तो नाराजच होता.
४-५ दिवसांनंतर बाबा ऑफिसमधून घरी येताना एक रोप घेऊन आला. गंपूने विचारलं, हे काय आहे? तेव्हा आईने त्याला आठवण करून दिली, “अरे! आपण नव्हतं का ठरवलं, बाबाच्या मित्राला आपल्यासाठी हे आणायला सांगायचं?” गंपू मग जरा खुशीत आला.
लगेचच आईने आणि त्याने अंगणात जाऊन एक खोल खड्डा केला आणि ते रोप त्या खड्ड्यात लावलं. माती टाकून खड्डा बुजवला. झालंss आता रोज सकाळी उठल्यावर गंपू त्या रोपला पाणी घालायचा, संध्याकाळी शाळेतून घरी आल्याआल्या रोपट्याकडे जायचं. थोडे दिवसांनी त्या रोपट्याने खड्ड्याच्या बऱ्यापैकी वर डोकं काढलं. गंपू अगदी उड्या मारायला लागला.
पण एक दिवस अचानक....
रविवारचा सुट्टीचा दिवस होता, म्हणून गंपू खूप उशीरा -सकाळी १०.०० वाजता- उठला. त्याच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे उठल्या उठल्या तो रोपाजवळ गेला. बघतो तर काय? काही पानं कुरतडलेली होती. खड्ड्याच्या बाजूने मांडलेले दगड इकडे तिकडे विखुरले होते, अंगणात जनावरांच्या खुणा होत्या. गंपूने बरोबर ओळखलं - ते शेळ्यांचेच पाय होते. गंपूला रडूच यायला लागलं.
दुपारी आई-बाबा-गंपूनी बांबूच्या काठ्या गोळा केल्या, त्या एकत्र कापल्या, सुतळीने एकमेकांना बांधून रोपाभोवती छान कुंपण तयार केलं. आता शेळ्या-गायींची काहीच भीती नव्हती. असे सहा महीने गेले. गंपू आता वेगवेगळी फळं खाऊन बघायला लागला होता, पण केळ्याची चव काही तो विसरला नव्हता. गंपू, बाबा, आई सगळेच त्या रोपाची काळजी घेत होते, अधून मधून त्याला खत घालत होते. आता त्या रोपाचं एक बुटकं झाड झालं होतं.
आज गंपू शाळेतून घरी आला. परीक्षा चालू असल्यामुळे आल्याआल्या त्याला आईला प्रश्नपत्रिका दाखवावी लागे, पेपरमध्ये काय सोडवता आलं, काय नाही हे सगळं सांगावं लागे. आज म्हणूनच तो आल्याआल्या अंगणातल्या झाडाजवळ नं जाता थेट घरातच आला होता. आईने त्याला चक्क काहीच नं विचारता खिडकीजवळ बोलावलं. खिडकीतून त्याचं लाडकं झाड दिसत होतं. इतकंच नाही, तर त्याच्या बुंध्याच्या वरच्या टोकाला खूप छोटी छोटी फळं लागलेली. गंपू अगदी आश्चर्याने बघतच राहिला.
आईने सांगितलं, “बरोब्बर पुढच्या महिन्याच्या चौथ्या रविवारी तू तुझ्या वर्गातल्या मित्र-मैत्रिणींना घरी बोलवायचं.” गंपू म्हणाला, “का? माझ्या वाढदिवसाला तर अजून पुष्कळ वेळ आहे.” आई म्हणाली, “कळेल तुला नंतर.”
१-१/२ महिन्याने ती हिरवी फळं पिवळी व्हायला लागलेली. चौथ्या रविवारच्या आधी ४-५ दिवस बाबाने तो फळांचा घड उतरवला. घरात उबदार जागी खाली मऊ, सुती कापड अंथरून त्यावर तो घड ठेवून तो अशाच कापडाने झाकला.
रविवार उजाडला. गंपूला माहीत नव्हतं, नक्की काय कार्यक्रम आहे. सगळी मुलं आली. मुलांचं खेळून, अंगणात दंगामस्ती करून झाल्यावर आईने सगळ्यांना घरात बोलावलं. हातपाय धुवायला सांगितलं. मग ताटल्यांमध्ये सजवून सोनेरी रंगांची फळं प्रत्येकासाठी आणली. गंपू ते बघून आनंदाने अगदी वेडा झाला. बाकीची सगळी माकडं त्याला विचारायला लागली, “हे काय आहे? कोणतं फळ आहे हे?” तेव्हा गंपूने त्यांना सांगितलं, “अरे, केळं आहे. माझं लाडकं फळ. तुम्ही एकदा खाऊन बघाच.” सगळ्यांनी ते खाल्लं. “वा वा! मस्त! एकदमच मधुर आणि छान आहे रे हे! आम्हाला खूप आवडलं.” सगळे खुशीत म्हणाले.
आईने प्रत्येक मुलाला एक एक रोप दिलं – कारण घरी सगळ्यांनी आपल्या आईला हट्टच केला – गंपूसारखं रोप आपणही लावायचं. गावात सगळीकडे केळ्याची झाडं, फळं दिसायला लागली.