आजी आजोबांच्या वस्तू - भाग १ (जातं)
लेखक - ऋषिकेश
हॅलो छोट्या मैतरांनो!
हल्लीचं जग हे प्रचंड वेगाने प्रगती करतंय. ही प्रगती गेल्या काही दशकांत तर इतक्या वेगाने झाली की अनेक पूर्वापार वापरण्यात आलेल्या वस्तू हा हा म्हणता नाहीश्या व्हायला लागल्या. मला लहानपणापासून अनेक पुस्तके वाचायची सवय आहे. पुस्तकांमध्ये उल्लेख येणार्या वस्तूंपैकी बर्याचशा वस्तू कधी ना कधी पाहण्यात अथवा ऐकण्यात आल्या असत. परंतु आता तुम्ही तीच पुस्तकं वाचायला घेतली तर तुम्हाला अनेक शब्द अडतील किंवा त्या गोष्टींत येणाऱ्या काही वस्तू कोणत्या असाही प्रश्न पडू शकेल. यातील शब्दसंपदा ही वाचन वाढवून, संदर्भाने वाढेल असे वाटते; परंतु अनेक वस्तू मात्र आता दिसेनाशा झाल्या आहेत. केवळ दोन पिढ्यांनी वापरलेल्या वस्तूंमध्ये आता बराच फरक आहे. ह्या लेखमालेत अश्या तुमच्या "आजी आजोबांनी" सर्रास बघितल्या-वापरलेल्या वस्तूंची माहिती देण्याचा प्रयत्न आहे. बघा तुम्हाला आवडते का?
=============
भाग १ - जातं
काल आई आजीला फोनवर काहीतरी सांगत होती की, "...आता आपलं जातं माळ्यावर धूळ खात पडलंय."
मला कळेना की जातं म्हणजे काय? मी आईला विचारलं, "काय गं जातं म्हणजे काय?". आई फार घाईत होती म्हणाली, "सांगेन नंतर कधीतरी, आत्ता मला आधी कुकर लावू दे." मला काही स्वस्थ बसवेना, मी सरळ दादाच्या खोलीत गेलो. तो नेहमीप्रमाणे गेम्स खेळत होता. वॉव! लेटेस्ट एन्.एफ्.एस्.!! मी पार विसरूनच गेलो मला काय विचारायचंय ते. दादा कसला ग्रेट खेळतो! ओमला मी सांगणार आहे आज की माझ्या दादाने ४ ट्रॅक्स त्याच्या आधी पूर्ण केले. अरे हो! मला एकदम आठवलं जात्याबद्दल. मी दादाला विचारलं की जातं काय असतं. तर म्हणे, "ग्राइंडिंग मशीन, पूर्वी दळणाला वापरायचे बहुतेक. बाबांना विचार आणि मला खेळू दे"
तसा मी हुशार आहे, पण बाबा येईपर्यंत थांबायचं म्हणजे. तसंही बाबा येणार रात्री कधीतरी. तेव्हा मला आई झोपायला लावते. अरे हो! तर जातं.. जर दादा म्हणतो तसं ग्राइंडिंग मशीन असेल तर आपल्या एवढ्याशा माळ्यावर कसं मावलं? आपल्या पिठाच्या गिरणीत तर केवढं मोठं मशीन आहे. मी खाली नाना आजोबांकडे गेलो. आमच्या खालीच राहतात. त्यांच्याकडे फिशटँक आहे आणि त्यात किलर मासा पण आहे. मी त्याचं नाव डॅनी ठेवलंय. सॉरी पुन्हा भरकटलो. तर, मी नाना आजोबांकडे गेलो. गेल्यागेल्या नेहमीप्रमाणे त्यांनी हातातला पेपर खाली ठेवला आणि मला गोळी दिली.
"आजोबा, जातं म्हणजे काय हो?" मी पण गोळी तोंडात टाकल्या टाकल्या प्रश्न केला.
" का रे बाबा? आज काय हे मध्येच? शाळेत विचारलंय का? का गृहपाठात आहे?"
"सांगा नाऽऽऽ!!" आमच्या नानांना प्रश्नच फार असं सतीश काका बोलल्याचं मला आठवलं.
