चोर आले चोर (कथा)

 

चोर आले चोर!

लेखन: विशाल गुरव | चित्रे : विशाल माने


ही गोष्ट आहे साधारण १९८०च्या दशकातली. मी आन् माझा मित्र सम्या ४/५ वर्षांचे होतो, तेव्हाची. आमच्या गावचं नाव ‘ओझरे’. गाव अगदी मुख्य रस्त्याला लागून, एका भल्या मोठ्या डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं. एका बाजूला ओढा होता, तर दुसऱ्या बाजूला वेण्णा नावाची नदी. पाऊस धोधो पडायचा, त्यामुळे ‘भात’ हे शेतीतले प्रमुख पीक होतं आणि जोडीला घरोघरी पशुधन. गावात बरेचसे लोक शेतकरी होते, नाहीतर घरटी कर्ता माणूस कामासाठी मुंबईला होता. गावाच्या मधोमध एक महादेवाचे सुंदर मंदिर होतं. महाशिवरात्रीला तिथे जत्रा भरायची. आसपासच्या गावातील लोकं जमायची, मुंबईवाले पोराबाळांना कपडालत्ता घेऊन यायचे. अशी मस्त २ दिवस जत्रा चालायची. पुरणपोळ्या, भात, कटाची आमटी असा जोरदार बेत सगळ्या गावासाठी रांधला जायचा. रस्त्याच्या बाजूला पंगत घालूनच सगळे जेवायचे. दिवाळीपेक्षाही ही जत्रा सगळ्यांसाठी लय महत्वाची असायची. मी, पंढरी आन् सम्या दिवसभर गावभर भटकून मस्त मज्जा करायचो, खेळणी, खाऊ, पेप्सीकोला, काय वाटेल ते जत्रेत मिळायचं. सम्याचा मामा आम्हाला घरी बोलावून पैसे द्यायचा आन् म्हणायचा, “पोरानु! जत्रा हाय गावाची. मस मज्या करा, पोटाला खा आणि कुस्त्या खेळा.” जत्रा झाली, की मुंबईवाले कामावर हजर व्हायचे, तर सगळे पाहुणे-रावळे आपापल्या गावी परत जायचे. राहिलेले लोक परत शेतातल्या कामाला लागायचे.


दुसऱ्या दिवशी, आम्ही आपलं ‘पिवश्या’ घेवून शाळा गाठली. शाळा भरायला थोडा टाईम होता, तेवढ्यात आमचा एक मित्र बाब्या धापा टाकत पळत आला आन सांगू लागला, “आरं! तुमासनी म्हाईतीए काय?” आम्ही म्हणालो, “नाही बा, का रं, काय झालं? भूत बघितलंस का काय!” बाब्या आवंढा गिळून म्हणाला, “आरं! गावात चोऱ्या झाल्यात काल रातच्याला. नदीकडलं कुंभाराचं घर फोडलंय म्हनं! अन् इठ्याला लय मारलाय.”
आमच्या आत्त्याचं घरही जरा आडबाजूला होतं आणि भाऊ (आत्याचा नवरा) होते मुंबईला. त्यामुळं आत्या जाम घाबरून गेली. जशी चोराची खबर गावात पसरली, तशी सगळीच लोकं काही ना काही गोष्टी रंगवू लागली. पोलीस पाटील तात्या, तंबाखू खाऊन पत्ते खेळत पारावर बसला होता. म्हणतो कसा, “मला तर वाटतंय चोरबीर काही नाहीत. ह्यो कुंभाराचा इठ्या हाये ना, त्यो काय तरी लबाडी करतोय. आपल्या गावात चोर येणारच नाय. घाबरून हायती आजूबाजूची गावंपण आपल्याला!” जनाआजी ओट्यावर बसून वाकळ शिवणाऱ्या बायानला म्हणती, “मला तर वाटतंय भुताचं कायतरी असंल बया.” आम्ही पोरं आपलं सगळं ऐकत होतो. सम्या म्हणाला, “काय रं इशल्या, तुला काय वाटतंय, चोर का भूत?” मी म्हणालो, “मला तर वाटतंय चोरच असंल...”


