हत्ती आणि मासोळी (कथा)

स्वैर अनुवाद: 'माया ज्ञानेश'  (मुळ कथा डच बालकथा आहे.)
चित्रकारांबद्दल कथेनंतर दिलेली विशेष माहिती नक्की वाचा. चित्र पहाण्यासाठी प्ले (आडवा त्रिकोण) बटणावर क्लिक करावे, तसेच फुल स्क्रीनवर पाहिल्यास अधिक बारकावे दिसतील.

=======

हत्ती आणि मासोळी

एक होतं जंगल. त्या जंगलात एक हत्ती रहायचा. दिवसभर त्या जंगलात खेळत रहायचा. भूक लागली की झाडावरची फळं खायचा आणि तळं, तलाव, झरा असे जिथे सापडेल तिथले पाणी प्यायचा. हत्तीची जंगलात सगळ्यांशी मैत्री होती. तो सर्वांना मदत करायचा. त्यामुळे सर्वांचा आवडता होता.

एके दिवशी तो असाच जंगलात फिरत होता. फिरता फिरता तो जंगलाच्या दुसर्‍या टोकाला गेला. त्याला खूप खूप तहान लागली होती, म्हणून तो पाणी शोधू लागला. उन्हाळ्यामुळे बहुतेक सर्व ठिकाणचे पाणी आटले होते. काही ठिकाणी नुसताच चिखल राहिला होता तर काही तळ्यांचे डबक्यात रूपांतर झाले होते.

खूप शोधल्यानंतर हत्तीला अखेर एक जागा सापडली. तिथे खड्ड्यात पाणी दिसले. हत्तीने त्यात आपली सोंड बुडविली. आणि फुर्रर्रर्र करून पाणी पिऊ लागला. एक मिनिटात सगळे पाणीच संपले! सगळे पाणी हत्तीने पिऊन टाकले होते.
"अरेच्च्या ! पाणी संपलेसुद्धा! ", हत्ती मनात म्हणाला.
तेवढ्यात त्याला सोंडेच्या टोकावर काहीतरी वळवळ जाणवली. बघतो तर काय! एक छोटीशी मासोळी पाण्यातून बाहेर पडल्यामुळे तडफडत होती. अगदी सोंडेच्या टोकावर!

हत्तीने पाहिले. मासोळीला म्हणाला, "हाय, कशी आहेस?"
मासोळीला हत्तीचा खूप राग आला होता. तिचे सगळे पाणी त्याने संपवले होते नं.
"काय रे हत्तीदादा, एवढा मोठा झालास तू, तरी तुला काही कळत नाही! माझे पाणी संपवलेस, आता मी कुठे राहू? पाण्याबाहेर तर मी जगूच शकत नाही. तुझ्यामुळे मी आता मरून जाणार! दुष्ट आहेस तू!", असे मासोळी खूप रागारागाने बोलली. हत्तीला खूप वाईट वाटले.आपली चूक त्याला समजली. पण त्याने मुद्दाम पाणी संपवले नव्हते. तो म्हणाला,"अगं मासोळी, चुकून संपलं गं पाणी! मी तुला दुसरे पाणी शोधून देतो. चल आपण शोधूया."

मासोळी म्हणाली, "तू खरंच मला मदत करशील?"
"हो गं हो. नक्की करेन", हत्ती म्हणाला. मग ते दोघे पाणी शोधत शोधत फिरू लागले. पाणी काही सापडेना. मासोळीची तडफड खूपच वाढू लागली. हत्तीला खूप वाईट वाटले. आपल्यामुळे मासोळीला त्रास होतो आहे हे बघून त्याला रडू आले. दोन्ही डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू लागले. टप टप पाणी जमिनीवर पडले. तो म्हणाला, " आता काय करायचं? " पाणी बघून मासोळीने टुण्णकन त्यात उडी मारली. आणि ती म्हणाली, "हत्तीदादा, हे पाणी मला थोडावेळ पुरेल. तू दुसरे पाणी शोधून ये तोवर मी इथेच थांबते. " हत्तीला गंमतच वाटली. तो पाणी शोधायला एकटाच निघून गेला.

