शुभ्रमेघ आणि कृष्णमेघ (कथा)

शुभ्रमेघ आणि कृष्णमेघ

लेखन: ज्योती गंधे
चित्रे: गीतांजली भवाळकर

-----------------------------

आकाश अगदी निरभ्र होतं. निळशार, नितळ असं आकाश ‘शुभ्रमेघ’ला खूप आवडायचं. कारण, त्यात त्याचं शुभ्रपण अगदी स्पष्ट दिसायचं - शोभून दिसायचं. अशा आकाशात खेळता खेळता, स्वच्छंद बागडताना तो स्वतःचे खूप विविध प्रकारचे आकार करी. कधी ससा, कधी सिंह, कधी कुठला पक्षी, कधी एखाद्या झाडाचा आकार करी आणि स्वतःच्या मस्तीत खेळत राही.

त्याही दिवशी असं आकाश पाहून त्याने लगेच बागडायला, धमाल करायला सुरवात केली. किती वेळ गेला कोणास ठाऊक, त्याला वेळेच भानच नव्हतं. त्याची नजर सहज खाली गेली. तो एका मोठ्या उद्यानाच्यावर होता. कितीतरी लहान मुले, त्यांचे आईबाबा वर बघत होते. कुणी फोटो काढत होतं. कुणी आता शुभ्रमेघने कोणता आकार केला आहे त्याबद्दल मोठमोठ्याने बोलत होते. एकंदरीत सर्व मजेत होते. एकमेकांचा अंदाज सारखा आला की टाळ्या देत होते. शुभ्रमेघला मजा वाटली. असं पहिल्यांदाच त्याला जाणवलं होतं. त्याला आणखी जोर चढला. तो आणखी वेगवेगळे आकार करू लागला.

तेवढ्यात तिथे ‘कृष्णमेघ’ आला. तिथे चाललेली गम्मत पाहून त्यालाही मजा वाटली. तो शुभ्रमेघला म्हणाला, “चल,आपण दोघे खेळू या.” शुभ्रमेघला राग आला. मी चांगला मुलांबरोबर खेळत असताना हा का आला? याचा रंग काळा, हा आपल्याबरोबर आला, तर आकार कसे स्पष्ट दिसतील? उलट आपल्यालाच याचा काळा रंग लागेल. आपण शुभ्र, पांढरे, गोरे दिसू का मग? मग मुलांना काय मजा येणार?’ त्याने खाली पाहिलं. मुलं, मोठी माणसं भराभरा निघाली होती. कोणाचंच वरती लक्ष नव्हत. ते पाहून त्याला कृष्णमेघचा आणखीनच राग आला. रागाने तो ओरडला, “तू का आलास इथे? मी चांगला खेळत होतो मुलांबरोबर. तू आलास आणि ती निघून गेली. तू नकोस मला माझ्याबरोबर. किती काळा आहेस तू! तुझा रंग मला लागून मी पण काळा होईन, मग माझ्याशी मुलं खेळणार नाहीत. तू नकोस मला. जा तू,जा,जा !”

कृष्णमेघ हिरमुसला. त्याला खरंच शुभ्रमेघशी खेळायचं होतं. ‘माझा रंग काळा आहे, कबूल. पण मी वाईट आहे का? घाणेरडा,अस्वच्छ आहे का? त्याला मी आणि माझ्याशी खेळायला का नाही आवडत? तो गोरा आहे, पांढरा आहे म्हणून तो शुभ्रमेघ आहे. ठीक आहे, पण खेळण्याचा आणि आपल्या रंगांचा काय संबंध?’ रडत रडत तो तिथून निघाला. तोपर्यंत शुभ्रमेघ खूप लांब गेला होता.
शुभ्रमेघ पुढे पुढे जात होता. हळूहळू तो पुन्हा नेहमीच्या मनःस्थितीत येऊ लागला. कृष्णमेघबरोबर झालेलं भांडण तो विसरला. छान उडत उडत पुढे जाऊ लागला नि पुन्हा खाली बघू लागला. कोणाचं लक्ष असेल, तर तो विविध आकार धारण करून त्यांची करमणूक करू लागला.

जाताजाता, एके ठिकाणी खूप माणसं आकाशाकडेच पाहत आहेत असं त्याने पाहिलं. त्याला वाटलं आता मस्त खेळू या, मजा येईल. पण त्यांचे हातवारे काहीतरी वेगळंच बोलत होते. तो खाली उतरू लागला तसे त्यांचे हातवारे अधिकच वाढले. जणू ते त्याला ‘तू जा, तू जा’ म्हणत होते. तो आणखी खाली आला.

