दे धडक बेधडक

लेखक - डी. व्ही. कुलकर्णी

लेखक शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनिअर असून, आजवर अनेक बालकथांचे लेखन केले आहे. त्यांच्या अनेक पुस्तकांना विविध पुरस्कार प्राप्त आहेत. सदर कथा त्यांच्या 'दे धडक बेधडक' या कथासंग्रहातील असून या संग्रहास 'केशव भिकाजी ढवळे पुरस्कार' मिळाला होता.
'अटक मटक.कॉम'ची घोषणा होताच मोठ्या मनाने आपणहून त्यांच्या कथा साईटवर प्रकाशित करण्याची परवानगी त्यांनी दिली - त्याबद्दल त्यांचे आभार

*****************************

गेल्या वर्षीची गोष्ट. तो दिवस मी कधीच विसरणार नाही. संध्याकाळ संपून अंधाराला नुकतीच सुरुवात झाली होती. आमच्या गावच्या नदीच्या पात्राजवळून मी, अजयदादा आणि माझी छोटी बहीण नेहा चाललो होतो. उन्हाळा असल्याने नदीचं पात्र तसं अरुंदच होतं. तरीही वाहत्या पाण्याचा आवाज मात्र येत होता. अर्थात एरवी मला तो आवाज मंजुळ वाटला असता पण, त्या काळोख्या रात्री मात्र रातकिड्यांच्या साथीने येणाऱ्या त्या आवाजाची भितीच वाटत होती. काळोख पडायला लागल्याने नदीच्या किनाऱ्यावर माणसं अगदीच तुरळक होती. गावापासून दूर असलेल्या एका पडक्या घराच्या दिशेने आम्ही निघालो होतो. अजयदादा पुढे चालत होता आणि त्याच्या मागेामाग देवाचं नाव घेत आमची वरात होती.

खरं म्हणजे एकही पाऊल टाकायची माझी इच्छा नव्हती. पायाला कापरं भरलं होतं.  हात थरथरत होते. तोंडात रामनाम होतं आणि मनात प्रचंड भिती दाटली होती भिती - त्या पडक्या घरात रहाणाऱ्या भुताची भिती. थोडं पुढे गेल्यावर नेहा ठेचकाळली आणि रडू लागली. त्या अंधारात तिचं ते रडणं भेसूर वाटत होतं. मी अजयदादाला म्हटलं, "अजयदादा,बस्स इतकंच पुरे"

"चल ना रे थोडंसं पुढे. किती छान वाटतंय! चांगला वारा सुटलाय. आकाशात चंद्राची कोर आहे. किती छान! हे असं वातावरण आमच्या शहरात नाही. आपण असं करू, ते समोर घर दिसतंय ना, तिथपर्यंत जाऊ. तिथल्या कट्ट्यावर जरा बसू, गाणी गाऊ."

"नाही अजयदादा, त्या पडक्या घराजवळ मी येणार नाही. मला भिती वाटते", नेहा रडत म्हणाली. 

"हॅ भित्रीभागुबाई!"

"तू म्हण हवं तर भित्रीभागुबाई, पण मी तिथे जाणार नाही."

मी देखील आता हट्टाला पेटलो. निग्रहाने म्हणालो, "अजयदादा तू मोठा आहेस. आम्ही तुझं सगळं ऐकतो, पण ही गोष्ट ऐकणार नाही. आम्ही जाणार नाही आणि तुलाही जाऊ देणार नाही."

"का रे?", अजयदादाने चमकून विचारलं. 

"अरे तुला माहिती नाही की काय अजयदादा?" 

अजयने नकारार्थी मान हलवली, "तुमच्या गावातलं मला काय माहिती!" खरं होतं त्याचं म्हणणं. अजयदादा मुंबईला राहायला असतो. खूप हुशार आहे. इंजिनीअरिंग काॅलेजला शिकतो. सुट्टीत आमच्या गावाला आला होता. 

"काय आहे रे, त्या घरात?", अजयदादाने विचारलं. 

