राधा आणि पावसाचे गुपित

राधा आणि पावसाचे गुपित

लेखन आणि चित्रे: अमृता विशाल

 

राजस्थानच्या ‘मारवाड’ भागात, गुरे पाळणारे ‘रबैरी’ लोक राहतात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत रहाणे, गुरे पाळणे आणि पोटापाण्यापुरती शेती करणे हेच त्यांचं काम. गेले खूप खूप आठवडे, त्यांच्या छोट्याश्या गावाला सूर्य अगदी भाजून काढत होता. उन्हाळा इतका कडक होता, इतका कडक होता, की राधा, तिची आई, तिचा भाऊ आणि गावातील इतर सर्वजण भाजून काढणाऱ्या सूर्यापासून दडून आपापल्या घरातच बसले होते. लाकूड-फाटा गोळा करणे, तण काढणे, गायींच्या धारा काढणे अशी रोजची कामे रणरणत्या उन्हात करणे, अगदी अवघडच होऊन बसले होते.

एका रात्री राधाने, आपल्या आईचे तिच्या मैत्रिणींबरोबरचे बोलणे ऐकले. आई सांगत होती, “आपली गावातली पाण्याची विहीर आटत चालली आहे. शेतातील उभी पिके, आता माना टाकायला लागली आहेत. पाणीच नसेल, तर आपण जगणार तरी कसं? ” आईच्या बोलण्यात चिंता डोकावत होती. राधाची खूप इच्छा होती, की या आग ओकणाऱ्या सूर्याने आता शांत व्हावे आणि मस्त पाऊस यावा. पण सूर्य काही आग ओकण्याचे थांबत नव्हता आणि पावसाचा सुद्धा काही पत्ता नव्हता. कुठे दडी मारून बसला होता कुणास ठाऊक!

राधाला एक माहित होतं की तिचे आजोबा खूप हुशार आहेत, त्यांना नक्की माहिती असेल पाऊस कधी येणार ते. एका संध्याकाळी, गुरांना परत घरी घेऊन येताना,. राधा पळतच आजोबांकडे गेली आणि म्हणाली, “आजोबा आजोबा, ह्या उन्हाने अगदी नको नको करून सोडलं आहे. सांगा ना, हा पाऊस कधी येणार? ” आजोबा हळूच आवाजात कुजबुजले, “मी आज तुला एक गुपित सांगणार आहे. ” आजोबांच्या तोंडून गुपित हा शब्द ऐकताच राधा एकदम खूश झाली आणि अगदी लक्षपूर्वक ऐकायला लागली.

आजोबा म्हणाले, “खूप खूप वर्षांपूर्वी मी जेव्हा तुझ्या वयाचा होतो ना, तेव्हा असेच रणरणत्या उन्हाचे दिवस होते आणि आम्हीसुद्धा अशीच पावसाची वाट बघत होतो. मला तेव्हा हा माणूस भेटला. उंचापुरा, खांद्यावर छोटेसे गाठोडे, हातात लांब काठी घेतलेली, त्याची सगळी त्वचा पार उन्हाने रापून गेलेली, पण डोळे एकदम चमकदार. त्याच्याकडे बघून वाटले की, हा लांबची भटकंती करून इकडे आलाय. ”
तो म्हणाला, “मुला, काय रे तू असा उदास का? ”
मी म्हणालो, “मी वाट बघतोय. ”
माणूस म्हणाला, “कुणाची? पावसाचीच ना? मी तुला एक गुपित सांगणार आहे - पावसाचे गुपित! तू उंचच्या उंच पर्वतावर चढ. आकाशाला वाईट वाटेल, ऐकून रडू येईल अशा तुला माहिती असलेल्या सगळ्या गोष्टी सांग. आभाळाला रडू आले की, आलाच की रे पाऊस!! ” राधा म्हणाली, “आजोबा असं केलं की खरंच येईल पाऊस? ” आजोबा काहीच बोलले नाहीत, फक्त राधाकडे बघून हसले.

दुसऱ्या दिवशी पहाटे, जेव्हा घरातले सर्वजण - सगळे गाव आणि अगदी सूर्यसुद्धा - गाढ साखरझोपेत होते; तेव्हा राधा सगळ्यात उंच डोंगर शोधायचाच हे मनात पक्के ठरवून गावातून बाहेर पडली.

राधा चालत राहिली..... चालत राहिली..... अगदी न कंटाळता चालतच राहिली.....

खूप खूप चालल्यावर ती शोधत असलेल्या उंच डोंगराच्या पायथ्याशी पोहोचली. अबब! केवढा डोंगर होता हा! त्याचे टोक अगदी आकाशाला भिडले आहे असेच वाटत होते. मनाचा हिय्या करून, हळूहळू तिने डोंगर चढायला सुरुवात केली. उंचच उंच डोंगर चढत राहिल्यावर, राधा खूप दिवसांनी डोंगरमाथ्यावर जाऊन पोचली. काकणभरसुद्धा वेळ वाया न घालवता, तिने आभाळाला वाईट वाटेल अश्या गोष्टी सांगायला सुरुवात केली.