आता त्यांचं बोलणं त्याला स्पष्ट ऐकू येऊ लागलं. ते म्हणत होते, “हा कशाला आलाय इथे? ह्याला पाहून पाहून वैताग आलाय. काही उपयोग नाही याचा. आम्ही इथे पावसाची वाट पाहून थकून गेलो आहोत. पाऊस नाही, पाणी नाही. शेतं आणि आमचे घसे कोरडे पडायला लागलेत. जनावरांना,लेकरांना द्यायला अन्न नाही, पाणी नाही. अन आकाशात नुसतेच पांढरे ढग! देवा, तुला कधी रे दया येणार आमची?”
“सांब सदाशिव, पाऊस दे, शेते,भाते पिकू दे, पैशाला पायली विकू दे.” 
“दया कर परमेश्वरा,दया कर.”
लोकांचे असे उद्गार ऐकून शुभ्रमेघ खूप घाबरला. यांना आपण नको आहोत हे पाहून त्याला खूप वाईट वाटलं. त्याला एकदम कृष्णमेघची आठवण आली. आपण त्याला असंच,”तू नको,तू नको. केलं होतं.तेव्हा त्याला किती वाईट वाटलं असेल. आपण खूप चुकीचं वागलो.आता तो भेटला तर खरंच मी त्याची माफी मागेन आणि असं कोणालाच पुन्हा म्हणणार नाही.”

तेवढ्यात कसलातरी गडगडाट त्याला ऐकू आला, तो घाबरला आणि झाडामागे लपून बसला. तिथून डोकावून पाहिलं, तर त्याला कृष्णमेघ दिसला. विजांच्या रोषणाईत आणि ढगांच्या वाजंत्रीत तो एखाद्या महाराजासारखा ऐटीत येत होता. शुभ्रमेघने खाली बघितलं, तर सगळी माणसंही नाचत होती, गात होती, भिजत होती, खूप आनंदात होती. “आता आमची शेतं पिकतील. सुखाचे दिवस येतील.”, असं काय काय आनंदात बोलत होती. “काळ्या ढगा,कृष्ण मेघा,खूप उपकार केलेस. बाबा! दुष्काळातून वाचवलंस आम्हाला!”
शुभ्रमेघच्या लक्षात आलं, ज्याला काळा रंग म्हणून आपण हिणवलं, त्याच्यात पाणी असतं आणि तो लोकांना खूप हवा असतो. तो हळूच कृष्णमेघजवळ गेला आणि म्हणाला, “मला माफ कर. मी तुझा खूप अपमान केला. तू किती चांगला आहेस हे आता कळतंय मला.”

कृष्णमेघ हसून म्हणाला, “शुभ्रमेघ,तुझ्या लक्षात आलं नं, झालं तर! हे अगदी लक्षात ठेव की, प्रत्येकात काही न काही चांगलं असतं आणि ते आपण पाहायचं असतं. नुसतं बाहेरून, वरवरचं बघून कोणाबद्दल मत बनवायचं नसतं. कोणाशीही तुच्छतेने वागायचं नसतं. ‘तू नको, तू नको’ असं म्हटलं तर वाईट वाटतं न मग! पण तुला सांगू? मीसुद्धा लोकांना नेहमी हवाच असतो असं काही नाही. खूप पाऊस झाला तरी लोक हवालदिल होतात. मी त्यांना ठराविक वेळात आणि ठराविक प्रमाणातच हवा असतो. जास्त पाऊस पाणी झालं की लोक म्हणतात ‘आता बस रे पाऊस. आता उघडीप पडू दे रे. आकाश आता मोकळं होऊ रे!’ अशावेळी तू दिसलास की त्यांना आनंद होतो. म्हणजे लोकांना आपण सगळेच हवे असतो. कोणीच मोठं नाही आणि कोणीच छोटं नाही. आपल्याला पृथ्वीचं टोकाच्या तापमान बदलापासून संरक्षण करायचंय, सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांमधील तीव्रता शोषून घ्यायचीय, सगळीकडे संतुलित ऊर्जा पोचवायचीय. आपल्याला किती महत्त्वाची कामं आहेत. भांडून कसं चालेल? तेव्हा आपण दोघं छान मित्र होऊया. मी पाणी देईन, तू अधूनमधून तुझी खास अशी लोकांची छान करमणूक कर - आपल्यालाही इतर कामांमधून विरंगुळा!”

दोघं तिथून निघाले, मस्त हातात हात घालून. पांढरा कुठला, काळा कुठला ते कोणाला ओळखता येणार नाही इतके दोघेजण एकत्र आले. आता एकत्रच असतात आणि पावसाळ्यात तर दोघं मस्त लपाछपीचा खेळ खेळतात.