बायो बबल - भाग ७ (Mal de segno? - अशुभ खूण? नाही ही तर शुभ खूण!)
बायो बबल - भाग ७ (Mal de segno? - अशुभ खूण? नाही ही तर शुभ खूण!)
लेखन: विद्याधीश केळकर
याआधीचे भाग: भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ | भाग ६
साल होतं १८०५. स्थळ, इटलीमधील एक रेशीम कारखाना.
जॉर्जियो नेहमीप्रमाणे नर्सरीच्या राऊंडवर निघाला. तो नर्सरीत शिरला. आतल्या रॅक्समधला एकेक ट्रे बाहेर काढून, त्याने तपासायला सुरुवात केली. ट्रेमधे पसरलेल्या मलबेरीच्या पानांवर छोट्या-मोठ्या रेशीम-अळ्या आनंदाने ’चरत’ होत्या. इतक्यात जॉर्जियोचं लक्ष ट्रेच्या एका कोपर्यात गेलं. तिथल्या १०-१२ अळ्या निपचित पडून होत्या. एकही अळी ना हलत होती ना पानं खात होती. काही अळ्यांच्या अंगावर पांढरा थर जमला होता. त्या मेल्या असाव्यात म्हणून जॉर्जियोनी अलगद एक अळी हातात उचलली. त्याला एखादा खडू हातात घ्यावा असं वाटलं इतकी ती अळी ’कडक’ झाली होती. त्याच्या हातालाही कसलीतरी पांढरी पूड लागली होती. त्यानी सगळे ट्रे बाहेर काढले. प्रत्येक ट्रेमधे त्याला अशा अळ्या सापडल्या. त्यानी सगळ्या अळ्या ट्रेमधून बाहेर काढल्या. अळ्यांवर कसला तरी रोग पडला होता!
दुसर्या दिवशी जॉर्जियोला अजून काही अशा अळ्या सापडल्या. फक्त अळ्याच नाही काही दिवसांनी काही कोषसुद्धा असेच पांढरे पडलेले, कडक झालेले, सुरकुतलेले आढळले. त्यांना हातात घेतल्यावर हाताला पांढरी पूड लागत होती. बघता बघता हा रोग इटलीतील साऱ्या रेशीम कारखान्यात पसरला. रेशीम-अळ्या, कोष मरू लागल्याने रेशीम उत्पादन घसरलं. पुढे हा रोग फ्रान्समधेही पसरला. सारा रेशीम उद्योगच धोक्यात आला. या रोगाचं नामकरण इटलीतील लोकांनी ’माल दे सेन्यो’ (mal de segno, Italian for 'Bad Sign') असं केलं. पण हीच रेशीम व्यवसायासाठीची ’अशुभ खूण’, जंतू सिद्धांतासाठी मात्र अतिशय शुभ खूण (Buon segno) ठरली. कारण याच रोगाच्या अभ्यासातून इटालियन संशोधक, आगोस्तिनो बास्सी (Agostino Bassi) याने जंतू सिद्धांताचा पाया रचला. खरंतर प्राथमिक 'जंतू सिद्धांत'च त्याने मांडला.
----
आगोस्तिनोचा जन्म १७७३ साली एका धनवंत शेतकरी कुटुंबात झाला. त्याचे वडील वकील होते. पण त्यांना जीवशास्त्राची अतिशय आवड होती. हीच आवड आगोस्तिनोमध्येही उतरली होती. त्याने वडिलांच्या इच्छेखातर कायद्याचं शिक्षण घेतलं. त्याचसोबत रसायन, भौतिकी, जीव आणि वैद्यकशात्राचाही अभ्यास केला. पुढे अतीश्रमाने त्याची दृष्टी अधू झाली. त्यामुळे १८१६ मध्ये त्याने ही सर्व कामे सोडून, आपला पूर्ण वेळ शेतीसंशोधनाला द्यायचं ठरवलं. त्याने त्याच्या आणि इतर आजुबाजुच्या शेतात अनेक प्रयोग केले. ह्या साऱ्या शेतजमिनी ’ला बास्सीयाना’ नावाने ओळखली जात. त्याने यावर अनेक पुस्तके लिहिली, प्रबंध लिहिले आणि ते गाजले देखील. पण, बास्सी खरा नावारुपाला आला तो त्याच्या 'माल दे सेन्यो' (किंवा मस्कार्डिन/कॅल्चिनाच्च्यो) या रेशीम किड्याला होणाऱ्या रोगावरील संशोधनामुळे.
बास्सीने १८०७ साली, रेशीम धंद्याला पोखरणाऱ्या या रोगावर काम करायला सुरुवात केली. त्याचं हे काम पुढे जवळपास ३० वर्षं चालू होतं. अतिशय शास्त्रोक्त आणि पद्धतशीर अभ्यासातून त्याने या रोगाचे कारण, प्रसार आणि निवारण शोधून काढले. त्यासाठी त्याने रेशीम किड्यांचे नियंत्रित प्रजनन सुरु केले. विविध प्रकारच्या पर्यावरणीय चाचण्या घेतल्या. म्हणजेच, त्यांना वेगवेगळ्या वातावरणात वाढवून पाहिलं, मलबेरीच्या वेगवेगळ्या प्रजातीची पाने खावू घातली. सूक्ष्मदर्शकाद्वारे रोगी आणि निरोगी अळ्यांची निरीक्षणे घेतली. इतकंच काय पण संकरामधून नव्या प्रकारची मलबेरीची झाडे तयार करायचाही प्रयत्न त्याने केला. बास्सीला या प्रयोगांमधून काय काय समजलं?
