स्लाव राक्षसकोश १: अल्कोनोस्त

स्लाव राक्षसकोश:
लेखनः मंदार पुरंदरे

पुरातन काळापासून ते आजपर्यंत भुते, वेताळ, समंध, चेटकीण यांसारखी भीतीदायक पात्रे जगभरातल्या विविध संस्कृतींमध्ये, साहित्यामध्ये आपल्याला सापडतात. लोककथांमध्ये, पुराणकथांमध्ये या भुतांना काही विशिष्ट स्थान आहे. अर्थात ही भुते किंवा हे राक्षस आपल्याला नेहमी भीतीच दाखवतात असंही नाही. कधीकधी कथेमध्ये ही पात्रे महत्वाची, कधी विनोदी तर कधी मनोरंजनात्मक तर कधी रहस्यमयी भूमिका बजावतात. ही पात्रे मानवी भावना आणि अनुभव यांचं प्रतीक बनूनसुद्धा कधी येतात. वेताळ पंचविशी मध्ये विक्रमादित्य राजाच्या पाठीवर बसलेला वेताळ भीतीदायक असतोच, परंतु त्याला अनेक गोष्टी सांगून अखेरीस काही प्रश्न विचारतो. त्यानिमित्ताने खरं तर या कथांचा श्रोता किंवा वाचक एखाद्या प्रश्नावर विचार करू लागतो. हे या भुताचं खास काम. हे झालं भारतीय संस्कृतीमधलं उदाहरण. स्लाव्ह लोकसंस्कृतीमध्ये देखील काही खास भुते आहेत. ‘अटकमटक’ च्या माध्यमातून या भुतांची ओळख करून देण्याचा हा प्रयत्न आहे. स्लाव्ह लोकसंस्कृतीचा भाग असलेल्या या भुतांची वर्णने इंग्रजी आद्याक्षरांच्या -क्रमानुसार देण्याचा माझा प्रयत्न असेल. भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर आजचा पोलंड, चेक, रशिया आणि युक्रेन देशाचा काही भाग या अंतर्गत येतो. त्यामुळे या भुतांची माहिती पोलिश, चेक, रशियन अशा काही भाषांमध्ये उपलब्ध आहे. यात अधूनमधून ग्रीक पुराणकथांचा संदर्भदेखील सापडू शकतो. या भुतांची एक खास वर्गवारीसुद्धा आहे ,परंतु त्याबद्दल कधीतरी बोलूयात. इथली माहिती प्रामुख्याने पोलिश भाषेतील सामग्रीवर आधारित आहे. यात भुताचं मूळ नाव मी देतो आहे आणि त्याला योग्य असं मराठी किंवा भारतीय नाव देण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे आणि हो , ज्या मित्रमैत्रिणींना चित्र काढायला आवडत असेल त्यांनी या भुताचं/राक्षसाचं रेखाटन केलं तर बेष्टच ! अशी रेखाटनं आम्हाला कधीपर्यंत पाठवायची ते वर्णनाखाली दिलं आहे.

-----------------------

अल्कोनोस्त:

 

स्त्रीचं डोकं असलेला ‘अल्कोनोस्त’ हा एक पक्षीरुपातील राक्षस आहे. रशियन पौराणिक कथांमध्ये याचे उल्लेख येतात. या पक्ष्याचा आवाज कर्णमधुर असतो. याचा आवाज ऐकला की लोक त्यांना माहित असलेलं सर्व विसरून जातात आणि दुसरं काही ऐकावंसं त्यांना वाटतच नाही. हा पक्षी पाताळामध्ये राहतो. अल्कोनोस्त समुद्रकिनारी अंडी घालतो आणि आपली अंडी घरंगळवत समुद्रात ढकलून देतो. साधारण सहा ते सात दिवसांनी अंड्यांमधून पिल्ले बाहेर येणार असली की समुद्रात प्रचंड वादळ येतं, समुद्रात प्रवास करणं अशक्य होऊन जातं.

ग्रीक पुराणकथेमधल्या ‘अल्कोन’वर हे पात्र बेतलेलं आहे. या अल्कोनला ग्रीक देवांनी बर्फरूपात गोठवून टाकलं होतं.

अल्कोनोस्त हे जादुई पक्षी आहेत आणि हे भाग्यदायी मानले जातात. याउलट त्यांचे सोबती सीरीन मात्र दुःख आणि दुर्दैव घेऊन येतात.

-------------------------

या शब्दचित्रांवरून अनेक छोट्या वाचकांनी चित्रं काढली आहेत. जगातील एका अपरिचित भागातील कल्पनेच्या शब्दचित्रांना रेखाटणं अजिबात सोपं नाही.
कल्पनाशक्तीचा कस पहाणाऱ्या या राक्षसकोषात सहभागी झालेल्या मुलांकडून पहिल्या भागासाठी आलेली चित्रे पुढिल प्रमाणे. (ज्या क्रमाने आम्हाला मिळाली त्या क्रमाने)

सगळ्या चित्रकार मित्रमैत्रीणींना 'अटक मटक' कडून मोठ्ठी शाब्बासकी! 

1. 

नाव: बालासूर
चित्रकार: आदिश श्रीनिवास कुलकर्णी, बालशिक्षण शाळा, ३री 

 
2. 

नाव: खगासूर
चित्रकार: रेवती वैभव जपे, स्टॉकहोम, स्वीडन, वय ६ वर्षे

 
3.
नाव: Witchy Bird
चित्रकार: आर्या बारगळ, स्वीडन, सीनियर केजी

4.
नाव: पक्षीणीसूर
चित्रकार: अद्वैत बारगळ, स्वीडन


5.

नाव: मधुरभयप्रसारीका
चित्रकार: निलय सहस्रबुद्धे, न्यु इंडीया स्कूल, इयत्ता ७वी

६.
नाव: शिरासूर
चित्रकार: अनन्या क्षेमकल्याणी, अक्षर नंदन, इयत्ता पहिली

७.
नाव: सुरासूर
चित्रकार: रेवा क्षेमकल्याणी, अक्षर नंदन, इयत्ता सहावी

आवडली ना चित्र? या भागासाठी चित्रं पाठवायची शेवटची तारीख संपलेली आहे. मात्र तरी चित्र काढलीत तर या धाग्यासह फेसबूक पोस्टवर जरूर शेअर करा.
पुढिल भाग लवकरच प्रकाशित होतो आहे, त्यात नक्की सहभागी व्हा!