सांता (कथा)

-----
लेखकः फारूक एस.काझी
चित्रेः गार्गी भालेराव
-----

डिसेंबर सुरू झाला आणि थंडी वाढली. तशी ती उशीराच सुरू झाली होती. “माणसासारखं निसर्गचक्रही बदलत चाललंय”, असं मोहल्ल्यातली म्हातारी शन्नो दादी बोलू लागली होती. रेश्माला खूप हसू येई तिच्या बोलण्याचं. बोलता बोलता ती मध्येच काही म्हणी वापरी. त्या एवढ्या धम्माल असत की रेश्माच्या हसून हसून पोटात दुखायला लागे. ‘सगे को सगा ,अन गले को लगा’, ‘लेना ना देना, अन बजाव रे बजाव’ असल्या काही म्हणी ती वापरे. रेहाना तिच्याजवळ हटकून थांबत असे. तिच्याशी बोलत असे.

थंडी वाढली आणि शन्नो दादी कुडकुडू लागली. शन्नो दादी एकटीच राहत असे. तिचा मुलगा शहरात राहतो. इकडे येत नाही असं अम्मीने एकदा सांगितलं होतं. रेहानाही शन्नो दादीला रोज पाहत असे. तिला वाटलं हिला आपली एखादी चादर आणून द्यावी का? नाहीतर घरातली जुनी वाकळ तरी आणून देऊया. पण, तिला नेमकं काय करावं कळेना. तिला वाटलं अम्मी मारेल. रेश्माला सांगू का? नको! ती पण वैतागणार माझ्यावर. तिने डोक्यातून तो विचार काढून टाकायचा प्रयत्न केला. पण तो काही गेला नाही.

शाळेत सकाळच्या वेळी मुली गप्पा मारत बसलेल्या होत्या.
“रेश्मे, आपल्याला सुट्टी हाय आता, ख्रिसमसची. त्या दिवशी सगळ्याजनी जाऊया का शेतात आमच्या. हुरडा आलाय खायाला. सगळ्यांनी थोडा थोडा गूळ आणायचा घरनं. यीतीस ना मग?”, वर्गातली संगीता बोलली.
“व्हय, यीती की. ह्यानीला बी आंती.”
शाळेची बेल झाली आणि सगळ्या मुली वर्गात पळाल्या.

इंगळे बाईंनी आज वर्गात ख्रिसमसची माहिती सांगितली. रेश्माला ती खूप आवडली. जास्त आवडला तो त्यातला सांताक्लॉज. मुलांच्या इच्छा पूर्ण करणारा. कुणी संत निकोलसला सांता मानतात. तो सर्व लहान मुलांची इच्छा पूर्ण करतो. तिला क्षणभर वाटलं असं झालं असतं तर किती मजा आली असती. कुठल्याच मुलांना दु:ख झालं नसतं. सगळ्यांना मनासारखं गिफ्ट मिळालं असतं. तिला रेहानाला आपण सायंडलचं गिफ्ट दिल्यावर झालेला आनंद आठवला. नुसत्या आठवणीने एक हसू रेश्माच्या चेहऱ्यावर फुलून आलं. ‘देने से बरकत आती.’ तिची अम्मी नेहमी हेच सांगते.

रेहानाने सांताविषयी ऐकलं आणि ती स्वत:ला सांता समजू लागली. आपणही लाल रंगाचा झगा घालून, टोपी घालून गिफ्ट वाटूया. “आपुन गिफ्ट कुणाला द्यायचं?” तिच्या मनात विचार येऊन गेला. “शन्नो दादीला!” पटकन तिच्या डोक्यात शन्नो दादीचं नाव आलं.
“रेश्मे, बुढ्ढे आदम्या को गिफ्ट देता क्या गे सांता?” सुट्टीत रेहाना गिफ्टच्याच विचारात होती.
“मजे नै मालूम. बुढ्ढे लोगां को जरुरत –हयिंगी तो देय तो चलतंय. चल पयले खाना खायींगे.” असं म्हणून, त्या दोघी भात खाण्यासाठी गेल्या.