"अजयदादा, त्या घरात भुतांचा वावर आहे.", दबक्या आवाजात नेहा म्हणाली. नेहाच्या बोलण्यावर अजयदादा खो खो हसू लागला. त्याला हसताना पाहून नेहा अधिकच रडकुंडीला आली. तिला रडवेली झालेली पाहताच अजय गोंधळला. एव्हाना चांगलाच अंधारही झाला होता.

"ए अजयदादा!"
"ठीक आहे. जाऊ आपण मागे; परंतु घरी गेल्यावर मात्र तुम्ही मला तुमच्या भुताच्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत."
"हो हो चालेल!" ,आम्ही दोघेही एकसुरात ओरडलो. त्या पडक्या घरात जायचं नाही म्हणून, आम्ही खूश  झालो होतो. 
आम्ही घराकडे निघालो. वाटेत चालताना मध्येच नेहा घाबरून ओरडली, "ए अजयदादा! तुझ्या शर्टावर बघ काय चमकतंय!" अजयने शर्ट झटकल्यावर ती चमचमणारी वस्तू उडू लागली. अजय हसला. म्हणाला, "नेहा अगं घाबरू नकोस . हा चमकणारा कीटक काजवा आहे. हा अंधारात चमकतो. "

मी उत्सुकतेने त्या कीटकाकडे पाहू लागलो. मला त्याचवेळी माझ्या सायकलवर लावलेली अंधारात चमकणारी रेडियमची पट्टी आठवली. 
"अजयदादा, याच्या शरीरामध्ये रेडियम असतं का रे?", मी थोडासा भाव खात विचारलं.
"नाही रे! रेडियम वगैरे काहीही नसतं. या किड्याच्या शरीरातील टोकाच्या भागात प्रकाश निर्माण करणारा भाग असतो. विशिष्ट रासायनिक प्रक्रियेमुळे याच्या शरीरात प्रकाश निर्माण होतो."

अजयदादा हा माझा मावस भाऊ. तो सुट्टीत राहायला आला म्हणजे मज्जाच मजा असते. दिवसभर हुंदडायचं आणि रात्री आकाशातले तारे पाहायचे. अजयदादा खूप गोष्टी सांगतो. ग्रहांच्या, ताऱ्यांच्या, अंतराळातील अद्भुत गोष्टी ऐकताना आम्ही रंगून जातो. रात्रीचं जेवण झाल्यानंतर नेहमीप्रमाणेच आम्ही गप्पा मारायला बसलो. अजयदादा मला म्हणाला, "प्रकाश, तुमच्या गावाची एक बाकी गंमतच आहे. इथे काय, तर म्हणे त्या पिंपळावर मुंजा आहे. पलीकडच्या डोंगरावर वेताळ आहे. आता तर काय म्हणे, नदीपलीकडच्या पडक्या घरात भूत आहे."

"खरंच अजयदादा, लोकांनी अनुभव घेतला आहे. काही वर्षापूर्वी त्या घरात एक माणूस रहायचा. त्याला मूलबाळ वगैरे काही नव्हतं. आता त्याच्या मृत्यूनंतर तिथे त्याच्या भुताचा वावर आहे. आपलं घर कोणी बळकावू नये म्हणून तिथे त्याचा आत्मा वावरत असतो."

