क्लिकबेट (कविता)
क्लिकबेट
---------------
मन पाखरू पाखरू
भिरभिरे स्क्रीनवर
हातभर फोनवर
किती माहितीची दारं!
एका क्लिकचा उंबरा
मी जाता ओलांडून
तंत्रज्ञानाच्या अफाट
विश्वरूपाचे दर्शन
इथे सापडती मित्र
घरी पोचतो बाजार
शिक्षण नोकरीचे ज्ञान
तेही मिळते चिकार
मात्र ह्याच जंजाळात
तुम्ही उघडता खाते
व्यक्तिगत माहीतिही
साऱ्या जगभर होते!
क्लिकमधूनिया सारा
डेटा करतात गोळा
स्वार्थासाठीही उघडे
इंटरनेटचा तिसरा डोळा!
जर प्रभाव तयाचा
झाला तुम्हावर थेट
आंतरजालावर तुम्ही
ठराल क्लिकबेट**
जाहिरात कि माहिती?
बातमी कि तो प्रचार?
जरा तपासून घेता
फाटे फसवा पदर!
तर्कशुद्ध तपासणीस
ठरती जे खरे दुवे
निःपक्षपाती बातम्या
सत्य तिथेच शोधावे.
कुरूक्षेत्रात जगाच्या
सामान्यांची सजगता
हाच एक दीपस्तंभ
आता सामान्यांकरीता!
------------------
कवयित्री: प्राजक्ता
चित्र: प्रज्ञा ब्राह्मणकर
------------------
**संपादकीय पुरवणी:
नुकतेच इंटरनेट दुनियेत पाऊल ठेवलेल्या दोस्तांनो,
एखादी शिकार करायची असेल, तर सावज ज्यामुळे आकर्षित होतं, ती गोष्ट आमिष म्हणून ठेवली जाते. उदा. जाळ्यात पक्षी हवा असेल तर दाणे, पिंजऱ्यात उंदरासाठी पोळीचा किंवा ब्रेडचा तुकडा, किंवा वाघासाठी शेळी वगैरे. इंटरनेटवरही तुम्ही एखाद्या लिंकवर क्लिक करावं म्हणून अशी आमिषं दाखवली जातात. उदा. एखादी बातमी सांगते "अलाण्या नटीने रात्री कार घेऊन काय केले बघा" (मग तुम्ही काय केले या उत्सुकतेने त्या बातमीवर क्लिक करता) किंवा "हे आहेत पावसाळ्यात खायचे पाच मुख्य पदार्थ" (की लगेच तुम्ही क्लिक करता).
अशा काही लिंक्स निरुपद्रवी असतात. मात्र अशा आमिषांना सतत बळी पडत राहिलात तर तुमच्या खाजगी माहितीची शिकार करणारे कित्येक चोर त्याचा गैरफायदाही उचलू शकतात. उदा. "२ कोटी जिंकण्यासाठी आम्हाला फक्त ही माहिती द्या" वगैरे आमिषांना बळी पडून जगभरात कित्येकांनी आपली खाजगी माहिती चोरांच्या हवाली केली आहे. तेव्हा सावध राहा हे सांगणारी ही कविता कायम लक्षात ठेवा
तेव्हा कायम ध्यानात असू द्या, एखाद्या लिंकवर क्लिक करणं म्हणजे पदार्थ उचलून तोंडात टाकल्यासारखं असतं. त्यामुळे त्यावर क्लिक करण्यापूर्वी त्याची पारख करून घ्यायची सवय लावा. इंटरनेट हा माहितीचा खजिना आहे, त्याचा आनंद घ्या, पण इथे सजग राहून सुरक्षितपणे संचार करा.