आजी-आजोबांच्या वस्तू - २ (बंब)

--------
लेखक - ऋषिकेश 
-
--------

मी एकदम खूश होतो. माझे आजी आजोबा घरी येणार होते. त्यांना आणायला बाबा स्टेशनवर गेले होते. मला गावाला जायला फार फार आवडते. तिथे एक गोठा आहे. तिथे बर्‍याच गायी-म्हशी आहेत. एकदा मी आजीला सांगितलं होतं की आम्ही मुलाला 'गाय' म्हणतो. तर आजी "तुम्ही गाय कसले, बैल आहात लेकाचे!" असं तोंडाला पदर लावून हसत म्हणाली होती. ती अशी पदर तोंडाला लावून हसली की मला एकदम फनी वाटतं.

मी आजी-आजोबांची खूप वाट बघत होतो. तसा मी हुशार आहे. आजी आजोबा येणार म्हणून शहाण्यासारखी अंघोळ करून बसलो होतो. माझा खणपण आवरला होता. नाहीतर आई नेमकी त्यांच्यासमोर ओरडते. एकदाची दाराची बेल वाजली. आईने लगबगीने दार उघडलं.
"या आई, कसा झाला प्रवास?"
"सुरेख! कोकण रेल्वेने अर्ध्या वेळात आणून सोडलं की गं" आजी नेहमीच्या फनी टोनमधे बोलली.
पाठोपाठ आजोबा आत आले. ते काही ओमच्या आजोबांसारखं धोतर घालत नाहीत, शर्ट पँट घालतात. मी त्यांना पाहून एकदम खूश! सगळ्या आजोबांसारखं तेही मला वेगवेगळ्या गोष्टी सांगतात. तोपर्यंत आजीने एक पिशवी हातात दिली.
"जा आईला दे.. खरवस आहे त्यात. रंभा व्याली. दुसर्‍या दुधाचा आहे हो!"
"व्याली म्हणजे?" मी लगेच विचारलं
"म्हणजे तिला बाळ झालं. एकदम छान रेडकू आहे. डोक्यावर मोती आहे त्याच्या."
माझ्या डोळ्यासमोर ती मारकी म्हैस आली. म्हणजे तिला बाळ झालं तर! आजी आणि आईच्या तोवर काहीतरी गप्पा सुरू झाल्या होत्या. माझं लक्ष आजीकडच्या गोळ्यांकडे होतं इतक्यात "...त्यात काल आमचा बंब बिघडला..." असं काहीतरी आजी बोलली. हे काय नवीन प्रकरण? तसा मी हुशार आहे, आई मला असा उघडाबंब बसू नको असं कधी म्हणते हे मला लगेच आठवलं. त्यातला का हा बंब?

मी आजोबांना जाऊन बिलगलो. "आबा, बंब म्हणजे काय?"
"कसला रे बंब? आग विझवायचा? आग विझवायचा बंब म्हणजे ते फायर ब्रिगेडवाल्यांकडे असतो ना तो!"
"तुमच्या घरीसुद्धा हा आग विझवायचा बंब आहे?"
"नाही रे, घरी कसा असेल? केवढा मोठा असतो तो!"
"मग आजी काय म्हणतेय? की तो बिघडला आहे म्हणून"
"हा हा हा!!" ठ्योऽऽय छिक!! आजोबा एकदम जोरदार आवाजात शिंकले. मी तर हसायलाच लागलो. पण त्यांना कळलंच नाही. ते पुढे सांगू लागले, "अरे, घरी पाणी तापवायचा बंब आहे."
"म्हणजे?"
"म्हणजे पाणी तापवायचं यंत्र."
तसा मी हुशार आहे. मला लगेच कळलं "अच्छा म्हणजे गिझर!!"
"हो गिझरच पण कोळशावर चालणारा."
"पण त्यात पाणी कसं गरम होतं?"

इतक्यात बाबा ओरडले "अरे, ते आत्ताच आलेत. त्यांना थोडावेळ तरी बसू देत. किती प्रश्न विचारशील!" मी पटकन आजोबांपासून दूर झालो.
"नाही रे! तू विचार बिनधास्त." असं म्हणून आजोबांनी मला परत जवळ ओढलं आणि मांडीवरच बसवलं. आजोबा म्हणूनच मला आवडतात. मी बाबांकडे हळूच चिडवत पाहिलं. तोवर आजोबांनी एका कागदावर हे चित्र काढलं होतं:


"हा बंब आहे. हा तांब्याचा असतो. तांब्याची वस्तू लगेच गरम होते ना, म्हणून हा बंब पण तांब्याचा. यात पाणीही लगेच गरम होते. तर यात मागे या झाकणातून कोळसा, गोवऱ्या किंवा जे काही जळण असेल ते घालतात. लाकडाच्या बंबात घालायच्या तुकड्यांना ढलप्या किंवा बंबफोड असंही म्हणत आमचे बाबा. बंबाच्या आतमध्ये असे दोन भाग असतात. वरच्या भागात थंड पाणी ओततात. ते ह्या नळ्यांमधून येतं. ह्या नळ्या कोळशामुळे मस्त तापलेल्या असतात. त्यातून पाणी गेल्यावर ते लगेच गरम होतं. एकावेळी बरंच पाणी ह्या छोट्या छोट्या नळ्यांमधून आल्याने एकदम बरंच तापलेलं पाणी आपल्याला पटकन मिळतं. यातून बरीच वाफ तयार होते ती इथून चिमणीमधून बाहेर येते."
मला एकदम गंमत वाटली. "म्हणजे मग हा बंब उघडता येतो?" मी विचारलं
" हो येतो की. गावाला आलास ना की मी उघडून दाखवीन नक्की. हा दुसरा फोटो बघ. माझ्या बाबांच्या काळातला आहे. आपल्या जुन्या वाड्यातलं न्हाणीघर आहे ते"

"बापरे! किती वेगळं बाथरूम होतं तेव्हा!"
"तर! ते मागे दिसतंय तो रहाट, त्याने पाणी शेंदायचं - विहिरीतून शेंदतो ना तसं. मग ते बंबात घालायचं. बंबातून येणारं गरम पाणी खाली घंगाळात घ्यायचं त्यात 'विसण' घालायची"
"विसण म्हणजे?"
"म्हणजे थंड पाणी. अंघोळीसाठी घंगाळात घेतलेले पाणी खूप गरम असायचं. त्यात थोडे थंड पाणी घालून आपल्याला घेववेल इतक्या तापमानाला आणावं लागायचं ना. त्या थंड पाण्याला 'विसण' म्हणत."

तसा मी हुशार आहे, मी लगेच विचारलं. "मग गिझरमध्ये कुठे कोळसा घालतो आपण? मग त्यात पाणी कसं तापतं?"
"अरे, गिझरमध्ये इलेक्ट्रिसिटीने पाणी तापतं"
"इलेक्ट्रिसिटीने कसं तापतं? कोळसा पेटला म्हणून गरम होतो? पण इलेक्ट्रिसिटीने वायर कुठे गरम होते?"
"वायरचं मटेरियल कुठलं त्यावर ते अवलंबून असतं. शिवाय वायरला कोटिंग असतं. इस्त्री आपण इलेक्ट्रिसिटीने तापवतो की नाही तसं"
"बाबा, मग आपण घरी बंब नाही आणत? हा गिझर का वापरतो?"
" बंबाला कोळसा, लाकूड, गोवर्‍या लागतात. त्या जाळल्याने बराच धूर होतो. शिवाय त्यामुळे हा बंब साफ करायला लागतो तो वेगळाच. शिवाय बंब पेटवणे सर्वांनाच जमायचं असं नाही. ढलप्या/कोळसे जरूरीपेक्षा जास्त झाले की बंब चोंदून नुसता धूर व्हायचा आणि तो सिलिंडरमधून बाहेर यायचा. काही विचारू नकोस. शिवाय अंघोळ झाल्यावर बंबात भर किंवा विस्तव घालणे आम्ही मुलं नेहमी विसरायचो आणि तुझ्या पणजोबा किंवा पणजीची बोलणी खायचो!."

मला आजोबाही ओरडा खायचे ऐकून खूपच गंमत वाटली. मला शेणाचा वास आठवला, गावच्या शेणाला छान वास असतो, पण इथे शहरातल्या शेणाला विचित्र वास येतो. घरात नको बाबा तो वास. तसंही रोज शाळेच्या व्हॅनच्या आधी सकाळी तो बंब पेटवत बसलो तर शाळेला रोजच सुट्टी!!

"हं म्हणजे आपल्याला वस्तू गरम करायला गॅस, इलेक्ट्रिसिटी नाहीतर कोळसा हवाच आणि बंबात कोळसा असल्याने पाणी तापतं. त्यातही नळ्या असल्याने ते एकदम लवकर तापतं.

"आहे बाबा तुझा पोरगा हुशार!", आजोबा बाबांना म्हणाले. मी जाम खूश. इतकं छान बोलल्याबद्दल आबांना मी एक पापी दिली आणि खेळायला पळालो.

-o-o-o-o-o-

आधीच्या भागात: जातं | पुढिल भागात - मोजमापे

चित्रस्रोत:
पहिले छायाचित्र: आंतरजालावरून साभार
दुसरी आकृती: ऋषिकेश
तिसरे न्हाणीघराचे छायाचित्र: श्री प्रकाश घाटपांडे यांच्या खाजगी संग्रहातून. अटकमटकसाठी ते उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार

======

 

पुरवणी:

हा लेख वाचून आपले वाचक 'श्री. गणेश रायकर' यांनी आणखी एका सर्रास वापरल्या जाणाऱ्या बंबाच्या रचनेची आकृती पाठवली आहे. बंबाचा आकार किती मोठा आहे, घरात किती सदस्य आहेत त्यानुसार यापैकी एका रचनेचा बंब असे.

त्या दुसऱ्या रचनेची आकृती पुढिलप्रमाणे, आकृतीबद्दल श्री. रायकर यांचे आभार.