"हॅ ऽ काहीही."
"अजयदादा, तिथे भूत आहे अशी पुष्टी देणाऱ्या अनेक गोष्टी घडल्या आहेत."
"कोणत्या गोष्टी रे?"
अगदी दबक्या आवाजात मी अजयदादाला हकीकत सांगितली. त्या घरातून येणारे चित्रविचित्र आवाज सांगितले. मध्यरात्रीच्या किंकाळ्या सांगितल्या. अजयदादा लक्षपूर्वक ऐकत होता. मी मनापासून सांगत होतो. परंतु त्याला काहीही पटत नव्हतं. त्याच्या नजरेत बेफिकिरी स्पष्ट दिसत होती.
"अजयदादा, मागच्या अमावस्येला तर कहर झाला. काही मिणमिणते दिवे त्या घरात दिसले", अजयदादा मोठ्यांदा हसला.
"हसू नकोस रे"
"हसू नको तर काय करू. त्या हाॅरर सिनेमांमध्ये दाखवतात तसा प्रकार आहे की काय! " अजयदादाने माझ्याकडे रोखून पाहिलं. 
"प्रकाश, त्यात भुताटकी वगैरे काही नाही. मिणमिणते दिवे निसर्गानेच निर्माण केले आहेत. तू आज काजवा पाहिलास ना. अंधारातले ते मिणमिणते दिवेच आहेत."
अरेच्च्या खरंच की! एवढी साधी गोष्ट आमच्या लक्षात कशी नाही आली. अजयदादाचं म्हणणं अगदी खरं होतं. अर्थात एक मुद्दा बाद झाला, तरी इतर मुद्दे होतेच की. मी माझा हेका सोडला नाही. 
"अजयदादा, पण इतर गोष्टींचं काय रे?"
"बोल."
"अजयदादा आमच्या गावात रतन नावाचा एक आडदांड माणूस होता. चांगलाच डेअरिंगबाज होता तो! एकदा धीर करून रात्रीचा त्या वाड्यात शिरला आणि त्यानंतर नाहीसा झाला." रतनची ही हकीकत ऐकल्यावर अजयदादा विचारात पडला. 
नेहा पटकन म्हणाली, "अजयदादा, म्हणून आम्ही तुला सांगतो की आम्हीही जात नाही नि तुलाही त्या जागेत जाऊ देणार नाही."

"जाऊ दे गं नेहा! आपण कितीही सांगितलं तरी अजयदादाला ते पटणार नाही. कारण, असे अद्भुत वाडे त्याला माहितीच नाहीत." अजयदादा मंदसा हसला. आमच्याकडे त्याने प्रेमाने पाहिलं. "माझ्या छोट्या दोस्तांनो, असे वाडे मला माहिती आहेत."

"कुठे आहेत रे?" मी उत्सुकतेने विचारलं.

अजयदादाने वर आकाशाकडे पाहिलं आणि म्हणाला "अंतराळात.त्यांना कृष्णविवर म्हणतात." आम्ही उत्सुकतेने आकाशाकडे पाहिलं. ढगाआड लपलेला चंद्र आमच्याकडे पाहून हसत होता.

"काय असतं हे कृष्णविवर म्हणजे?", नेहाने विचारलं.

"कृष्णविवराला इंग्रजीमध्ये 'ब्लॅकहोल' म्हणतात. या शब्दाचा रशियन भाषेतला अनुवाद मोठा समर्पक आहे. त्याला ते 'थिजलेला तारा' असं म्हणतात. 1967 साली अवकाश शास्त्रज्ञ जाॅन व्हीलर यांनी सर्वप्रथम कृष्णविवराची कल्पना मांडली. त्यांच्या मते अवकाशात एक असी वस्तू आहे की एक अशी वस्तू आहे की तिच्यातून प्रकाश देखील बाहेर पडू शकत नाही. जून 1994 मध्ये नासाने असी माहिती दिली आहे की आपल्या पृथ्वी पासून सुमार 50 दशलक्ष प्रकाशवर्ष अंतरावर असा एक कृष्णविवर असावं. हबल अवकाश दुर्बिणीला असी गूढ आणि अज्ञात वस्तू आढळून आली आहे."

"अजयदादा, तू आत्ताच म्हणालास की या कृष्णविवरातून प्रकाश देखील बाहेर पडत नाही.  मग 'हबल' दुर्बिणीने त्याचा वेध कसा काय घेतला?"

अजयदादाने माझ्याकडे कौतुकाने पाहिलं, म्हणाला, "किती छान प्रश्न विचारलास रे. असेच प्रश्न स्वत:ला विचारले तर अज्ञानाचा अंधार निश्चितच दूर होईल."
अजयदादाने प्रमाणपत्र दिल्याने मी स्वत:ची काॅलर टाईट केली. अजयदादा पुढे सांगू लागला. "हबल दुर्बिणीला प्रत्यक्षात वायूचा एक पुंजका ताशी 19 लाख कि. मी.  या वेगाने एका केंद्राभोवती फिरताना आढळला. परिघ सुमारे 60 प्रकाशवर्षे इतका आहे. त्याचे तापमान सुमारे दहा हजार अंश सेंटिग्रेड इतके आहे. फिजिक्सचे नियम लक्षात घेता या वायूच्या केंद्रस्थानी प्रचंड वस्तुमान व घनता असली पाहिजे. या वायूच्या वेगामुळेच शास्त्रज्ञांना खात्री आहे की केंद्रस्थानी निश्चितच कृष्णविवर आहे."

