स्लाव राक्षसकोश ३: चीखा

स्लाव राक्षसकोश:
लेखनः मंदार पुरंदरे

पुरातन काळापासून ते आजपर्यंत भुते, वेताळ, समंध, चेटकीण यांसारखी भीतीदायक पात्रे जगभरातल्या विविध संस्कृतींमध्ये, साहित्यामध्ये आपल्याला सापडतात. लोककथांमध्ये, पुराणकथांमध्ये या भुतांना काही विशिष्ट स्थान आहे. अर्थात ही भुते किंवा हे राक्षस आपल्याला नेहमी भीतीच दाखवतात असंही नाही. कधीकधी कथेमध्ये ही पात्रे महत्वाची, कधी विनोदी तर कधी मनोरंजनात्मक तर कधी रहस्यमयी भूमिका बजावतात. ही पात्रे मानवी भावना आणि अनुभव यांचं प्रतीक बनूनसुद्धा कधी येतात. वेताळ पंचविशी मध्ये विक्रमादित्य राजाच्या पाठीवर बसलेला वेताळ भीतीदायक असतोच, परंतु त्याला अनेक गोष्टी सांगून अखेरीस काही प्रश्न विचारतो. त्यानिमित्ताने खरं तर या कथांचा श्रोता किंवा वाचक एखाद्या प्रश्नावर विचार करू लागतो. हे या भुताचं खास काम. हे झालं भारतीय संस्कृतीमधलं उदाहरण. स्लाव्ह लोकसंस्कृतीमध्ये देखील काही खास भुते आहेत. ‘अटकमटक’ च्या माध्यमातून या भुतांची ओळख करून देण्याचा हा प्रयत्न आहे. स्लाव्ह लोकसंस्कृतीचा भाग असलेल्या या भुतांची वर्णने इंग्रजी आद्याक्षरांच्या -क्रमानुसार देण्याचा माझा प्रयत्न असेल. भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर आजचा पोलंड, चेक, रशिया आणि युक्रेन देशाचा काही भाग या अंतर्गत येतो. त्यामुळे या भुतांची माहिती पोलिश, चेक, रशियन अशा काही भाषांमध्ये उपलब्ध आहे. यात अधूनमधून ग्रीक पुराणकथांचा संदर्भदेखील सापडू शकतो. या भुतांची एक खास वर्गवारीसुद्धा आहे ,परंतु त्याबद्दल कधीतरी बोलूयात. इथली माहिती प्रामुख्याने पोलिश भाषेतील सामग्रीवर आधारित आहे. यात भुताचं मूळ नाव मी देतो आहे आणि त्याला योग्य असं मराठी किंवा भारतीय नाव देण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे आणि हो , ज्या मित्रमैत्रिणींना चित्र काढायला आवडत असेल त्यांनी या भुताचं/राक्षसाचं रेखाटन केलं तर बेष्टच ! अशी रेखाटनं आम्हाला कधीपर्यंत पाठवायची ते वर्णनाखाली दिलं आहे.

या भागातील राक्षसाचं वर्णन पुढिलप्रमाणे:

---------------------------

चीखा:

ही राक्षसी सडलेल्या हवेच्या गंधासारखी आहे. हिची सर्वात आवडती शिकार म्हणजे लहान मुले.

एका छोट्या मुलीच्या रूपामध्ये ही इकडेतिकडे भटकत असते.  हिचे केस कावळ्याप्रमाणे काळे आहेत, हिचं शरीर जर्द पिवळ्या रंगाचं आहे आणि हिचे डोळे फारच सुरेख आहेत. जिथे कुठे ही जाते, तिथली झाडं एकदम मरगळून जातात, पक्षी आणि कीटक गप्प होऊन जातात आणि हवेत खूप वेळ एक सडलेला, प्रेताचा गंध राहतो.  

ही अचानकच हल्ला करते. कधी ही एखाद्या गढीमध्ये किंवा एखाद्या गावात पांढऱ्याशुभ्र पोशाखातही दिसते. डोक्यावर अफूच्या फुलांची माळ घालून (लेऊन), हातात पोलादी दांडा घेऊन, ती अगदी चुपचापपणे खेळणाऱ्या मुलांच्या जवळ जाते. ज्या मुलाला ती हात लावते,  तो मुलगा लगेचच धडामकन जमिनीवर पडतो. यानंतर चीखा जशी कोणताही आवाज न करता प्रकट झाली होती, तशीच ती एकदम गपचूप अदृश्य होऊन जाते. तिला नवनवीन शिकार हवीच असते. 

-------------------------

या शब्दचित्रांवरून अनेक छोट्या वाचकांनी चित्रं काढली आहेत. जगातील एका अपरिचित भागातील कल्पनेच्या शब्दचित्रांना रेखाटणं अजिबात सोपं नाही. 
कल्पनाशक्तीचा कस पहाणाऱ्या या राक्षसकोषात सहभागी झालेल्या मुलांकडून या भागासाठी आलेली चित्रे पुढिल प्रमाणे. (ज्या क्रमाने आम्हाला मिळाली त्या क्रमाने)

या चित्रकार मित्रमैत्रीणींना 'अटक मटक'कडून मोठ्ठी शाब्बासकी! 

1. नाव: चोरनी चेटकीण
चित्रकार: अनुषा वैरागडे, मुंबई, इयत्ता ३री

2. चीखी
चित्रकार: आर्या बारगळ, वय ६ वर्षे, स्वीडन

3. छद्मराक्षस
चित्रकार: अद्वैत बारगळ, वय १० वर्षे, स्वीडन

४. लोचो लोचो चोचो
चित्रकार: रेवती जपे, वय ६ वर्षे, स्वीडन

गेल्या भागात: अल्कोनोस्त  |  आशदाह