पहिल्यांदा तिने सांगितले की, तिचा धाकटा भाऊ कसा कोंबड्यांचा पाठलाग करताना पडला आणि त्याच्या पायाला कसे कापले. पण आकाशात काहीच बदल घडेना. नंतर तिने सांगितले की, एकदा स्वयंपाकात आईला मदत करताना तिची बोटे कशी भाजली होती. आता तिला वाटले, आकाशाला नक्की वाईट वाटणार. पण छे! आकाश तसेच निरभ्र. नंतर तिने सांगितले की, कडक ऊन असल्यामुळे आम्हाला दुपारी कसे खेळता येत नाही आणि घरातच बसावे लागते. नंतर आभाळाला सांगितले की, आम्हाला गुरांसाठी चारा शोधण्यासाठी, पाणी शोधण्यासाठी खूप लांब चालावे लागते. तरीपण आभाळ तसेच! राधा एका मागाहून एक; आभाळाला दु:ख होईल अशा तिला माहिती असलेल्या गोष्टी सांगत राहिली. प्रत्येक गोष्ट सांगून झाल्यावर; ती एकटक आभाळाकडे पावसाच्या आशेने निरखून पाही. परंतु पावसाची काहीच चिन्हे आभाळात दिसत नव्हती. आभाळ तसेच निळेशार होते आणि सूर्यही तसाच लाल तापलेला गोळा... वाट बघून बघून छोटी राधा अगदी कंटाळून गेली. आता तर तिला ओक्साबोक्शी रडूच कोसळले.

“मी आता नेमकं करू तरी काय? ”, ती रडत रडतच आकाशाला म्हणाली, “इतका रखरखीत उन्हाळा आहे, की आम्हाला ना सरपण गोळा करता येतं, ना शेतातील तण काढता येतं. गायींच्या धारा काढणं तर अजूनच मुष्कील! विहीर आटून गेली आहे, शेतातील उभी पिकेसुद्धा वाळून चालली आहेत. पिके जगली नाहीत, तर आम्हाला अन्न कुठून मिळणार? अन्न नसेल, तर गावातील सगळी लोकं आजारी पडतील आणि पाणी नसेल, तर आम्ही जगू सुद्धा शकणार नाही. ” त्या उंच डोंगरमाथ्यावर निरव शांतता पसरली. राधाच्या हुंदक्यावाचून कोणताच आवाज डोंगरावर नव्हता.

आणि थोड्याच वेळानंतर...

जोरदार वाऱ्याच्या झोतामुळे उडालेली धूळ, राधाच्या पायाला गुदगुल्या करू लागली. संध्याकाळी आकाशात झेपावणाऱ्या पांढऱ्याशुभ्र बगळ्यांच्या माळेने जसे आकाश झळाळून जाते; अगदी तसेच आकाश पांढऱ्याशुभ्र ढगांनी पूर्ण झाकोळून गेले. जमलेल्या ढगांनी सूर्याची भाजून काढणारी किरणे हळूहळू अडवायला सुरुवात केली. राधाच्या गोष्टीतील दु:खामुळे, स्वत:चा पांढराशुभ्र रंग बदललेल्या ढगांची काळी छटा संपूर्ण आकाशावरसुद्धा पसरली.

अचानक विजेचा आभाळ चमकवून टाकणारा लखलखाट, कडकडाट आणि ‘धडामधूम’ गडगडाटाचा आवाज डोंगरावर दुमदुमत राहिला. काही क्षणांतच राधाच्या पावलांना पावसाच्या थेंबाचा नाजूक स्पर्श झाला.

नंतर.... अजून एक थेंब... अजून एक आणि अजून एक असे अगणित थेंब कोसळतच राहिले, जोवर आकाशाच्या या अश्रूंनी तापलेली जमीन पूर्ण भिजून जात नाही. राधाने आनंदाने आपले दोन्ही हात पसरले, त्या रडणाऱ्या आभाळाचे अश्रू आपल्या कवेत सामावून घेतले. त्या थेंबांचा स्पर्श तिला आईच्या पापीसारखा हळुवार आणि आल्हाददायक वाटला.

घाईघाईने राधा डोंगर उतरायला लागली. धावत-पळत ती जेव्हा आपल्या गावात पोचली, तेव्हा सर्व गावकरी एकत्र जमून, गात-नाचत पावसाचा आनंद लुटत होते. ते पाहून तिला खूप आनंद झाला.

राधा सुखरूप घरी परत आली, हे बघून तिच्या आईचा जीव भांड्यात पडला. आईने तिला प्रेमाने जवळ घेतले. आजोबांच्या चेहऱ्यावरून राधाबद्दलचे कौतुक ओसंडून वाहत होते. राधा आजोबांकडे बघून हसत राहिली, कारण फक्त तिलाच पावसाचे गुपित समजले होते. ते म्हणजे; स्वत:च्या आधी इतरांची काळजी घेणे.