"अजयदादा मघाशी तू या कृष्णविवरांचं वर्णन थिजलेले तारे असं केलंस. "

"अगदी खरंय ते. कृष्ण विवर म्हणजे सुरुवातीला मोठा तारा असावा. शास्त्रज्ञांच्या मते हे तारे आण्विक ऊर्जा वापरत जळत जातात. व नंतर आकुंचन पावतात. हा आकुंचित तारा एका मर्यादेपेक्षा मोठा असेल तर त्यांची घनता व गुरुत्वाकर्षण एकदम प्रचंड प्रमाणात वाढते. मग त्याचे रूपांतर कृष्णविवरात होते. या कृष्णविवरात अनेक ग्रह तारे व वायू गिळंकृत केले जातात."

अजयदादाने सांगितलेल्या माहितीमुळे आम्ही भारावून गेलो. किंचित थांबून अजयदादा पुढे म्हणाला, "प्रकाश, अवकाशातील अशा अनेक अज्ञात व गूढ वस्तूंचा शोध शास्त्रज्ञ घेत आहेत. किंबहुना अज्ञाताचा वेध घेणं हेच माणसाचं वैशिष्ट्य आहे. पण जाऊ दे तुम्हाला सांगून काय उपयोग! तुम्ही तर त्या पडक्या घरात शिरायला घाबरता."

अजयदादाच्या कानपिचक्या बरोबर लागू पडल्या. मला माझी चूक समजली. "अजयदादा, तू सांगशील तसं मी करायला तयार आहे. तू म्हणत असशील तर मी त्या वाड्यात शिरतो."
माझ्या बोलण्याला नेहाने लगेचच विरोध केला. "प्रकाश, उगीच आव आणू नकोस. तू कसा भित्रीभागुबाई आहेस ते मला चांगलंच माहीत आहे. तूदेखील भुताचं नाव घेतलं की त-त-प-प करतोस. अजयदादा, हे असले रडत राऊ कधीही गळपटतील."

"ए नेहा! जास्ती शहाणपणा करू नकोस", नेहाच्या बोलण्यावर मी भडकलो. अजयदादाने मला शांत केले. 
"अरे थांबा! भांडू नका. अशी घाई करू नका. आपल्याला कोणताही धोका न पत्करता घिसाडघाई न करता काम करायचे आहे. अवकाशातील गूढ शोधायला जसे शास्त्रज्ञ विज्ञानाची मदत घेतली जाते, तशीच हे गूढ उकलण्यासाठी आपण विज्ञानाचीच मदत घेणार आहोत. विज्ञानाची सोबत असेल तर, कोणत्याही प्रश्नाला बेधडक तोंड देता येते. तेव्हा द्यायची धडक?"
आम्ही माना डोलवल्या. अजयदादाने आपला पंजा पुढे केला. व म्हणाला, "प्रकाश, या मोहिमेसाठी आपला परवलीचा शब्द ‘ दे धडक बेधडक!"

अजयदादाच्या सुरात सुर आम्ही मिसळला आणि ओरडलो, "दे धडक बेधडक"