रेश्माला रेहानाला काहीतरी गिफ्ट द्यायचं होतं. काय द्यावं याचाच विचार ती करत होती. आपणही सांता व्हावं असं तिला वाटू लागलं होतं. डोक्यावर टोपी घालून बेल वाजवत यावं. हळूच रेहानाच्या उशाला गिफ्ट ठेवून निघून जावं. काय मज्जा येईल! तिला कळणारच नाही कुणी दिलंय गिफ्ट ते! रेश्मा स्वत:शीच हसली.
दुसऱ्या दिवशी सकाळी रेश्मा आणि अम्मी कामात होत्या. रेहाना अजून अंथरुणात लोळत होती.
“रेश्मे, उशे वडना दाल. खुल्ली पडीय देक उने.” अम्मीने असं म्हणताच रेश्माने रेहानाला पांघरून घातलं. रेहाना झोपेत हसत होती.
“आगाऊ पोट्टी.” असं लाडाने म्हणत रेश्मा कामाकडे वळली.
“एक रजई लेनी की क्या गे रेश्मे?”
“किशे गे मा?”
“ह्यानी को! बच्चा हाय. सुकून से सुइंगी. थंड बी पडने लगीय अबी.”
रेश्माने हसून मान डोलवली. तिला तिचं उत्तर सापडलं होतं. अम्मीला जमेलसं वाटत नाही. आपणच आधी घेऊ रजाई.
“जरा बडी रजाई लेती. रातभर खुल्ली पडती रहती ये येडी.” असं म्हणून तिने डब्यातले पैसे मोजले. १२० रुपये भरले.
“इत्ते मी आती क्या रजाई?” ती काळजीत पडली. साठवलेले पैसे तर एवढेच होते. तिने मोहल्ल्याच्या बाहेर एका रजाईवाल्याला पाहिलं होतं. तो रोज तिथंच बसतो. आज विचारूया त्याला असं ठरवून ती कामाला लागली. आज तिने रेहानाला सोबत नाही घेतलं. अम्मी आज कुठल्याशा लग्नात चपात्या करायला जाणार होती. तिच्यासोबत रेहानाला पाठवलं होतं.

“चाचा , ये रजाई कितने मे दी?” एक मोठी फुलांची रजाई तिला खूप आवडली होती. गुलाबी रंग आणि त्यावर लाल,पिवळी मोठी गुलाबाची फुलं.... आहा काय सुंदर होती ! थोडी मोठी होती. रेहानाला अंगभर गुंडाळता येईल अशी होती.
“३०० रुपये की है बिटिया.” दुकानदार प्रेमाने बोलला.
“चाचा, देने का बोलो ना..” रेश्माने काकुळतीला येऊन विचारलं.
“२०० से कम नहीं होगा बिटिया. मेरा नुकसान होगा.” तो ही काहीसा नरम आवाजात बोलला.
रेश्माला काय बोलावे कळेना. हा चाचा पण त्याच्या मुलांसाठी राबत असणार. त्याचं नुकसान केलं तर मुलांना काय खाऊ घालणार ?
ती हिरमुसली. मान खाली घालून आपल्याच विचारात वळून चालायला लागली.
“अरे, क्या हुआ बिटिया? लेना नहीं है क्या रजाई?”
रेश्मा थांबली. “चाचा, किमत जादा है. मेरे पास खाली १२० रुपय हाईं. इसमे नहीं आएगी. मुझे मेरी छोटी भान को गिफ्ट देने का हाय. ऱ्हंदे....”, असं म्हणून ती चालू लागली.

दुकानदार पण घुटमळला. त्याला काय बोलावं कळेना. कारण १२० रुपयांना रजाई दिली तर त्याला काहीच उरणार नव्हतं. नुकसान होणार नाही. पण फायदाही होणार नव्हता. गावाकडे पैसे पाठवायचे आहेत. तो ही अस्वस्थ झाला. हातावर हात चोळत विचार करू लागला. अचानक त्याला काय वाटलं काय माहीत. त्याने रेश्माला थांबवलं. “रुक जा बिटिया. ले जा. किसी को अगर तोहफा देना है तो, थोडा सवाब मै भी कमा लूं. मेरे भी तो बच्चे हैं.” रेश्माने मागे वळून पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर आनंद होता. तिला वाटलं नव्हतं की चाचा एवढ्या कमी पैशात तिला रजाई देतील. तिला सांता आठवला. ती परत आली. १२० रुपये त्याच्या हाती देत तिने ती रजाई हातात घेतली.

उन्हात पिवळा,गुलाबी,लाल रंग उजळून निघाला होता. तिला सांता आणि त्याचा ड्रेस आठवला. तिने पटकन ती रजाई पिशवीत नीट ठेवून दिली. काहीतरी विचार केला आणि चालू लागली.