त्या दिवशी सरपंचानं तातडीची सभा बोलावली. पोलीस-पाटील तात्या, ग्रामसेवक संभाजी आन् गावातली सगळी मंडळी ग्रामपंचायतीसमोर जमा झाली. कोणी म्हणे, “गावातलंच कोणतरी चोऱ्या करतंय.” तर कोणी म्हणे, “ न्हाय न्हाय! हे पारदी हायेत अन् राती डोंगरावरनं खाली येत्यात.” काही लोकांनी याच गोष्टीला दुजोरा देत सांगितले, “हो हो! आमी रात्रीच्या लायटी बघितल्यात खाली उतरताना.” मी पप्पांचा हात ओडला नि हळूच विचारलं, “पप्पा, पारधी कोण आहेत हो आन् ते चोऱ्या का करत्यात?.” पप्पा म्हणाले, “आरे ती पण आपल्यासारखी माणसच असत्यात, पूर्वी सावकार लोक त्यांना वापरून वाईट काम करायला लावायचे. पण आता ती लोकं तशी नाहीत राहिली. त्यांचीपण पोरं आहेत तुझ्यासारखी शाळेत जाणारी.” तेवढ्यात एक जण म्हणाला, “लय बेकार लोकं हायती बरका, सा सा फुटी अन् काळी झ्यार. अंधारात दिसत पण नाहित आन् वाऱ्यासारखी पळत्यात.” ज्या लोकांनी असं काहीच बघितलं नव्हते, ते मात्र चांगलेच घाबरले. सरतेशेवटी सर्वांनी मिळून काही गोष्टी ठरवल्या. गावातली सगळी तरुण पोरं आन् बापे जेवणं झाली, की टोळी करून रात्रभर ढोल, काठ्या आणि शिट्या घेवून सगळ्या गावात गस्त घालतील. घरात कोणी एकटंदुकटं झोपणार नाही. दोन चार घरं मिळून अंगणात एकत्र झोपतील. आम्ही बारकी पोर लय घाबरलो होतो. पंढरी म्हणाला, “लेकहो, तुमच बरं हाय, तुम्हाला शाळा अन् घर ह्याच्याशिवाय दुसरं काय काम नाय. पर मला जायचं की डोंगरावर गुरं चरायला घिऊन. येता उद्या माज्याबर?” माझी आधीच घाबरगुंडी पाताळधुंडी झाली होती, मी आपला मान घाली घालून बसलो. सम्या म्हणाला, “आर तू तरी कशाला जातो आता गुरं घेवून? पकडला चोरांनी तर जातील घिऊन तुला.” आता मला हसावं का रडावं तेच कळंना.


आमचं घर रस्त्याला लागून होतं, शेजारी परशुराम आबा, त्याच्या पलिकडे दुकानदार नि मग दोन चार लोकं राहायची. माझी आई गावातल्याच शाळेत शिक्षिका होती, तर पप्पा दुसऱ्या गावाला येऊन जाऊन करायचे. पप्पा घरी येईस्तोर आमचा काय जीवात जीव नसायचा. तरी आई पप्पांना म्हणालीच, “जरा अंधार पडायच्या आत येत चला हो घरी” तर पप्पा म्हणे, “आपल्याक-डं कशाला येत्यात चोर, काय आहे त्यांना चोरायला?” मात्र या सगळ्या प्रकरणात एक मस्त गोष्ट झाली होती, ती म्हणजे आम्हा सगळ्या दोस्तांना एकत्र झोपायला मिळणार होते. सगळे एकत्र जेवायचो. सम्याच्या आईनं मस्त बोंबील कोरड्यास (सुकी भाजी) केलं होतं, तर नानीनं दोडक्याचं कालवण (पातळ भाजी). आमच्या आईनी मस्त घुट भात केला होता. सगळे अगदी वरपून खात होते. सम्याचा आजा हासून म्हणतोय “सम्या बाळा, जरा हात आकडता घे. नाय तर रातचा उठशील झाड्याला ” . जेवणं उरकली की बायका भांडी घासायला लागायच्या आणि आम्ही अंगणात एकत्र वाकळा अंथरायला लागायचो. वाकळावर पाठ टेकली की एखादा दगड रुतायचा, पण मग थोडं इकडे तिकडे करून तशीच सोय करायची. वर काळभोर आकाश, चांदण्या दिसायच्या आन् तारे ओळखायचा खेळ चालू व्हायचा. मोठी माणसं कधी येऊन झोपायची कळायचंही नाही. मात्र त्यांचा आवाज यायचा बंद झाला, की घाबरून पटकन झोपून जायचो. भीती वाटायची की, जर सगळे झोपले आन् मलाच चोर दिसला तर!!