* * *

त्या पडक्या वाड्यातील भुताचा शोध घेण्याचे आम्ही ठरवले. "प्रकाश, सर्वप्रथम आपण अशी मोहीम आखतो आहोत याचा कोणालाही सुगावा लागता कामा नये."
"अगदी बरोबर! अजयदादा."
"पण अजयदादा, भुताचा वावर तर अदृश्य असतो. आपलं बोलणं तो चोरून ऐकत असेल तरी आपल्याला कळणार नाही.", नेहाने शंका विचारली. 
अजयदादा हसला, म्हणाला, "नेहा त्या भुताची नाही मला काळजी. पण गावातल्या माणसांना कळता कामा नये."
"बरोबर अजयदादा! नाहीतर गावकरीच आपल्या मोहिमेत खोडा घालतील." मी अजयदादाच्या बोलण्याला पुष्टी दिली. आम्ही प्रथम गुप्ततेची शपथ घेतली. नंतर निश्चित मोहीम आखू लागलो. अजयदादा विचारपूर्वक म्हणाला, "प्रकाश माझ्या योजनेप्रमाणे आत शिरून त्या भुताचे फोटो काढायला हवेत."
"भुताचा फोटो!? कसं शक्य आहे?"
"प्रयत्न करायचा."
अजयदादाच्या योजनेवर मी खूप खूश झालो. नेहाकडे वळून पहात मी म्हटलं, "ए नेहा! ते भुताचे फोटो मी माझ्या गणिताच्या सरांना दाखवेन. फार मारकुटे सर आहेत ते!"
अजयदादाच्या बोलण्यावर मी खूश झालो असलो तरी, नेहाच्या चेहऱ्यावर मात्र प्रश्न होते. "पण अजयदादा, त्या वाड्यात शिरून भुताचे फोटो काढणार कोण रे?", नेहाची शंका मला बावळटासारखी वाटली.
"ए बावळटा! कोण म्हणजे आपणच"
"नेहाने माझं म्हणणं लगेचच खोडून काढलं, "प्रकाश, उगीचच आव आणू नकोस. तुला मी चांगली ओळखते. तू काही शूरवीर नाहीस. उद्या तिथे समोर भूत आलं की चांगलीच पाचावर धारण बसेल."
"ए नेहा! तू मला समजतेस काय? आमच्या वर्गाचा माॅनिटर आहे मी."
"आरशात तोंड बघा माॅनिटरचं."
आमची जुंपलेली पाहताच अजयदादाने हस्तक्षेप केला, "ए भांडू नका रे! तुम्हाला भुताचा फोटो पाहायचाय ना?"

मी होकारार्थी मान हलवली, तरी नेहाने मात्र निर्वाणीचा इशारा दिला. "अजयदादा, आपल्यापैकी कोणीच त्या पडक्या वाड्यात जाणार नाही. अगदी तू देखील शिरायचं नाहीस त्या वाड्यात. नाहीतर ही मी चालले. तुमची गुप्ततेची शपथ गेली उडत."
खरं म्हणजे मला नेहाचा राग आला. अजयदादा मात्र शांत होता. "नेहा तू आधी शांत हो पाहू. "
"मी शांतच आहे. अजयदादा, कोणाचाही जीव मला धोक्यात गेलेलं चालणार नाही. "
अजयदादा हसला. त्याने नेहाच्या पाठीवर हात ठेवला. तिची समजूत घालू लागला. "नेहा, प्रकाश, आपण कोणीही त्या वाड्यात शिरायचं नाही. मग तर झालं."  नेहा शांत झाली. पण मी मात्र गोंधळलो.
"अजयदादा, पण मग भुताचे फोटो कोण काढणार?"
"माझा एक मित्र आहे. तो जाईल त्या वाड्यात आणि काढील भुताचे फोटो."
"पण अजयदादा, त्या भुताने तुझ्या मित्राला मारलं तर?", नेहाने रास्त शंका विचारली. 
अजयदादा हसला आणि म्हणाला, "काही घाबरू नकोस. माझा मित्र अतिशय बुद्धिमान आणि दणकट आहे.  शिवाय भिती हा शब्द त्याच्या कोशातच नाही. कारण 'दे धडक बेधडक' हा विज्ञानाचा मंत्र त्याच्या रोमरोमात भिनलेला आहे."
अजयदादाचं बोलणं ऐकून मी जोषात आलो आणि ओरडलो, "दे धडक बेधडक"

* * *

अजयदादा लगेचच मुंबईला निघून गेला. आणि आठवड्याभरानंतर परतला. यावेळी तो एकटा नव्हता.  बरोबर त्याचा मित्रदेखील होता. दिसायला अगदीच विचित्र! मी आणि नेहा त्याला पाहून चक्रावलोच. मला प्रश्न पडला याला माणूस म्हणावे की यंत्र?  एखाद्या यंत्राचे भाग असावेत तसे त्याचे हात पाय. छातीवर लहान मोठी दिव्याची बटणं होती.