रात्र झाली आणि थंडी वाढू लागली. रेश्मा रात्र होण्याची आणि रेहाना झोपी जाण्याची वाट पाहत होती. तिने अम्मीलाही सांगितलं नव्हतं. सगळ्यांना एकदम धक्का द्यायचा असं तिने ठरवलं होतं. रात्री रेहाना झोपली आणि रेश्माने हळूच नवीन रजाई तिच्या अंगावर पांघरली. रेहानाने लगेच ती अंगावर ओढून घेतली. रजाई घट्ट धरून झोपी गेली. रेश्माच्या चेहराभर आनंद फुलला होता.

सकाळी अम्मी लवकर कामावर गेली. तिने रजाई बघितलीच नाही. रेश्माने उठून सर्व कामं आटपली. रेहानाने उठून रजाई बघितली. ती जाम खूश झाली. तिला मज्जा वाटली. नरम नरम एवढी देखणी रजाई पाहून. त्यावरू हात फिरवताना तिला शन्नो दादी आठवली. ती काकडून गेली असेल. रेहाना गुपचूप घराबाहेर पडली. रेश्मा कुठे दिसत नव्हती. रजाई तिने शन्नो दादीच्या अंगावर नेऊन टाकली. “मई सांता हूं, हॅप्पी क्रिसमस” असं म्हणत ती परत आलीसुद्धा. शन्नो दादी कोड्यात पडली होती. तिने रजाई पाहिली. त्यावरून हात फिरवला. तिला आपल्या नातीच्या गालांची आठवण झाली. मऊ मऊ. दादीच्या डोळ्यात पाणी आलं. रेहाना तिला आपल्या नातीसारखीच वाटून गेली.

रेहानाने घरात पाऊल टाकताच रेश्मा भडकली. “का गई ती गे मरी. बोल के नै जाने आता तुजे. सारा गांव पालता दाल के आई मई. न्हाकेले. मा आईंगी अब्बी. तू घरपर रुक. मई स्कूल को जातुं.” रेश्मा कामाच्या व्यापात रजाई आवडली का हे विचारायचंही विसरून गेली. पटापट काम आटोपून शाळेला गेली.

शनिवार. सकाळची शाळा. रेश्माची तारांबळ उडाली होती. शाळा सुटताच ती घरी आली. येताना तिचा चेहरा रागाने लालबुंद झालेला.
“ह्याने, ह्याने. का मरी गे?” आवाज चढवून बोलत रेश्मा घरात आली.
“मैने लाये सो रजाई का हाय? बोल पयले.”
“मईने शन्नो दादी को दी...”गाल फुगवत तरीही धाडसाने रेहाना बोलली.
“कायको दी. तेरे वास्ते मईने लाईती.”
“शन्नो दादी को लय थंड बजती ती. बोल के मइने उनको दी. मई सांता बनीती.” रेश्माला काय बोलावं कळेना.
“रेश्मे, ई देक. कैसी हाय रजाई?” अम्मीच्या आवाजाने रेश्माची तंद्री तुटली.
तिने मागे वळून पाहिलं.

अम्मी कामावरून येताना रेहानासाठी आणि रेश्मासाठी दोन रजया घेऊन आली होती. एक गुलाबी रंगाची आणि एक लाल रंगाची.
रेहाना पळतच अम्मीकडे गेली. तिने पटकन गुलाबी रजाई उचलली. रेश्माने लाल रंग निवडला. अम्मीच्या डोक्यावर सांताची टोपी होती.
“ह्याने, ये टोपी तुजे. दुकानदारने फ्री मे देया.” रेहानाने ती टोपी रेश्माच्या डोक्यावर घातली. “इने हाय सांता.”

अम्मीला काहीच कळेना. रेश्माने अम्मीला सगळी हकिगत सांगितली.
अम्मीला काय बोलावे कळेना. तिने दोन्ही पोरींना पोटाशी धरले आणि पटापट त्यांच्या गालाचे ,केसांचे मुके घ्यायला सुरवात केली. पोरीही अम्मीला घट्ट बिलगल्या.
“गुना क्या छोऱ्या मेऱ्या!” तिच्या डोळ्यातलं पाणी चमकत होतं. सांताच्या हास्यासारखं...