खूप दिवस हे रोजचंच चाललं होतं, पण चोर काय दिसत नव्हता, अन् पकडलाही जात नव्हता. गस्तवाले एका बाजूला गेले, की चोर दुसऱ्या बाजूने घुसायचे नि कालवा (दंगा) झाला की पळून जायचे. पण गाव मात्र आता एकत्र आला होता.
एक दिवस काय झालं, आम्ही सगळे गाढ झोपलो होतो. माझ्या आईला कसल्यातरी आवाजानं जाग आली. “खीस....” कान देवून ऐकल्यावर लक्षात आलं, की आवाज तर आमच्याच घरातनं येतोय; पण सगळे तर बाहेर झोपले होते आन् घराला कुलूप. आई जाम घाबरली, पप्पांना उठवलं, म्हणाली, “आहो, मला वाटतंय आपल्या घरात चोर घुसलेत.” आवाज नक्कीच घरातनं येत होता. पप्पांनी जरा कानोसा घेतला निम्हणाले, “शांत बसा आन् हळूहळू बाजूच्या सगळ्या बाप्या माणसांना सावध करा.” आम्ही घाबरत घाबरत आजूबाजूच्यांना जागं केलं. प्रत्येकानं जमंल तसं हातात काहीतरी पकडलं. काठ्या, कुराडी, ब्याटरी घेउन दबा धरून बसले. आमचं घर होतं कौलांचं, त्यामुळे सगळ्यांचा असा अंदाज झाला की चोर कौलं काढून आत उतरल्यात. सगळ्यांनी ठरवलं, घराला येडा (वेढा) घालू आन् मग दार उघडू. पण आतापर्यंत कुणालाच ठाव (पत्ता) लागेना की चोर आत असले तरी ह्यो आवाज कसला. तेवड्यात परशुराम आबाची मामी म्हणाली, “मला वाटतया चोर स्टोव पेटवून जेवण बनव्त्यात का काय!” इतका वेळ घाबरलेली आमची आई, आता मात्र हासू दाबायला बघत होती, तर बाकी लोकं मामीकडं बघून चाट पडले. लय वेळ वाट बघितल्यावर ठरलं, आता थांबायला नको काही तरी केल पाहिजे.


चार पाच लोक मागच्या बाजूला गेले. चार पाच पुढं थांबले, पोर आणि बाई मानसं एका कोपऱ्यात थांबले. आमच्या पप्पानी कुलूप काढून दार उघडलं. काहीच हालचाल नाही. फक्त पांढरा लाईट आन् ‘खीस…’ असा आवाज. आम्ही सगळे जीव मुठीत घेवून थांबलो होतो. कधीही मारामारी सुरु झाली असती. आमचं फक्त एकच काम होत, जोरात बोम मारायची म्हणजे गस्तवाले मदतीला येतील. पप्पा आणि एकदोन जन जरा दबकत दबकत आत गेले आन्...
जोर जोरात हसायला लागले! आम्हाला काय कळायला मागंना. सगळे पळत घरात घुसले नि लायटा लावल्या, ते पण हसायला लागले. परशुराम आबा म्हणाला, “ह्यो बघा तुमचा चोर! कसा निवांत टेबलावर बसलाय, खीस.. आवाज करत”
झालं असं होतं की, धूर बाहेर जाण्यासाठी जे कौल होतं, ते उघडं राहिलं होतं. त्यातनं मांजर घरात घुसलं नि त्याची उडी थेट टीव्हीवर पडली होती. टीव्हीच्या वरती एक बुस्टर होता, त्याचं बटन चालू झालं. त्याच्यामुळे टीव्ही चालू झाला. दूरदर्शन ८ वाजताच बंद झालं होतं, त्यामुळं टीव्हीवर मुंग्या आणि ‘खीस..’ आवाज यायला लागला होता.


प्रतेकाच्या मनातली भीती वेगवेगळ्या नकलीनि बाहेर पडली होती. आमच्या आवाजानं सगळा गाव गोळा झाला. महिन्याभरापासनं चोरांनी घाबरून गप झालेला गाव एकदम हसून हसून गडागडा लोळायला लागला होता.

त्यानंतर हळूहळू गावातल्या चोऱ्याही कमी झाल्या. पूर्वीसारखे व्यवहार सुरू झाले. आता याला खूपच वर्षे झाली, पण माझ्या मनातला प्रश्न काय अजून सुटला नाही. खरा चोर नक्की कसा असेल? सहा फुट, काळा झ्यार, वाऱ्यासारखा पळणारा? का कुणाच्या तरी घरात घुसून स्टोव पेटवून भूक लागली म्हणून हक्कान जेवण करून खाणारा आन् खीस.. आवाज करणारा?

-----------------

१. पार: पार म्हणजे मोठ्या झाडाच्या बाजूला बांधलेला दगडी कट्टा
२.ओटा: घराच्या पुढच्या बाजूला केलेला उंचवटा
३. वाकळ: जुन्या साड्या आणि कपडे या पासून तयार केलेल्या सतरंजी सारखा एका प्रकार
४. झाड्याला जाणे: खेडेगावामध्ये संडासला जाणे याला झाड्याला जाणे असे म्हणतात.
५. बुस्टर: जुन्या टी व्ही साठी एक यांत्रिक गोष्ट.