 अजयदादाने माझी ओळख करून दिली. "प्रकाश, हा माझा मित्र रोबो."


मी रोबोला नमस्कार केला. नेहादेखील अजयच्या या दोस्तांकडे स्तिमित होऊन पहात होती.  रोबोने देखील प्रत्युत्तरादाखल दिव्यांची उघडझाप केली.  शेकहँडसाठी मी हात पुढे केला. तसा अगदी यांत्रिकपणे त्याचाही हात पुढे आला. आम्ही एकदम खूश !

अजयदादाचा हा दोस्त आपल्याला खूप आवडला.  मी अंगठा 'थम्स-अप'सारखा वर केला आणि अजयदादाला पावती दिली. अर्थात मनातलं कुतूहल स्वस्थ बसू देत नव्हतं. कोण हा रोबो? हा असा विचित्र का दिसतो? याचे आई वडील कोण आहेत?
मी अजयदादाला विचारलं, "अजयदादा, हा नेमका कोण आहे रे? हा असा वेगळा का दिसतो? हा तुझा मित्र कसा?"
अजयदादा हसला, माझ्या पाठीवर थाप मारली. "रोबो ,माझा एकट्याचा मित्र नसून संपूर्ण मानवजातीचा मित्र आहे.  हा यंत्रमानव असून माणसाला मिळालेलं ते एक वरदान आहे. माणसाच्या अचाट बुद्धिमत्तेतून याचा जन्म झाला. याच्या शरीरात लहान लहान इलेक्ट्रॉनिक पार्टस असतात. प्रकाश, एक गोष्ट लक्षात घे की ,रोबो माणसासारखे दिसतातच असे नाही. त्यांच्या कामाच्या स्वरूपावरून त्यांचं आकारमान ठरतं. अगदी अंगठ्याच्या आकाराचे देखील रोबो असतात. हे रोबो माणसाने दिलेल्या आज्ञेप्रमाणे काम करतात. ह्यांच्यात कामे करण्याची क्षमता जबरदस्त असते. जोखमीची व अवघड कामे यांच्यांवर विश्वासाने सोपवली जातात. विशेषत: जी कामे करताना माणसाच्या जीवाला अपाय होऊ शकतो. अशी कामे यांच्यांवर सोपवणे योग्य असते. उदाहरणार्थ, अतिशय उच्च तापमानात काम करणे. अंतराळमोहिमेत तर यांचा सहभाग फार महत्त्वाचा आहे. मंगळावरची लाल माती गोळा करायची असो, अथवा शनीच्या कडा भेदायच्या असोत. रोबो हवेतच. अलीकडच्या काळात तर रोबो शस्त्रक्रियेत भाग घेऊ लागले आहेत. लवकरच शेतीकाम करणारे रोबोही आपल्याला पाहायला मिळतील."

रोबोची ही ओळख ऐकून मी तर पार चक्रावून गेलो. नेहा देखील खूश झाली होती. तिने खट्याळपणे विचारलं , "अजयदादा ,रोबो आमचा अभ्यास करेल का रे?"
"हो! अगदी सहज करेल . "
नेहा हरखून गेली. पटकन म्हणाली, "चला बरं झालं. आता धमाल येईल! प्रकाश, आपला अभ्यास आता रोबोच करेल."
रोबो अभ्यास करणार म्हटल्यावर मला देखील आनंद झाला. "अजयदादा, तुझ्या या दोस्ताला आता इथेच राहू देत. तो आमच्याशी खेळेल. आमचा अभ्यास करेल. आम्ही धमाल करू. "
अजयदादाने माझ्या पाठीवर थाप मारली. "प्रकाश, असं करून कसं चालेल? माणसाच्या मदतीसाठी रोबेाचा जन्म झाला असला तरी ती मदत माणसाच्या विकासासाठी आहे. माणसाला निरुद्योगी अथवा आळशी बनवण्यासाठी नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. तंत्रज्ञान माणसाला शिकायलाच हवे. उद्या हा रोबो बिघडला तर काय कराल? विज्ञानामुळे माणसाला सुख मिळाले, समृद्धी मिळाली, पण याचा अर्थ असा नाही की, माणसाने खुशालचेंडू व्हावे. संशोधन ही न संपणारी गोष्ट आहे. तेव्हा विज्ञान यायलाच हवे. गणिते शिकायला हवी. भाषेचेही महत्त्व आहेच. पटलं ना मी काय म्हणतोय?"

