आजी-आजोबांच्या वस्तू - ३ (मोजमापे)

--------
लेखक - ऋषिकेश 
-
--------

आजी आजोबा आले तेव्हापासून घरात माझा वेळ मस्त जातो. आधी फक्त टिव्ही बघ, नाहीतर गेम्स, नाहीतर क्रिकेट, काहीच नाही तर दादाला त्रास दे आणि तोही नसला तर अभ्यास यात सगळा वेळ जायचा. आता आजी आजोबा आल्यावर माझं टाईमटेबल बदलूनच गेलं. मी हल्ली आजीबरोबर सकाळी फुलं तोडायला जातो. सॉरी! वेचायला किंवा खुडायला जातो. आजी रागावते तोडायला म्हटलं तर! मला ह्या फुलांची नावंच माहीत नव्हती, पण आता मी अजून हुशार झालोय. आधी मला गॅलरीतले जास्वंद आणि गुलाब माहीत होते. पण आता मोगरा, कण्हेर, प्राजक्त ही फुलंसुद्धा माहितीएत. आजीने तर बिट्टी आणि गोकर्णातील फरकही समजावून सांगितला आहे.

काल आजी म्हणाली, "आपण मैलभर पुढे जाऊया का रे? तिथे शंकराचं देऊळ आहे ना!"
मला मैल म्हणजे माहीत नसलं तरी ते देऊळ पक्कं माहितीए. तिथे एक भेळवालाही बसतो. " हो पुढे आहे एक देऊळ. जाऊ आपण" मी आजीला देवळात घेऊन गेलो. भेळही खाल्ली आणि फ्री पुरी पण! परत घरी जात होतो. मगासचं तिचं बोलणं आठवलं म्हणून विचारलं, "आजी, मैल बरोबर का मीटर? का आपण मराठीत मीटरला मैल म्हणतो?".
"नाही रे, मीटर किलोमीटर आता वापरतात. आधी आम्ही मोजायला मैलच वापरायचो. बहुतेक गोरे वापरायचे मैल."
"गोरे म्हणजे आपले समोरचे गोरे काका?"
"नाही रेऽऽऽ" आजीने परत हसायला तोंडाला पदर लावला. "गोरे म्हणजे इंग्रज!"
"अच्छा, म्हणजे ब्रिटिश!" मी तसा हुशार आहे कळलं मला लगेच! बोलता बोलता आम्ही घरी येऊन पण पोचलो. आजीने जरा हुऽऽश्श् केलं आणि आजोबांना म्हणाली "भारी चौकस होऽऽ नातू तुमचा. तुम्हीच सांगा आपण लांबी कशी मोजायचो ते"
"काय रे, कसली लांबी??"
तसा मी हुशार आहे, मी लगेच सांगितलं "लांबी म्हणजे लेन्थ!" आजोबा हसले.
"आस्स् का बॉर्र? अरे आम्ही छोट्या लांब्या इंचात मोजायचो. तुझ्या फूटपट्टीवर अजून इंच आणि सेमी दोन्ही असतं की नाही? आणखी मोठं अंतर फुटात. त्याहून जास्त अंतर मैलांमध्ये. "
"म्हणजे तुमच्यावेळी पण फूटपट्टी होती?"
"हो तर, आजी वापरते की अजून ती शिवणासाठी. जा घेऊन ये"

ती फूटपट्टी बघून मला मजा वाटली. एकदम जुनी फोल्डिंग फूटपट्टी होती. आधी माझं लक्षच गेलं नव्हतं.
"अरे, लांबीचं तरी ठीक होतं, वजनं मात्र तुमच्यापेक्षा फार वेगळी होती."
"म्हणजे?"
"सोनं, चांदी अश्या गोष्टी छोट्या तराजूत तोलायचे त्याला तागडी म्हणायचे. हे बघ आमच्यावेळच्या तागडीचं चित्र फॉरवर्डमध्ये आलं आहे."


"यात एका बाजूला गुंजा घालायच्या आणि दुसर्‍या बाजूला सोनं"
"गुंजा म्हणजे?"
"गुंजा म्हणजे एक बी असते. एका शेंगेत ४-५ गुंजा निघतात. ही चित्रं बघ...