तिथेच जवळ एका चिखलाच्या डबक्यात एक मगर होती. ती हे सगळे दुरून बघत होती. मासोळीला एकटी सोडून हत्ती निघून गेल्याचे तिने पाहिले. मासोळी बघून तिच्या तोंडाला पाणी सुटले. आज आयतीच मेजवानी मिळणार, म्हणून ती खूश झाली. दबक्या पावलांनी मासोळीच्या मागे गेली नि एका घासात तिने मासोळीला गट्टम केले!

हत्ती परत आला तर तिथे मासोळीच नाही. "आता काय करायचं?", पण तिथल्या झाडावरच्या एका धीवर पक्षाने हत्तीच्या कानात सगळे सांगितले. हत्तीला मगरीचा एवढा राग आला. त्याने तिला उचलले नि गरगर फिरवून झाडावर उलटे टांगले! मगरीला खूप भीती वाटली. ती हत्तीला तिला झाडावरून खाली उतरवण्यासाठी विनवू लागली. हत्ती म्हणाला, "आधी ती गिळून टाकलेली मासोळी बाहेर टाक मग मी तुला खाली उतरवतो." मगरीपुढे काही पर्यायच नव्हता. तिने मासोळी खाली टाकली.

मासोळी हत्तीला म्हणाली, " तुला बघून आत्ता कुठं माझ्या जिवात जीव आला! आता सोड बरं मला पाण्यात!"
हत्तीचे तोंड एवढुसे झाले. त्याला अजून पाणी कुठे सापडले होते! तो म्हणाला,"मी पटकन येतो. तू इथेच माझी वाट बघ." आणि तो पाणी शोधायला निघाला.

इकडे झाडावरच्या धीवर पक्षाने एक झडप मारली नि मासोळीला चोचीत उचलले. पिल्लांना खाऊ मिळाला या आनंदात तो घरट्याकडे निघाला. तर समोर हत्ती उभा! त्याने आपल्या सोंडेत धीवराचे घरटेच पकडले होते. त्यात धीवराची पिल्लं घाबरून ओरडत होती. धीवराला आपली चूक समजली. त्याने मासोळीला अलगद खाली ठेवले. हत्तीनेही मग घरटे जागेवर ठेवले.

त्याने मासोळीला उचलले आणि तिथेच तोवर सापडलेल्या छोट्याश्या तळ्याकडे निघाला. मासोळीला ते तळे पाहून खूप आनंद झाला. तिच्या आधीच्या घरापेक्षा इथे थोडे जास्त पाणी होते. हत्तीने तिला पाण्यात सोडताच सुळसूळ पोहत ती आनंदात गिरक्या घेऊ लागली. ते बघून हत्तीला खूप खूप आनंद झाला. अखेर त्याने मासोळीला वाचवले होते !

उन्हात फिरून फिरून हत्ती खूप थकला होता. आणि त्याला खूप तहान लागली होती. त्याने समोरच्याच पाण्यात आपली सोंड बुडविली. आणि तो ढसाढसा पाणी पिऊ लागला. दोन मिनिटात तळ्यातले पाणीच संपले! त्या तळ्यात तर खूप खूप मासोळ्या रहात होत्या. सगळ्याच्या सगळ्या हत्तीकडे रागारागाने पाहू लागल्या. हत्तीने मात्र डोक्याला हात लावला ! आता काय करायचं?

=============

या चित्रांचं वैशिष्ट्य असं की ही 'अक्षर नंदन' शाळेतील पाचवीच्या वर्गातील मुलांनी काढलेली चित्रं आहेत. वर्गात त्यांना ही अनुवादित गोष्ट वाचून दाखवली आणि मग लगेच त्यावर आधारित चित्रे त्यांनी काढली आहेत. मुलं अतिरिक्त सावध होऊन त्यांची नैसर्गिक अभिव्यक्ती बाधित होऊ नये म्हणून अशा प्रकारे 'अटक मटक' वर त्यांची चित्र येणार आहेत याची कल्पना त्यांना दिली नव्हती.यथावकाश लहानग्या चित्रकारांची नावेही त्या त्या चित्रसमुहाखाली देत आहोत. हे सरप्राइज त्यांना नक्की आवडेल अशी खात्री वाटते. 'आभा भागवत' यांनी आपली शाळेतील एक तासिका या प्रयोगासाठी आपणहून देऊ केली त्याबद्दल त्यांचे व शाळेचे खूप आभार.

============