टेकडीच्या निमित्ताने ९: गवत

टेकडीच्या निमित्ताने ९:
गवत
लेखन व चित्रे: ओजस फाटक,(इयत्ता ७वी, अक्षरनंदन)

याधीचे भागः एक । दोन | तीन | चार | पाच | सहा | सात | आठ

 

पावसाळा सुरू.

आभा चित्रकार असल्याने तिला 'अँडी गोल्ड्जवर्दी' नामक एक उभारणी शिल्पकार (इन्स्टॉलेशन आर्टिस्ट) माहीत आहेत. निसर्गातील गोष्टी वापरून ते उभारणी शिल्प तयार करतात. ते व्हिडिओमध्ये पाहून आम्हालाही तसं करून बघावंसं वाटलं. आम्ही गवताची पाती तोडून जमिनीवर ती मांडून त्यातून विशिष्ट आकार बनवायला सुरुवात केली. सर्पाकृती रचना बनवली. मग एकदा चौकोन चौकोन करून ठेवले. मग एकदा स्पायरल आकार बनवला. पाती तोडण्यातच जास्त वेळ जातो.

एकदा मी पाती तोडत तोडत थोडासा आत जाऊन पोहोचलो. आम्हाला हवी असलेली पाती फिकी, पातळ आणि खरखरीत असायची. मोठी तजेलदार पाती भरपूर असायची पण त्यात आम्हाला पाहिजे ती पाती कमी असायची. मी ज्या भागातली तोडत होतो त्या भागातली चांगली तजेलदार पाती संपली. मी उजवीकडचं गवत बाजूला केलं, तर काय! तीन फूट उंचीचा, गडद हिरवा, काटे वाल्या असंख्य चपट्या पायांचा कोळी!!

का कोणास ठाऊक पण आत्ता वेचलेलं माझ्या हातातलं सर्व गवत मी त्या कोळ्यावर फेकलं आणि ५-७ पावलं मागे उडालो. हृदयात धडधड चालू होती. ते म्हणतात ना, खडा टाकून पाहणे, तसा मी खडा टाकून पाहिला. पण काही हालचाल दिसली नाही. मग मी नीट विचार करून पाहिला की इतका मोठा कोळी कसा असेल? मी पुन्हा ५-७ पावले पुढे गेलो आणि हळूच गवत बाजूला केलं. पुन्हा तो कोळी दिसला. मी घाबरलो पण तेवढ्यात कळलं की हे घायपाताचं झाड आहे. मी कपाळाला हात लावून फेकलेलं गवत उचलायला सुरुवात केली.

पुढे आम्ही गवताचे त्रिकोण बनवून ठेवू लागलो. प्रत्येक वेळी गवताच्या नवीन काड्या. गवतचित्र पूर्ण करून घरी गेल्यावर पावसाने ते उद्ध्वस्त व्हायचं. मग पुढच्या दिवशी अर्धवट विस्कटलेलं, अर्धवट चिखलाखाली गाडलेलं, जमिनीवर पसरलेलं ओलं शिल्प अजूनच छान दिसायचं.

ऑक्टोबर-नोव्हेंबर सुरू झाला. गिरीप्रेमी संस्थेबरोबर गिर्यारोहण सुरू करून मला सुमारे सव्वा वर्ष झालं. मी हरिश्चंद्रगडाच्या ट्रेकला गेलो. एक रात्र तिथेच. दुसर्‍यादिवशी ट्रेकहून परत आलो. आधी आम्ही या गवताच्या गोष्टी म्हातोबा मंदिराच्या दक्षिण नैऋत्य वाटेवर करायचो. पण मी हरिश्चंद्रगडावरून परतल्यावर आम्ही दुसऱ्या ठिकाणीपण गवतचित्र सुरू केली. प्लांटेशनच्या रोपांभोवती आम्ही गवताची भरीव वर्तुळं करू लागलो. त्याचा खतासाठीही उपयोग होऊ शकेल! मग कधी कधी आम्ही म्हातोबा दक्षिण नैऋत्य उतारावर पोकळ वर्तुळं करायचो. ती वर्तुळं एका सरळ रेषेत बनवायचो. मग कधीकधी मजा म्हणून त्या वर्तुळाच्यात पाय ठेवत धावत जायचो, एका वर्तुळात एकदा पाय. एकदा आमचं बघून आमच्या ओळखीचा टेकडीवरचा काळा कुत्राही त्या गोलांवरून जाताना दिसला.

पुढे डिसेंबरमध्ये मी प्लस व्हॅलीच्या ट्रेकला गेलो. व्हॅलीत उतरताना जंगलात पडलेल्या वाळलेल्या पानांचा रस्ता पाहून मला एक कल्पना सुचली. ती वेळखाऊ होती. ती अशी की वेगळे आकार करण्यापेक्षा सलग गवताची पाती साधारण एकमेकांना समांतर ठेवायची. एकापुढे एक, एका शेजारी एक अशी ठेवायची आणि रस्ता भरवायचा. वरचा भाग एका दिशेनी ठेवायचा.

पण आता दिवस छोटे झाले होते. त्यामुळे वेळखाऊ कामं करता येणार नव्हती. वेळखाऊ कामं काय, गवताचं काम सुद्धा आम्ही सोडलं. दिवस छोटे असतात हे एक कारण, पण दुसरं कारण म्हणजे हिवाळ्यात गवत वाळतं. हिरवं गवत मिळतच नाही. रस्ता भरवण्यासाठी पुरेसं गवतही उपलब्ध नसायचं. तिसरं कारण टचटची किडे होतं. जानेवारीपर्यंत असतात ते! अंधार लवकर पडणार म्हणजे टचटची किडेही लवकर बाहेर पडणार. दिवस छोटे असताना संध्याकाळी गवताचं काम अवघड आहे, या हिशेबाने आम्ही ठरवलं की एप्रिल नंतर परत काम सुरू करायचं.

पण घोटाळा असा झाला, की एप्रिल महिना सुरू झाला - साधारण त्याच सुमारास लॉक डाऊन सुरू झाला!

(क्रमश:)