...गंमत अशी की प्रत्येक गुंजेचं वजन एकदम सारखं असतं"
"ही गुंज काय मस्त दिसते नाही" मला ही गुंज फार आवडली. लाल चुटुक, "आताही मिळतात गुंजा?"
आजी म्हणाली "हो मिळतात की, आता शंकराच्या देवळामागे मला दिसल्या गुंजांच्या वेली, परत गेलो ना देवळात की दाखवीन."
तसा मी हुशार आहे. " पण जर खूप जास्त सोनं हवं असेल तर कितीतरी गुंजा लागतील."
"बरोब्बर! म्हणून जास्त वजनासाठी तागडीबरोबर इतर वजनमापंही वापरायचे. जसे पूर्वी वाल, कवड्या वगैरे वापरायचे. पण वानरं आल्यावर आमच्या लहानपणीच हल्ली वापरतात तशी मापे वापरायला सुरवात झाली होती. ही अशी वजनमापं आल्यावर मग सोनं तोळ्यात मोजायचे."
"हो! आई परवाच कोणाला तरी सांगत होती चांगल्या चार तोळ्यांचा हार आहे म्हणून"
आजोबा नुसतेच हसले. अजून त्यांनी खोटे दात नव्हते लावले, त्यामुळे लहान बाळासारखे गोड दिसत होते. मी विचारलं, "आजोबा, वानरं म्हणजे माकड ना?"
"हो, पण इंग्रजांची नाकं आणि गाल लाल असायचे अगदी आपल्या हुप्प्या वानरासारखे, म्हणून त्यांना वानरं म्हणायचो आम्ही!"
"आपल्याकडे माळ्यावर एक तागडी आहे ना रे? हल्ली वाण्याकडे इलेक्ट्रॉनिक वजनकाटे असतात याला जरा तागडी बघू देत" आबांनी बाबांना विचारले. "हो पण तो थोड्या मोठ्या वजनमापांचा तराजू आहे, सोन्याची तागडी नाही. आपण नंतर बघूया का?" बाबा पेपर वाचत होते, त्यांना उठायचा अजिबात मूड नव्हता. पण आबांनी नेहमीप्रमाणे त्यांचं न ऐकता त्यांना माळ्यावरून ती तागडी काढायला लावली. बाबा जरा वैतागले पण माझा फायदाच होता!

वॉव, किती मस्त! त्याच्याबरोबर वेगवेगळी वेट्स म्हणजे आबा म्हणतात तशी वजनमापं होती. आबा म्हणाले, "जा आतून एक वाटीभर चणे घेऊन ये. आणि ते या एका बाजूला घाल. आता या चण्याचं वजन करायचंय आपण. किती असेल?"
"असेल खूप"
"खूप म्हणजे? १००ग्रॅ., २००ग्रॅ? की एकदोन ग्रॅ?"
"..." मी वेड्यासारखा बघतच राहिलो. आता मला कसं कळणार?


"बरं, असं करू या दुसर्‍या बाजूला १०० ग्रॅ. च वजन टाक"
तिथे वजन ठेवल्या ठेवल्या ती बाजू एकदम खाली गेली. म्हणजे चणे १०० ग्रॅ.पेक्षा कमी वजनाचे होते.
"आता ५० बघ घालून"
पण ५० घातल्यावर चण्याचं वजन जास्तच राहिलं.

"आबा आपल्याकडे १०० आणि ५० याच्यामधलं वजन् कुठे आहे?"
"हुशार आहेस!" (आहेच मुळी) "अरे, मग त्याच बाजूला आणखी २०ग्रॅ चं घाल"
"पण मग आता वजन जास्त झालंय"
"आता गंमत करू. चण्याच्या बरोबर आणखी ५ ग्रँ.चं वजन घाल"
"सह्ही!! काटा बरोब्बर मध्ये आलाय! म्हणजे वजन किती?"
तसा मी हुशार आहे "७०-५ बरोबर ६५ ग्रॅम!!!"
"कर्रेक्ट!!" आजोबा असं मध्येच इंग्रजी बोलले की फार गंमत वाटते. आजोबांनी मग एक श्रीखंडाची गोळीही दिली
आता मी ठरवलंय की ओमला बोलावून आमच्या सगळ्या जिआयजोंचीं वजनं करायची. तुम्हीपण कुठून तरी तागडी किंवा तराजू मिळवा आणि स्वतः वेगवेगळ्या वस्तूंची वजन करून बघा. खूप मजा येते!

-o-o-o-o-o-

आधीच्या भागात: बंब | पुढिल भागात - टाईपरायटर

चित्रस्रोत:
शेवटाच्या तराजूच्या आकृत्या: ऋषिकेश 
तसंच मुख्य पानावरील मुखचित्र  आणि तागडी व तोळा वजनाची छायाचित्र: श्री प्रकाश घाटपांडे यांच्या खाजगी संग्रहातून. अटकमटकसाठी ते उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार
उर्वरीत छायाचित्रे आंतरजालावरून साभार
======