अजयच्या सांगण्याचा आमच्यावर परिणाम झाला होता. आम्ही दोघांनीही मान डोलवली. 
"तेव्हा प्रकाश पडक्या घरातील भुताचे फोटो काढून झाले की रोबो परत जाईल."
"एकदम मान्य अजयदादा", मी जोषात म्हणालो. अजयदादाने आमचे डोळे उघडले होते. 

*********

ठरल्याप्रमाणे भुताचे फोटो काढण्याची जबाबदारी आम्ही रोबोवर सोपवली. अजयदादाने रोबोच्या शरीरात कॅमेेरा बसवला. रोबोला आज्ञावली दिली. त्याला त्याचे काम नेमून दिले. रात्री बारा वाजता मी अजयदादा आणि नेहा निघालो. रोबोदेखील आमच्याबरोबर चालत होता. आम्ही चौघेजण त्या पडक्या घराच्या दिशेने चालत होतो. सभोवताली संपूर्ण काळोख होता. डोळ्यांत बोट घातलं तरी काही दिसणार नाही अशी परिस्थिती होती. साथीला रातकिड्यांची किरकिर होती. झोंबणारा घोंघावत येणारा गार वारा, नदीच्या पाण्याची खळखळ, सारंच भेसूर वाटत होतं. चालताना दगड-गोट्यांवर आम्ही अडखळत होतो. परंतु कोणाच्याही तोंडून हुंकार देखील बाहेर पडत नव्हता. आमच्या हातात टॉर्चेस होते; परंतु गुप्ततेच्या दृष्टिकोनातून केवळ गरज पडली तरच ते पेटवायचे असं ठरलं होतं. अर्थात गाव झोपेच्या अधीन असल्याने आमच्याकडे कोणाचेच लक्ष नव्हते. 

सुमारे वीस मिनिटं चालल्यानंतर आम्ही त्या पडक्या घराच्या जवळ आलो. झाडांच्या दाटीत मोडकळीस आलेलं ते घर उभं होतं. घराच्या आवारात कमरेइतकं रानगवत वाढलेलं होतं. वाऱ्याचा झोत आला की, अंधारात उभी असलेली झाडं हेलकावे खायची. पानाची सळसळ व्हायची. काळोखातील घराचं रूप भयाण वाटायचं. त्या घरापासून शंभर फूट अंतरावर आम्ही थांबलो. आता इथून पुढे रोबो एकटाच त्या घरात जाणार होता.

हळूहळू पावले टाकीत रोबो त्या घराच्या दिशेने निघाला. रोबोच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहात आम्ही जवळच्या एका दगडावर बसलो. आमची नजर रोबोवर खिळलेली होती.  रोबोला अंधारात नीट दिसत असेल का? तो वाटेत एखाद्या मोठ्या दगडाला अडखळून पडणार तर नाही? असे प्रश्न मनात येत होते. रोबो मात्र दिमाखात पुढे चालला होता. अडथळा आल्यावर आपला मार्ग सहजगत्या बदलत होता.

थोड्याच वेळात रोबो दिसेनासा झाला. आम्ही श्वास रोखून पहात राहिलो. प्रत्येक क्षण मोठा वाटत होता. आजूबाजूला कोणीच नसल्याने भयाण वाटत होतं. एवढ्यात त्या घरातून क्षणभरासाठी प्रकाश पडल्यासारखा वाटला. एखादी वीज चमकावी तसा प्रकाश चमकला होता. आम्ही तिघांनी एकमेकांकडे पाहिलं. माझा तर थरकाप उडाला होता. मी आणि नेहाने अजयदादाचा हात गच्च पकडला.