बास्सीनी ताडलं की या रोगाचा ’रोगकारक’ घटक हा मृत किड्यांवर जमणार्या पांढर्या थराशी निगडीत असावा. त्याने तो थर सुईच्या टोकावर घेउन काही निरोगी रेशीम किड्यांत प्रत्येक टप्प्यावर (अळी-कोष-मॉथ) टोचला. त्या किड्यांमधे ह्या घटकाने मूळ धरले, तो वाढला, यात किड्यांचा मृत्यु झाला व ते ’ममीफाय’ झाले. म्हणजेच ते मेले पण त्यांची कुजण्याची, क्षय होण्याची क्रिया मंदावली. काही काळाने या थराने बीजाणू (Spores) तयार केले. म्हणजेच हा जो काही घटक होता तो सजीव होता, प्रजननशील होता. तो त्याच्या वाढीसाठी त्याच्या होस्टचा म्हणजेच या किड्यांचा वापर करत होता. बास्सीने सूक्ष्मदर्शकाखाली या घटकाचा अभ्यास केला असता त्याच्या असं लक्षात आलं की ही एक प्रकारची बुरशी (फंगस) आहे आणि हा रोग या बुरशीच्या कीटकात होणाऱ्या वाढीमुळे आणि प्रजननामुळे होतो. तर या रोगाचा प्रसार या बुरशीचे बीजाणू एका अळीवरून, मॉथवरून दुसऱ्यावर गेल्याने होतो. हा फारच मोठा शोध होता. रोग हे पर्यावरणातील ’काल्पनिक’ दूषित घटकामुळे, मायझ्मामुळे होत नाहीत तर बुरशीसारख्या सूक्ष्मजीवांमुळे, Animalecules मुळे होतात.
बास्सीने आपले हे सारे निष्कर्ष "Del Mal del Segno, Calcinaccio o Moscardino" (On the Disease of the Sign. Calcification or Muscardine) या शीर्षकाखाली १८३५ साली शोधनिबंधात प्रसिद्ध केले. त्यापुढे आणखी २ वर्षं त्याने या रोगाचे निवारण कसे करायचे या शोधात घालवली. त्याने सांगितलेल्या या निर्जंतुकीकरणाच्या पद्धती इटलीतील आणि पुढे युरोपातील सर्व रेशीम कारखान्यात वापरल्या जाउ लागल्या. कारखान्यात बुरशीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बास्सीने सांगितलेले प्रतिबंधक उपाय पॅम्फ्लेट रुपात सर्व कारखान्यात वाटले गेले. बास्सीने गाळात गेलेल्या रेशीम व्यवसायाला तर नवसंजीवनी दिलीच पण त्याचसोबत रोगप्रतिकारशास्त्र आणि जीवाणूशास्त्राला एकत्र आणत रोगाचा ’जंतू सिद्धांत, मांडला.
बास्सीने आपल्या प्रबंधात लिहिले, "केवळ कीटकातीलच नव्हे तर झाडे, प्राणी, पक्षी तसेच मनुष्यातील रोग हे सुद्धा अशाच प्रकारच्या सजीव सूक्ष्मजीवांमुळे, Animalecules मुळे होतात. हे सूक्ष्मजीव इतर सजीवांच्या शरीरात शिरून वाढतात. त्यांच्या वाढीमुळे आणि प्रजननामुळे रोग होतात." ही थिअरी अर्थातच मायझ्मा थिअरीच्या पुरस्कर्त्यांनी अमान्य केली. त्याविरोधात प्रबंध लिहिले. पण या थिअरीने अनेक नव्या संशोधकांना प्रेरीत केले. असाच एक संशोधक होता लुई पाश्चर!
(क्रमश:)
चित्र: आंतरजालावरून साभार
अटक मटकच्या मॉनिटरकडून:
ही एक नवीन लेखमालिका आहे. एकुणच लसीचा शोध आणि त्याचा इतिहास समजून घेणं अत्यंत रंजक आहेच तितकंच माणसाच्या चिकाटीबद्दल कौतुक वाटायला लावणारंही आहे. दर बुधवारी या मालिकेतील पुढील भाग प्रकाशित होणार आहे. तुम्हाला जर याबद्दल काही प्रश्न असतील तर monitor.atakmatak@gmail.com या इमेल पत्त्यावर किंवा फेसबुक कमेंटमध्ये जरूर विचारा. आम्ही ते लेखकापर्यंत पोचवू. त्याचं उत्तर पुढील भागांत असेल किंवा आम्ही ते पुढील भागात देण्याची विनंती करू