"बरं बरं. सांगतो. आमच्या घरात जातं नाहीये, पण आजच एका मासिकात एका जात्यावर पीठ काढणार्या बाईचं चित्र आलं आहे, हे बघ"
"वॉव. म्हणजे यात पीठ दळायचं? स्वतः?"
"अरे! पीठ दळता येतं का? धान्य दळायचं, आणि हो स्वतः! आता हे बघ." त्यांनी एका कागदावर चित्र काढलं आणि पुढे सांगू लागले, "जातं असं दोन सपाट दगडांच्या जड चकत्यांचं बनलं असतं. एक गोल किंवा चकती घट्ट बसलेली असते तर दुसरी चकती त्यावर फिरते. वरच्या भोकातून थोडं थोडं धान्य टाकायचं आणि हे जातं गोल गोल फिरवायचं की या दोन दगडांमध्ये धान्य भरडलं जातं."
"भरडलं म्हणजे?"
"म्हणजे स्मॅश होतं. स्मॅश झाल्याने त्याचं पीठ बनतं. हे पीठ इथून बाहेर येतं."
तसा मी हुशार आहे. लगेच विचारलं, "पिठाला कसं काय कळतं कुठून बाहेर यायचं ते."
"हं" आजोबा हसले. असे ते कधी कधी उगाच हसतात." हे चित्र बघ."
"... हे 'आय' लिहिलं आहे ना तिथून धान्य टाकायचं. जात्याला आतमध्ये चिरा असतात आणि चर असतात. चर म्हणजे "क्रॅकिंग्ज" चिरांमुळे आणि दगडाच्या वजनामुळे धान्य नीट भरडलं जातं. तुमच्या भाषेत 'व्हेरी फाईन'. पीठ किती जाड किंवा बारीक हवं आहे त्यावर हे चर किती खोल आणि किती हवेत ते ठरतं. काही काळाने ते चर पुन्हा खोल करावे लागतात. चिरा किंवा क्राकिंग्ज म्हणजे ज्यात धान्य भरडल्यावर पीठ साचतं ते!"
"पण ते बाहेर कसं येतं?"
"जेव्हा नवीन पीठ तयार होतं ते पीठ आधीच्या पिठाला चिरांमधून बाहेर ढकलतं"
इतक्यात आजी मस्त भजी घेऊन आली. "आजी, तू पाहिलं आहेस जातं?"
"पाहिलं?! अरे मी तर स्वतः दळलं आहे जात्यावर. वा वा! काय सुरेख पीठ मिळायचं अगदी आपल्याला हवं तसं जाड. त्या भय्याची कटकट नाही. इतरांचं हलकं पीठ मिसळायला नको."
आजी एकदम काहीतरी गाणं गुणगुणायला लागली.
देवा घरोटं, घरोटं तुझ्या मनातील गोट
सर्व्या दुनियेचं पोट, घरी कर्माचा मरोट
अरे जोडता तोडल त्याला नातं म्हनू नही
ज्याच्यातून पीठ येतं, त्याले जातं म्हनू नही ...
मला तर एकही शब्द कळेना. "हे काय गातेस? काही कळलं नाही!"
"ही अहिराणी बोली आहे. तुला नाही कळायची"
मला नाही कळायची म्हटलं की अस्सा राग येतो मला! जाऊदे! तसंही आजीला काही नव्हतं त्याचं, ती त्या गाण्यातच अडकली होती.
आजोबा सांगत होते. "आपल्या कोपट्यावरल्या गिरणीचं जे मशीन असतं ना, तेही असंच काम करतं फक्त इलेक्ट्रीक मोटार जात्याला फिरवते. त्यामुळे खूप पीठ बऱ्याच वेगात बाहेर येतं."
मी आधी विचार करत होतो की आपल्या जयकिसनला(आमचा गिरणीवाला), गिरणीचं मशीन उघडलं की मला बोलाव, असं सांगायचं. इतक्यात आठवलं की, आपल्याकडेच जातं आहे की. बघा मी किती हुशार आहे! आता मी पक्कं ठरवलंय की रविवारी माळ्यावरचं जातं बाबांना काढायला लावायचं आणि स्वतः धान्य दळून बघायचं. ठरलं तर! ओमला आत्ता सांगतो या विकेंडचा हा सही प्लॅन.. त्यालाही बोलावतो. तुम्हीपण बघा कधीतरी जात्यावर दळून!