अजयदादा हसला म्हणाला, "घाबरू नकोस. रोबोच्या कॅमेऱ्याचा फ्लॅश असेल तो."
"त्यानंतर हळूहळू असे प्रकाशाचे पुंजके दिसत होते. तो रोबोच्या कॅमऱ्याचा फ्लॅशच होता."
सुमारे अर्ध्या तासाने रोबो बाहेर आला. आम्ही डोळ्यांची पापणीही लवू न देता त्याच्याकडे पहात होतो. रोबोची चाल आता पहिल्यासारखी नव्हती. त्याच्या चालीतला ताल हरवला होता. त्याचा अधूनमधून तोल जात होता. आम्ही सगळेच काळजीत पडलो.  काय झालं आमच्या या दोस्ताला? आतल्या भुताने तर काही केलं नसेल ना?

जवळ आल्यानंतर लक्षात आलं की रोबो आचके देत होता. नेहा घाबरली, "अजयदादा! रोबो बघ कसा करतोय तो! त्याच्या अंगात आलंय. त्याला नक्कीच भुताने झपाटलंय."

नेहाच्या या बोलण्याने अजयदादा रागावला. त्याच्या कपाळावर आठी पडली. त्याने लगेचच तिला दटावले. "नेहा, रोबोला भुताने वगैरे काही झपाटलेले नाही. त्याच्या शरीरातील संगणकात थोडासा बिघाड झालाय इतकंच. मी तो लवकरच दूर करीन. नेहा, लक्षात घे की मानसशास्त्रज्ञांच्या मते अंगात येणं हा देखील एक प्रकारचा मानसिक आजार आहे. रोबोला देखील आजार झालाय असंच समज."

अजयदादाने रोबो जवळ आल्यावर त्याच्या पाठीवर कसलंस ऑपरेशन केलं. त्याचे आचके थांबवले. त्यानंतर त्याच्या शरीरात लपवलेला छोटासा डिजीटल कॅमेरा बाहेर काढला. स्क्रीनवर तो चित्रं पाहू लागला. रोबोने आपली कामगिरी चोख बजावली होती!

रोबोने काढलेले ते फोटो पाहिल्यानंतर आम्हाला त्या पडक्या घरातील भुताचे दर्शन झाले. एक नाही अनेक भुते त्या वाड्यात होती. देशाच्या मुळावर उठलेली भुते, देशाच्या एकतेवर उठलेली भुते, देशाची शांतता धोक्यात आणणारी भुते. बंदुका, हातबाॅम्ब, रायफल अश्या रूपातील भुते.  देशात अराजक माजवणारी भुते. त्या पडक्या घरात खूप मोठा शस्त्रसाठा होता, देशद्रोह्यांच्या कुणालाही पटकन लक्षात न येणारा अड्डा होता.

आम्ही लगेचच पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांनी त्या पडक्या घराला वेढा घातला. शस्त्रास्त्रांचा साठा जप्त केला. एक दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.  "अजयदादा, मला तुझा अभिमान वाटतो. तुझ्या धाडसीपणामुळे हजारो माणसांचे प्राण वाचले." अजयदादा मंदसा हसला. त्याने माझ्या पाठीवर हात ठेवला. 

"प्रकाश ,अभिमान विज्ञानाचा बाळग. विज्ञानाच्या तंत्रज्ञानाच्या साहाय्यानेच आपण रहस्याची उकल केली. विज्ञान आपल्या मदतीला असेल, तर चिंता कसली! विज्ञानाच्या साहाय्यानेच आपल्याला अनेक प्रश्न सोडवायचे आहेत. भित्रिभागुबाई बनून पळ काढायचा नाही. तेव्हा, दे धडक..."

"बेधडक!" आम्ही एका सुरात ओरडलो.

-o-

 

सुचना: सदर लेखन जुन्या पद्धतीच्या फॉन्ट डिपेंडन्ट लेखनातून युनिकोडमध्ये आणले आहे, या प्रक्रियेत काही टंकनदोष संभवतात. शक्य तितके दोष दूर करण्याचा प्रयत्न केला आहे, तरी काही दोष राहिले असल्यास चुभुदेघे. असे दोष आमच्या इमेल पत्त्यावर (monitor.atakmatak@gmail.com) कळवल्यास ते सुधारले जातील